दत्तक पुत्र म्हणाला साप चावला बापाला ! पोलिसांनी उघड केले खूनाच्या पापाला !!

बुलढाणा : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात शेगाव हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या शेगाव तालुक्यातील पुर्णा नदीकिनारी सगोडा हे संमिश्र लोकवस्तीचे गाव वसलेले आहे. या गावात गजानन दळभंजन व निवृत्ती दळभंजन हे दोघे भाऊ रहात होते. यातील गजानन यास दोन मुले होती मात्र निवृत्ती यांना एकही मुलबाळ झाले नाही. त्यामुळे निवृत्ती यांनी आपल्या वृद्धापकाळात काळजी घेण्यासाठी भाऊ गजानन याचा मुलगा सोपान यास दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. सर्व विचाराअंती भावाचा मुलगा सोपान यास दत्तक घेण्याचा निर्णय निवृत्ती दळभंजन यांनी अमलात आणला.

santosh Tale Police inspector

सगोडा या गावी सर्वांना परिचीत असलेले निवृत्ती दळभंजन हे सलोख्याचे संबंध ठेवून होते. या गावात ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी निवृत्ती दळभंजन यांचा शेतात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची खबर गावभर पसरली. त्यामुळे त्यांच्या शेतात गावकऱ्यांनी एकच गर्दी केली.

गावातील प्रत्येकाशी अत्यंत सलोख्याचे संबध असलेल्या निवृत्ती दळभंजन यांचा मृतदेह पाहून अनेकांची मने गहिवरली. त्यांचा दत्तक पुत्र सोपान जोरजोरात आक्रोश करु लागला. गावकऱ्यांनी निवृत्ती दळभंजन यांना त्वरित शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत निवृत्ती यांच्या मृतदेहाची सखोल तपासणी केली. तपासणी अंती वैद्यकीय अधिका-यांनी हा सर्पदंश नसून गळा आवळून खून असल्याचा अहवाल दिला. मयत निवृत्ती दळभंजन यांच्या गळ्यावर आवळल्याचे व्रण दिसत होते. सर्पदंश झाला नसल्याचे समजताच गावकरी गोंधळात पडले. मृतदेह पुढील तपासकामी फॉरेंन्सिक लॅब अकोला येथे रवाना करण्यात आला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी निवृत्ती यांचा खून झाला असल्याचा अहवाल दिला. या अहवालामुळे गावात पुन्हा खळबळ माजली. शेगांव ग्रामीण पोलिसांनी या खूनाचा छडा लावण्याकामी हालचाली गतीमान केल्या.

मयत निवृत्ती यांचे गावात कुणासोबत काही वाद होते का?, त्यांचा खून कुणाला फायदेशीर ठरु शकतो. घटनेच्या दिवशी त्यांचा दिनक्रम काय होता. त्यांना सर्वात पहिले मृतावस्थेत कुणी पाहीले? या सर्व घटकांची चाचपणी करण्यात आली.

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलिस नाईक सुरेश हरणे यांनी गोपनीय माहिती संकलीत करण्यास सुरुवात केली.

Arvind kumare PSI

मयत निवृत्ती दळभंजन यांचेवर सगोडा या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत मृदू भाषी असलेल्या निवृत्ती दळभंजन यांचा खून कुणी  व का केला असावा याची गावात चर्चा सुरु झाली होती. पोलिसांनी प्रत्येक दिशेने तपास सुरु केला.  मात्र संशयास्पद काहीच वाटत नव्हते. तपास फिरुन फिरुन मयताचा दत्तक मुलगा सोपान याच्यावर येवून स्थिरावत होता. त्यामुळे सोपान बाबत पोलिसांनी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली.

मयत निवृत्ती दळभंजन यांनी सोपान यास दतक घेतले होते. त्याचा विवाह सुद्धा करुन दिला होता. मात्र वेळोवेळी खर्चास लागणारे पैसे मयत निवृत्ती दळभंजन हे सोपान यास देत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

सुरुवातीला त्याला चौकशीकामी  बोलावण्यात आले. त्याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणला. मात्र त्याला विश्वासात घेवून त्याला भावनीक रितीने तयार करण्यात आले. मग मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आपणच आपल्या पित्याची हत्या केली असल्याची कबुली त्याने पो.नि. संतोष टाले यांच्याजवळ दिली. त्याने सर्व घटनाक्रम कथन केला.

