तिच्या गालावरची खळी, खुलायची रविंद्रच्या मनातली कळी! बुलेटधारक पतीच्या मारहाणीत संपली त्याच्या प्रेमाची खेळी !!

जळगाव : वयाची तिशी ओलांडलेली ती एक तरुण विवाहिता होती. दोन अपत्य असलेली ती एक माता देखील होती. दररोज सकाळी ती गावाच्या बस स्थानकमार्गे शेतात जात होती. त्या बस स्थानकाजवळच एक मोटार सायकल दुरुस्तीचे गॅरेज होते. त्या मोटार सायकल दुरुस्तीच्या गॅरेज मालकासोबत तिची दररोज नजरानजर होत असे. सुर्यकिरणांच्या साक्षीने गॅरेज मालक व तिचे असे दोघांचे एकमेकांना बघून स्मितहास्य करण्याचा नित्याचा कार्यक्रम ठरलेला होता. सोनेरी सुर्यकिरण आणि सोनेरी पहाटेच्या वेळी त्या विवाहितेच्या गुलाबी ओठांचे स्मित हास्य आणि तिच्या गालावरील खळी बघून गॅरेज मालक रविंद्र महाले मनातल्या मनात मालामाल होत असे. दोघे एकमेकांना बघून खुदकन गाल्यातल्या गालात हसत होते. चालतांना तिच्या डोईवरील पदर ढळला म्हणजे तिच्या लांबसडक केशसंभाराचे त्याला दर्शन होत असे. एकुणच तिचे वागणे, हसणे व बोलणे त्याला भारी आवडत होते. 

श्री स्वामी समर्थ मोटारसायकल गॅरेज अशा ठळक शब्द रचनेतील व्यावसायीक फलक रविंद्र महाले याने त्याच्या ग़ॅरेज वजा टपरीवर लावला होता. मोटार सायकल दुरुस्तीचे गॅरेज हे त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. सर्व प्रकारच्या मोटारसायकल दुरुस्तीची कामे तो कुशलतेने करत होता. गॅरेजवर मदतनीस म्हणून वैभव शेळके हा त्याच्या भावाचा शालक त्याच्याकडे शिकावू कारागीर म्हणून कामाला होता.

गॅरेज मालक रविंद्र महाले हा 27 वर्ष वयाचा अविवाहीत तरुण होता. ती विवाहिता त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. तिने तिशी ओलांडली होती. तरीदेखील तिने त्याला व त्याने तिला लाईक केले होते. ती समोर आली म्हणजे इकडे रविंद्र महालेच्या ओठांवरुन जिभ फिरण्यास सुरुवात होत असे. तिचा कमनीय बांधा रामप्रहरी बघण्यास तो आतुर होत असे.

दिवसामागून दिवस जात होते. कॅलेंडरच्या तारखा देखील बदलत होत्या. मात्र दोघांच्या नजरेचा खेळ काही केल्या बदलत नव्हता. हळूहळू या नजरेच्या खेळात प्रगती होत गेली आणि रंगत देखील येवू लागली. दोघांच्या नजरेचा खेळ इश्कात परावर्तीत होण्यास वेळ लागला नाही. लांब अंतरावरुन येणारी ती विवाहीता त्याच्या काकनजरेस पडण्यास वेळ लागत नव्हता. तिचा दर्प, आवाज आणि आभास त्याला चांगल्या प्रकारे परिचीत झाला होता. तिच्या पैंजनाची छमछम, तिच्या आखीव, रेखीव आणि कोरीव मुर्तीसमान असलेला बांधा बघून तो मंत्रमुग्ध होत असे. तिचे कंबर लचकत आणि नाक मुरडत चालणे रविंद्रला भारी आवडत होते. वास्तविक ती एक विवाहिता होती. ती दोन अपत्यांची माता होती. तिचे वय त्याच्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे तिच्याकडे अशा फाजील नजरेने बघणे रविंद्रसाठी योग्य नव्हते. तिनेदेखील त्याला हसून प्रतिसाद देणे तिच्यासाठी योग्य नव्हते. मात्र दोघांचा नजरेचा खेळ काही केल्या थांबण्याचे नाव घेतच नव्हता.

जामनेर तालुक्यातील वाकोद या लहानशा गावात ती विवाहिता रहात होती. तिचा पती रमेश (काल्पनिक नाव) कपाशीचा व्यापारी होता. व्यापाराच्या निमित्ताने तिचा पती रमेश यास अनेकदा बाहेरगावी जाण्याचा योग येत असे. अशा वेळी तिच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या गॅरेज मालक रविंद्रकडे ती आकर्षित झाली होती. रविंद्रचे बाहु पिळदार होते. तो दिसायला आकर्षक होता. पोटावर त्याचे सिक्स पॅक होते. दोघे एकमेकांच्या रुपावर भाळले होते.

