माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे : जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या संचालकांच्या अपहरणासह गळ्याला चाकू लावून राजीनामे देण्यासाठी दबाव टाकणे तसेच 5 लाख रुपयांची खंडणी उकळणे अशा विविध आरोपाखाली माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर कोथरुड पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅड. विजय भास्करराव पाटील (53) रा. दीक्षितवाडी, जळगाव हे या प्रकरणी फिर्यादी आहेत. या घटनेबाबत सुरुवातीला जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला 9 डिसेंबर रोजी फिर्याद दाखल करण्यात आली होती. मात्र या घटनेचा प्रकार जानेवारी 2018 या कालावधीत कोथरुड येथील हॉटेल किमया येथे घडला आहे. त्यामुळे हा गुन्हा शुन्य क्रमांकाने दाखल झाल्यानंतर तो कोथरुड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह तानाजी केशव भोईटे, निलेश रणजित भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, अलका संतोष पवार, सुषमा इंगळे अशा विविध जणांसह एकुण 28 जणांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेच्या गैरकारभारामुळे शासनाने या संस्थेवर सन 2012 मधे प्रशासकाची नियुक्ती केली होती. त्यानंतर सन 2015 मधे झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील, विजय पाटील व इतर अठरा जण निवडून आले होते. या निवडणूकीत त्यावेळचे मंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांचा पराभव झाला होता.

जानेवारी 2018 या कालावधीत फिर्यादी अ‍ॅड. विजय पाटील यांना निलेश भोईटे यांचा फोन आला व त्यांनी संस्थेची जुनी कागदपत्रे देण्यासाठी पुण्यात बोलावले. तानाजी भोईटे यांना जळगाव शहरात येण्यास मनाई असल्याने पाटील यांना पुणे येथे बोलावण्यात आले. हॉटेल किमया येथे तानाजी भोईटे यांनी ही संस्था गिरीश महाजन यांना हवी आहे़, ती संस्था आमच्या ताब्यात देऊन टाका व त्याबदल्यात गिरीष महाजन एक कोटी देण्यास तयार आहे, असे सांगितले. पाटील व महेश पाटील यांनी त्यासाठी नाही म्हटले.

नकार मिळाल्यानंतर निलेश भोईटे यांनी गिरीश महाजन यांना व्हॉटसअ‍ॅप कॉल केला. गिरीष महाजन यांनी तू सर्व संचालकांचे राजीनामे घेवून मराठा विद्या प्रसारक संस्था निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपव असे सांगितले. त्याला पाटील यांनी त्यासाठी नकार दिला.

अ‍ॅड. विजय पाटील यांना सदाशिव पेठेत घेवून गेल्यावर तेथे त्यांचे हात पाय बांधून मारहाण करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांचे कपडे काढून डांबुन ठेवण्यात आले. सर्व संचालकाचे राजीनामे नाही आणले तर एमपीडीए च्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची त्यांना धमकी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
राजीनामे देण्यास नकार दिल्यामुळे खंडणीच्या स्वरुपात 5 लाख रुपये घेऊन संस्थेत कुर्‍हाडीसह प्रवेश करत तोडफोड करुन संस्थेच्या कर्मचार्‍याच्या खिशातील 5 हजार रुपये व दोन तोळ्याची चैन तोडून घेऊन गेल्याबाबत म्हटले आहे. आरोपींनी फिर्यादी व इरातंना संस्थेत जाण्यास मज्जाव केला असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. कोथरुड पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here