गजानन आणि निवृत्ती हे दोघे भाऊ होते. गजानन यांना दोन मुले होती. निवृत्ती यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी म्हातारपणाची काठी म्हणून मोठा भाऊ गजानन यांचा मुलगा सोपान यास दोन वर्षापुर्वी दतक घेतले होते. त्यांचेकडे ५ एकर शेती होती. तसेच वडिलोपार्जित काही शेती होती. सोपान यास दत्तक घेतल्यानंतर त्याचा विवाह त्यांनी मोठ्या धूमधडाक्यात लावून दिला होता.

मात्र सोपान यास कधी कधी खर्चाला पैसे रहात नव्हते. त्यामुळे तो अडचणीत येत होता. निवृत्ती दळभंजन त्याला पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. दोन वर्ष लोटले तरी बाप पैसे देत नसल्याने दत्तक पुत्र सोपान अस्वस्थ झाला होता. त्यातच सोपनची पत्नी गरोदर असल्याने तिच्या उपचारासाठी नेहमी पैसे लागत होते.

तिला दवाखान्यात न्यावे लागत असल्यामुळे त्याला पैसे लागत होते. मात्र त्याचे वडील त्याला पैसे देत नव्हते. त्यामुळे  सोपान वैतागला होता. त्यामुळे तो शेती नावावर करुन देण्याचा मयत निवृत्ती यांच्याकडे तगादा लावत होता.

मात्र निवृत्ती दळभंजन यांनी त्याला मी जिवंत असे पर्यंत शेती मिळणार नाही असे त्याला ठणकावून सांगितले होते. वडिलोपार्जित असलेली काही शेती निवृत्ती यांनी पत्नीच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सोपान चिडला होता.

वडील जिवंत असेपर्यंत आपल्याला दमडीची संपत्ती मिळणार नाही असे मनाशी म्हणत त्याने आता निवृत्ती यांना संपवण्याचा निर्णय घेतला होता. मनातच त्याने एक योजना आखली.  बाप ५ वाजता शेतात नियमितपणे गवत आणण्यासाठी जात असे. त्यावेळी शेतात कुणी नसते हे त्याला ठावुक होते. त्याचवेळी निवृत्ती यांचा खून करुन टाकू असे त्याने मनाशी ठरवले.

४ ऑक्टोबर रोजी सोपान दुपारी ४ वाजता शेतात गेला आणि बाप निवृत्ती यांची येण्याची वाट पाहू लागला. नियमितपणे गुरांसाठी गवत आणणारा निवृत्ती दळभंजन सायंकाळी ५ वाजता शेतात आला आणि गवत कापू लागला. बाप गवत कापण्यात दंग असल्याची संधी साधून दत्तक पुत्र सोपान याने निवृत्ती यांच्या गळ्यात मागून दोरी टाकली आणी लागलीच पुर्ण ताकदीने काही कळायच्या आत त्यांना गळफास दिला. काही क्षणात तडफडत निवृत्ती दळभंजन यांनी जागीच जीव सोडला.

त्यानंतर काही वेळ विचार करत सोपान याने अनुकुचीदार ताराने मयताच्या डाव्या पायावर सर्पदंश झाला असे भासावे म्हणून दोन खुणा केल्या आणि गावात पळत जावून निवृत्ती यांना साप चावल्याचे सांगू लागला. गावक-यांनी मृतदेह आणि पायावरील दोन खुणा पाहून त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मात्र रुणालयात डॉक्टरांनी सर्पदंश झाला नसल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी गळ्यावर व्रण पाहिल्यामुळे संशयाला पुष्टी मिळाली.

अवघ्या २४ तासात शेगांव ग्रामीण पोलिसांनी घटना उजेडात आणून आरोपी जेरबंद केला. अल्पावधीत कोणताही पुरावा नसताना शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटना उघडकीस आणल्याने सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक अरविंद चावरीय, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत ,पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरिक्षक अरविंद कुमरे, पो.हे.कॉ. सुरेश हरणे, सुरेंद्रसिंह चव्हाण, सहायक फौजदार अगडते ,पो.कॉ. मुकेश पवार यांनी पुर्ण केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here