युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज ”श्रुतमहोदधी” पदवीने सन्मानीत

जळगाव : कृषी क्षेत्रात आपल्या कार्याची जगाच्या पाठीवर ओळख निर्माण करणारे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री असलेल्या वाकोद या जामनेर तालुक्यातील नगरीत हा अभिनंदन सोहळा महत्वाचा समजला जात असल्याचे विचार प.पू. महेंद्रऋषीजी म.सा. यांनी म्हटले आहे. आपल्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते.

वाकोद येथील हिराहस्ती समाज मंदिरात प्रज्ञामहर्षी युवाचार्य प.पु. महेंद्रऋषीजी महाराज यांचा ”दिव्यपद सन्मान सोहळा 5 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित केला होता. त्या प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमास सेवादास दलीचंदजी जैन, कविवर्य ना. धों. महानोर, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, अशोकभाऊ जैन, अमर जैन, प्रकाश समदडीया आदि मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे सर्वतोपरी पालन यावेळी करण्यात आले. उपस्थित सर्वांच्या डोक्यावर राजस्थानी पगडी, मुखावर मास्क व गळ्यात जैन रंगाचे प्रतीक असलेले वस्त्र होते.

प्रज्ञामहर्षि, आगमज्ञाता युवाचार्य प्रवर परमपूज्य श्री. महेंद्रऋषीजी म. सा., उपप्रवर्तक परमपूज्य श्री. अक्षयऋषीजी म. सा. आदी ठाणा पाच यांच्या चातुर्मासाचा सहवास जळगाव नगरीतील वासीयांना लाभला होता. चातुर्मास पश्चात जळगाव येथून विहार करत वाकोद येथे संत आदि ठाणा पाच विराजमान झाले. या औचित्याने जळगाव जिल्हा श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांना ”श्रुतमहोदधी” पदवी देऊन मानपत्र प्रदान करत सन्मान करण्यात आला. सेवादास दलीचंदजी जैन, रमेशदादा जैन यांच्याहस्ते संतद्वयांना चादर ओढण्यात आली. कान्हदेश शिरोमणी-उपप्रवर्तक अक्षयऋषी यांनादेखील आदररुपी चादर ओढण्यात आली.

सुरुवातीला अपूर्वा राका, मीनल समदडीया, ममता कांकरिया यांनी मंगलाचरण गायीले. प.पू. अचलऋषी महाराज, प्रकाश समदडीया, प.पू. अमृतऋषी महाराज, महावीर गोलेछा, हितमीत भाषी प.पू. हितेंद्रऋषी म. सा. ताराबाई डाकलिया, ईश्वरलालजी साबद्रा, नागपूर श्री संघाचे सदस्य कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. जळगाव येथील श्राविका ताराबाई रेदासनी यांनी गीताच्या माध्यमातून आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. मिनल समदडिया यांनी देखील आपले भाष्य यावेळी केले.

कान्हदेश शिरोमणी उपप्रवर्तक अक्षयऋषी महाराज यांनी उपस्थित श्रावक-श्रावकांशी यावेळी सुसंवाद साधला. जळगांववासीय अतिशय भाग्यवान आहेत की त्यांना प.पू. युवाचार्य महेंद्रऋषिजी म.सा. यांचा चातुर्मास लाभला. कोरोना महामारीमुळे युवाचार्य म.सा. यांना ब-याच मर्यादा आलेल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा युवाचार्यजी यांनी चातुर्मास करावा अशी कान्हदेशवासीयांच्या वतीने यावेळी विनंती करण्यात आली. खरे तर जळगावाचा मंगल प्रवेश जळगाव येथून आरंभ झाला व समारोप श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद आणि जिल्ह्याचे शेवटचे गाव असलेल्या शेंदुर्णी येथे झाल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून कथन केले.

सेवादास व जैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य असलेले दलीचंदजी जैन यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. द्रव्य, क्षेत्र, कल, भाव यानुसार आपापल्या पद्धतीने सर्वांनी चातुर्मासत सेवा कार्य केले. कोरोनामुळे आम्हाला फार काही करता आले नाही. मात्र प.पु. युवाचार्य महेंद्रऋषी यांचे विचार तंत्रज्ञानाचा उपयोग करत घराघरात मात्र पोहोचवता आले ही एक चांगली बाब यावेळी दिसून आली असल्याचे दलिचंदजी जैन यावेळी म्हणाले.

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषी महाराज साहेब लिखित ‘मुनी गुणमंगलमाला’ पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकासाठी दीपकजी ओस्तवाल यांचे चांगले सहकार्य लाभले. मानपत्राचे वाचन नितीन चोपडा यांनी यावेळी केले. अपूर्वा राका यांनी योग्य रितीने सूत्रसंचालन केले. हा समारोह पार पडल्यानंतर सर्व संतांनी पळसखेडा-सोयगाव औरंगाबाद जिल्ह्याच्या दिशेने विहार केला. या कार्यक्रमाचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षपण देखील करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here