राजुचा वाढदिवस करायचा होता जोमात ! राकेशच्या हत्येने सर्वच जण गेले कोमात !!

ललित खरे याजकडून

जळगाव : अशोक सपकाळे हे जळगावच्या राजकीय पटलावरील नाव जळगाव शहरवासीयांना चांगल्याप्रकारे परिचीत आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आशिर्वाद आणि पदस्पर्शाने अशोक सपकाळे यांनी जळगावचे  महापौर होण्याचा मान मिळवला होता. गेंदालाल मिल परिसर हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा बालेकिल्ला समजला जातो. या प्रभागातून ते जळगाव शहर महानगर पालिका निवडणूकीत निवडून येत असतात.

अशोक सपकाळे यांचा मुलगा राजु याचा 5 नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. राजु याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे पिताश्री अशोक सपकाळे यांनी त्याच्यासाठी नवीकोरी केटीएम कंपनीची दुचाकी घेवून दिली होती. राजूचे दोघे भाऊ सोनू व राकेश हे देखील त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी जोमाने कामाला लागले होते. रात्री ठिक बारा वाजेच्या ठोक्याला राजुचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्याचे नियोजन सोनू व राकेश यांनी सुरु केले होते. तिस हजार रुपयांचे फटाके, परिसरात मोठमोठे बॅनर लावण्याचे काम सुरु होते. रात्री बारा वाजता कापण्यासाठी मोठ्या आकारातील केकची ऑर्डर देण्यात आली होती.

हा भलामोठा शाही स्वरुपाचा वाढदिवस साजरा करण्यास खुद्द राजुचा नकार होता. मात्र दोघे भाऊ त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जिद्द बाळगून होते. माजी महापौराच्या मुलाचा वाढदिवस म्हणजे काय? तो काय साधासुधा राहणार काय? असे म्हणत सोनू व राकेश या दोघा भावांनी जिव ओतून वाढदिवसाची तयारी सुरु केली होती.

माजी महापौर अशोक सपकाळे यांचे रेल्वे स्टेशन परिसरात हॉटेल अशोका पॅलेस नावाचे लॉजींग आहे. या ठिकाणी  वाढदिवसाच्या आदल्या रात्री अकरा वाजता म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी अशोक सपकाळे व त्यांचे दोन्ही मुले राकेश व सोनु हजर होते. वडील अशोक सपकाळे यांना जेवणाचा डबा आणून देण्यासाठी सोनु यास दुचाकीने घरी जायचे होते. त्याच्या ताब्यात शोरुम मधून आणलेली नवी कोरी दुचाकी होती. नवी कोरी दुचाकी हाती असतांना भरधाव वेगात हाकण्याची मानसिकता त्याच्या तरुण रक्तात होती. रस्त्याने कुणाला लवकर साईड द्यायची नाही, आपणचे पुढे रहायचे ही मानसिकता इतर काही तरुण मुलांप्रमाणे त्याच्या देखील मनात रहात होती.

अशोक सपकाळे यांच्या चारचाकीवरील चालक सलमान शेख यास सोनुने त्याच्या ताब्यातील दुचाकीवर डबलसीट बसवले. दोघे जण घरुन जेवणाचा डबा आणण्यासाठी दुचाकीवर निघाले. शिवाजीनगरच्या दिशेने घरी जातांना वाटेत स्मशानभुमीनजीक सोनू यास त्याच्या ओळखीचा विशाल संजय साळुंखे त्याला दुचाकीने जातांना दिसला. विशाल व त्याचा साथीदार असे दोघे जण दुचाकीने शिवाजीनगरच्या दिशेने जात होते.

एकदम तरुण असलेल्या सोनूच्या ताब्यात नवीकोरी दुचाकी होती. त्यामुळे साहजिकच त्याच्या तरुण वयाच्या मानसिकतेप्रमाणे तो भरधाव वेगात ओव्हरटेक करुन दुचाकी हाकत होता. त्याने विशाल व त्याच्या साथीदारास मागे टाकून पुढे जाण्यास साईड दिली नाही. आपणच पुढे रहावे ही सोनूची मानसिकता होती.

