समांतर रस्त्यांसाठी महामार्गाचे काम सेंटर लाईनप्रमाणे आवश्यक – दिपककुमार गुप्ता

जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. महामार्गाचे काम सुरु असतांना रस्ता वापरणा-या स्थानिक रहिवाशांच्या अडीअडचणी समजून घेणे प्रशासनासाठी क्रमप्राप्त असते. भुतकाळात झालेल्या चुकांमुळे जळगाव शहरातून जाणा-या महामार्गाच्या निर्मिती दरम्यान विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी जळगाव शहरातील जागरुक नागरिक वेळोवेळी प्रशासनाकडे न्याय मागत आहेत.

आज दुपारी साडेबारा वाजता थेट महामार्गावरच सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दिपक कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. तापी पाटबंधारे महामंडळाने अनेक वर्षापुर्वी महामार्गावर सरंक्षण भिंतीचे अतिक्रमण करुन ठेवले आहे. त्याबाबत वेळोवेळी आवाज उचलण्यात आला. मात्र तापी पाटबंधारे महामंडळाने ते अतिक्रमण काढलेले नाही. त्यामुळे सुरु असलेल्या महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या प्रकरणी माहिती अधिकार तथा सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी, या खात्याचे सचिव गिरीधर अरमाने, तापी पाटबंधारे मंडळ, जिल्हाधिकारी जळगाव, जळगाव मनपा आयुक्त, प्रादेशिक अधिकारी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव यांचेकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवला आहे.

जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील आकाशवाणी व ईच्छादेवी चौकात सुरु असलेल्या जंक्शन डेव्हलपमेंटच्या ठिकाणी महामार्गाची सेंटर लाईन चुकीच्या पध्दतीने मोजमाप केली असल्याचे दिसून आले आहे. आकाशवाणी चौकात महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने विकास नकाशात दर्शवल्याप्रमाणे महामार्गाची साठ मिटर रुंदी आहे. मात्र प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी सदर रुंदी उपलब्ध होत नसल्याचे आढळून आले आहे. या रुंदीत सेंटर लाईन प्रमाणे जुना महामार्ग दोन्ही बाजूस समान रुंदीचा असणे आवश्यक असतांना तो प्रत्यक्षात दिसत नसल्याचे चित्र आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांना समजलेल्या माहितीनुसार जळगाव महानगरपालिकेने केलेल्या मोजमापानुसार पाटबंधारे विभागाची भिंत ही एका बाजूने जवळपास 4.50 मीटर व दुस-या बाजूस (ईच्छादेवी चौकाकडे) 7.50 मीटर अतिक्रमणात आहे. त्यामुळे त्या आधारे महामार्ग विकसित करतांना चुकीच्या माजमापानुसार बांधकाम चुकीचे होणार असल्याचे दिसत आहे.

यापुर्वी महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे विविध न्यायालयीन प्रकरणी समांतर रस्ता तयार करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. न्यायालयाने सदर रस्ते विकसित करण्याबाबत आदेश दिलेले आहेत. मात्र सेंटर लाईन नुसार रस्त्याचे बांधकाम जागेवर न झाल्यास समांतर रस्ते तयार करण्यास अडचण निर्माण होणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. सदर बाब तांत्रिकदृष्टया योग्य नसून यापूर्वी न्यायालयात सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र, न्यायालयाने दिलेले निकाल (उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ – औरंगाबाद याचिका क्रं. 1788/2010) यांचेशी विसंगत आहे. या प्रकरणी न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे देखील म्हटले जात आहे.

चुकीच्या मोजमापाच्या आधारे रस्ते बांधकामावर होणारा खर्च हा वाया जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आकाशवाणी चौकात चुकीच्या ठिकाणी बस थांबा निर्माण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. बांधकाम केलेले आहे त्यामुळे सदर बांधकाम हे चुकीच्या जागेवर झालेले आहे. ईच्छादेवी चौकात मुळातच जुना बांधकाम केलेला महामार्ग कोणतीही शहानिशा न करता तयार करण्यात आला असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात सेंटर लाईनच्या एका बाजूस पुर्णपणे तयार झालेला आहे.

सद्यस्थितीत बांधकाम झालेला महामार्ग आधारभूत मानून नवीन महामार्गाचे काम केल्यास ईच्छादेवी पोलीस चौकी ते अजिंठा चौफुलीपर्यंत समांतर रस्त्याचे बांधकाम (फेज-2) भविष्यात करता येणार नाही. परीणामी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार असून समांतर रस्ते नसल्याने जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या सर्व चुकांमुळे महामार्गावर झालेला खर्च एकप्रकारे वाया गेल्याचे म्हटले जात आहे. वाया गेलेल्या खर्चाच्या निधीची वसुली संबंधीत महामार्ग प्राधिकरण अधिकारी व सल्लागार यांच्याकडून करण्यात यावी असे गुप्ता यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

महामार्गालगत ईच्छादेवी चौकाच्या विरुध्द बाजूस जास्त जागा शिल्लक राहीली असून सदर जागेत अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अपघाताला आमंत्रण देण्याचा प्रकार आहे. त्यामुळे वारंवार अतिक्रमण विभागाला कारवाया करण्याचे काम लागणार आहे. या सर्व विषयांचा विचार करुन महामार्ग विभागास योग्य ते आदेश होण्यास विनंती सामाजिक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी प्रशासनाला केली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here