गडचिरोली : पोलिस दलातील जोखमीचे व दुर्लक्षीत क्षेत्र म्हणून नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याकडे पाहिले जाते. जणू काही युद्धजन्य परिस्थिती असल्यागत या भागात पोलिस दलाची सेवा बजवावी लागते. पोलीस अधिकाऱ्यांना दोन वर्षांचा खडतर काळ या भागात पूर्ण करावा लागतो. त्यानंतर ऐच्छिक ठिकाणी बदली मिळण्याची तरतुद सरकारने केली आहे. मात्र ऐच्छिक ठिकाण तर लांबची गोष्ट झाली, कुठेही करा पण बदली करा अशी वेळ या भागातील अधिकारी वर्गाची झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुके वगळता इतर ८ तालुके नक्शलाईट कारवायांसाठी संवेदनशील समजले जातात. नक्षलवाद विरोधी अभियान राबवण्यासाठी नव्या दमाचे नवप्रशिक्षीत तरुण पोलिस उप निरिक्षकांची फौज दर दोन – अडीच वर्षांनी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात रवाना केली जाते.
याशिवाय सहायक पोलीस निरीक्षक, निरीक्षक, राज्य पोलीस सेवेतील उपअधीक्षक तथा भारतीय पोलीस सेवेतील बहुतेक अधिकारी वर्गाला या जिल्ह्यात सेवा बजवावी लागते.
सध्या गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले १४९ पोलीस उपनिरीक्षक तसेच ३१ सहायक पोलीस निरीक्षक व काही निरीक्षक, उप – अधीक्षक बदलीच्या प्रतिक्षेत तग धरुन बसले आहेत.
अगोदर कोरोनाच्या कारणामुळे व आता इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या बदल्यांचे कारण पुढे आल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी बदलीच्या प्रतिक्षेत बसून आहेत. कधी आपली बदली होते याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.
कित्येक अधिका-यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात आला आहे. ३१ जुलैपर्यंत बदल्या होतील असे त्यांना सांगण्यात आले होते. त्यानंतर ५ ऑगस्ट, १० ऑगस्ट, ५ सप्टेंबर, ३० सप्टेंबर आणि आता १५ ऑक्टोबरला बदल्यांची यादी तयार होईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ते अधिकारी आशेवर बसून आहेत.