सोनू आपल्या मागून येवून भरधाव वेगात पुढे जातो आणि साईड देखील देत नाही याचा विशाल व त्याच्या दुचाकीवर डबलसीट बसलेल्या साथीदारास राग आला. रागाच्या भरात विशालने त्याच्या ताब्यातील एफझेड ही मोटारसायकल अजून भरधाव वेगाने त्याला ओव्हरटेक करत पुढे नेली. संतापात असलेल्या विशालने त्याच्या ताब्यातील दुचाकी सोनूच्या दुचाकीला आडवी लावली. त्यामुळे साहजीकच सोनू यास करकचून ब्रेक लावून दुचाकी जागेवर उभी करावी लागली.

त्याचवेळी पाठोपाठ होडा शाईन मोटारसायकवर गणेश दंगल सोनवणे व त्याचेसोबतचे दोन तरुण असे ट्रिपल सिट आले. त्यांनी सोनूच्या ताब्यातील नव्या को-या दुचाकीला जोरात लाथ मारली. त्यामुळे त्या दुचाकीसह सोनू व सोबत असलेला सलमान शेख खाली पडले. त्यात दुचाकीचे नुकसान झाले.

आता जागेवर सोनू सोबत सलमान असे दोघेच जण असतांना विरुद्ध बाजुला प्रतीस्पर्ध्याच्या रुपात पाच जण होते. यातील गणेशने त्याच्या हातातील तलवारीने सोनूच्या नव्याको-या मोटारसायकलचे नुकसान केले.

तलवारीने दुचाकीचे नुकसान केल्यानंतर सोनूच्या मनात दहशत निर्माण झाली. तीच तलवार गणेशने सोनूवर उगारत डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. सोनुने तलवारीचा तो हल्ला चुकवला. त्यामुळे तलवारीचा वार सोनूच्या उजव्या हाताच्या कोप-याला लागला. काही कळण्याच्या आत सर्व पाच जण एकत्र आले. त्यांनी सोनू यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

दरम्यान राजूच्या वाढदिवसाची तयारी करण्याच्या उद्देशाने सोनूचा लहान भाऊ राकेश व त्याचा मित्र सचिन असे दोघे जण चारचाकी वाहनाने मागून येत होते. आपला भाऊ सोनू पाच जणांच्या तावडीत सापडल्याचे बघून राकेशने लागलीच जागेवर कार उभी केली. त्याने रस्त्यावरील पाचही जणांच्या तावडीतून सोनू यास सोडवण्याचा पुरेपुर प्रयत्न सुरु केला.

सुरु असलेला वाद आणि सोनुला होत असलेली मारहाण सोडवण्याचा प्रयत्न करत असतांना गणेशने त्याच्या हातातील तलवारीने राकेशवर वार केला. तो वार राकेशच्या  उजव्या व डाव्या पायाच्या मांडीवर बसला. काही कळण्याच्या आत विशालने त्याच्या कब्जातील चॉपर बाहेर काढला. त्या चॉपरचे वार विशालने राकेशच्या डोक्यावर केला. चॉपरचा वार डोक्यावर बसताच तो विव्हळत खाली कोसळला. या घटनेत तलवार, चॉपर, लाकडी दांडे व आसारी यांचा वापर करण्यात आला. दरम्यान त्याठिकाणी लोकांची गर्दी जमली. लोकांची जमलेली गर्दी आणि राकेशचे जिवघेणे विव्हळणे बघून सर्व जण त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलने पसार झाले.

या घटनेची माहिती सोनूने वाढदिवस असलेला मोठा भाऊ राजू यास मोबाईलद्वारे कळवण्याचा प्रयत्न केला. मात्र राजूचा फोन लागला नाही. त्यामुळे सोनूने त्याला फोन करण्याचा प्रयत्न सोडून दिला. त्याने सलमान यास जखमी राकेश जवळ उभे करुन दुचाकीने थेट घर गाठले. त्याने राजु यास सर्व हकीकत ओक्साबोक्सी रडत कशीबशी कथन केली. त्याने राजूला मोटारसायकलवर बसवून लागलीच घटनास्थळावर राकेशजवळ आणले. दोघा भावांनी जखमी राकेशला मोटारसायकलवर मध्यभागी ट्रिपलसिट बसवून शहरातील ओम क्रिटीकल हॉस्पीटल येथे आणले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषीत केले.  

दरम्यान घरुन जेवणाचा डबा येणार असल्याची वाट बघणा-या अशोक सपकाळे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी देखील दवाखाना गाठला. आपल्या मुलाचा जखमी अवस्थेतील मृतदेह बघून त्यांची देखील पाचावर धारण बसली.

राजुच्या वाढदिवसासाठी झटणा-या राकेशचा मृतदेह बघून एक पिता असलेल्या अशोक सपकाळे यांचे दुख: उपस्थीतांना बघवले जात नव्हते. तशाही अवस्थेत त्यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशनला फोन करुन या घटनेची माहिती दिली.

सोनूच जिव वाचवणा-या आणि राजुच्या वाढदिवसाची तयारी करणा-या राकेशचा जिव गेला होता. हे दुख: अशोक सपकाळे यांना पेलवले जात नव्हते.

माझा वाढदिवस करु नका असे राजू सर्वांना वेळोवेळी सांगत होता. मात्र उत्साहाच्या भरात दोघे भाऊ त्याचा वाढदिवस जंगी स्वरुपात करण्याच्या तयारीला लागले होते. तो वाढदिवस जागेवरच राहीला होता. ज्या दिवशी एका भावाचा वाढदिवस त्याच दिवशी दुस-या भावाचा मृत्यूचा दिवस झाला होता. हा एक दुर्दैवी योग होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी तात्काळ सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता व शहर पोलिस स्टेशनसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला तपासकामी योग्य त्या सुचना दिल्या. या घटनेप्रकरणी सोनू अशोक सपकाळे याने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 211/20 भा.द.वि. 143, 147, 148, 149, 302, 307, 341, 332, 427, 34 तसेच आर्म अ‍ॅक्ट 4/25  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेत पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडे,अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी जळगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकामी योग्य ते मार्गदर्शन व सुचना दिल्या.

जळगाव शहर पोलिस स्टेशनचा नुकताच चार्ज घेतलेले पो.नि. धनंजय येरुळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिस नाईक गणेश पाटील, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे, किशोर निकुंभ, पो.कॉ.रतन गिते, पो.कॉ.तेजस मराठे, योगेश इंधाटे यांना हल्लेखोर आरोपींच्या शोधार्थ रवाना केले. याशिवाय जळगाव शहर पोलिस स्टेशनमधून नुकतेच एमआयडीसी पोलिस स्टेशनला बदलून गेलेले मुकेश पाटील, किशोर पाटील व सुधीर साळवे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, प्रमोद पाटील, राजू मेंढे, संजय हिवरकर यांचे पथक देखील फरार आरोपींच्या शोधार्थ रवाना झाले.

या गुन्हयातील संशयीत आरोपी गणेश दंगल सोनवणे, विशाल संजय साळुंखे,हे दोघे संशयीत आरोपी आसोदा रेल्वे गेट परिसरातून पळून जात असल्याची गुप्त माहिती पोलिस कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे यांना समजली.

त्यांनी तात्काळ आपल्या सहका-यांच्या मदतीने आसोदा रेल्वे गेटजवळ सापळा रचून गणेश दंगल सोनवणे व  विशाल संजय सांळुखे या दोघांना अवघ्या दोन तासाच्या आत शिताफीने जेरबंद केले. काही तासांनी रुपेश संजय सपकाळे व महेश राजु निंबाळकर यांना देखील जळगाव शहरातून पळून जाण्याच्या बेतात असतांना ताब्यात घेत अटक करण्यात यश मिळवले.

खोलात जावून पाहिले असता हा वर्चस्वाचा वाद असल्याचे लक्षात येते. जळगाव शहरात अधून मधून गँगवॉर डोके वर काढत असते. या घटनेतील मयत राकेश व हल्लेखोर गणेश, विशाल यांच्यात देखील वर्चस्वाचा वाद असल्याचे बोलले जात आहे.

सर्व संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सुरुवातीला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंता व पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे तसेच त्यांचे सहकारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here