पतीच्या गैर हजेरीत तिच्या व रविंद्रच्या प्रेमाला चांगलाच बहर आला होता. दोघांचे प्रेमसंबंध गावातील काही लोकांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. हळूहळू तिचा पती रमेश यास हा प्रकार समजण्यास वेळ लागला नाही. आपल्या पत्नीचे गॅरेजमालक रविंद्र महाले सोबत असलेले संबंध समजल्यामुळे तो देखील मनोमन नाराज झाला होता. त्याच्या मनात रविंद्र बद्दल द्वेषाची भावना निर्माण झाली. रविंद्रच्या  पार्श्वभागावर काठीचे दोन प्रभावशाली रट्टे मारुन समज देण्याचा त्याने मनोमन विचार केला. त्यानुसार त्याने नियोजन देखील सुरु केले.

सन 2020 हे आपल्या जिवनातील अखेरचे वर्ष असेल याचा विचार देखील रविंद्रने मनाशी केला नसेल. रविंद्रला रट्टे दिल्यामुळे सन 2020 मधे आपल्याला जेलची हवा खावी लागेल याचा देखील विचार रमेशने मनाशी केला नव्हता. मात्र नियतीला तसेच मंजुर होते आणि झाले तसेच.  

नित्यनेमाप्रमाणे 26 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता रविंद्र गॅरेजवर गेला. दुपारी बारा वाजेपर्यंत त्याचे गॅरेजवर मोटार सायकल दुरुस्तीचे कामकाज सुरु होते. दुपारी बारा वाजता रविंद्रचा भाऊ अशोक त्याचे पान टपरीसाठी लागणारा सामान घेण्यासाठी दुचाकीने जळगावला जाण्यास निघाला. त्यावेळी रविंद्र त्याच्या गॅरेजवर काम करत होता.

आज काहीतरी निमीत्त करुन रविंद्र यास आपल्या शेतात बोलावून एकटे गाठून त्याला अद्दल घडवायची असे त्या विवाहितेचा पती रमेशने (काल्पनिक नाव) मनाशी ठरवले होते. आपल्या पत्नीसोबत रविंद्रचे असलेले प्रेमसंबंध त्याला समजले होते. त्यामुळे रविंद्रच्या पार्श्वभागावर दोन प्रभावशाली रट्टे मारले म्हणजे त्याच्यात सुधारणा होईल, तो पुन्हा आपल्या पत्नीच्या नादी लागणार नाही असा रमेशच्या मनात विचार सुरु होता. त्यानुसार त्याने नियोजन देखील सुरु केले.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास रमेश त्याची बुलेट घेवून गॅरेजवर गेला. त्याने रविंद्रला म्हटले की आमच्या शेतात पपईचे व्यापारी आलेले आहेत. तसेच शेतात माझ्या दुस-या मोटारसायकलची चेन तुटलेली आहे. ती चेन जोडणे गरजेचे आहे. तु माझ्या बुलेटवर डबलसिट बसून माझ्यासोबत शेतात चल. तेथे जागेवरच शेतातील मोटारसायकलची चेन बसवून दे. यावेळी गॅरेजवर शिकावू कारागीर म्हणून रविंद्रच्या भावाचा शालक वैभव शेळके हजर होता. त्यावेळी दुपारचे साधारण साडेबारा वाजले होते. मोटार सायकलची चेन बसवण्यासाठी आवश्यक असणारे पान्हे सोबत घेत रविंद्र बुलेटवर बसला. 

त्यावेळी शेतात अगोदरच रमेशचा भाचा व शालक, शालकाचा मित्र व शेत सालदार असे हजर होते. बुलेटवर आणलेल्या रविंद्र यास बांबुने मारहाण करण्याचा प्लान केवळ बुलेट चालक रमेशसह त्याचा भाचा व शालक यांनाच माहिती होता. शालकासोबत आलेल्या मित्राला देखील आता काय होणार आहे हे माहिती नव्हते.

मोटार सायकलची तुटलेली चेन दुरुस्त करण्याचा बहाणा करुन गॅरेज मालक रविंद्र यास शेतात आणले गेले. रविंद्र बुलेटवरुन खाली उतरला. चेन दुरुस्तीसाठी खाली वाकताच रविंद्र यास रमेशसह त्याच्या भाच्याने व शालकाने धरले. तिघांनी मिळून रविंद्रच्या पायावर बांबूने मारहाण सुरु केली. त्यानंतर काही वेळाने रविंद्रचे पाय ठिबकच्या नळीने बांधण्यात आले. त्याला तशाच अवस्थेत तिघांनी मिळून ओढत ओढत पपईच्या शेतात नेले. पुन्हा त्या ठिकाणी त्याला  बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीशी आपला काही संबंध नाही असे दर्शवण्यासाठी रमेशने जवळच असलेल्या अल्पवयीन शेतमजुराला बोलावून घेतले. चाकूचा धाक दाखवून त्याने त्या अल्पवयीन शेतमजुरास रविंद्रला मारहाण करण्यास भाग पाडले. अल्पवयीन शेतमजूराने नाईलाजाने बांबूने रविंद्रला मारहाण सुरु केली. त्यावेळी रमेशने या मारहाणीचा प्रकार त्याच्या मोबाईलमधे चित्रीत केला. या मारहाणीशी आपला संबंध  नसून या अल्पवयीन मजुराचा संबंध असल्याचे दर्शवण्यासाठी त्याने हे चित्रीकरण सुरु केल्याचे म्हटले जाते.

अर्धमेल्या रविंद्रला दवाखान्यात सोडून देण्यासाठी रमेशच्या शालकासह त्याच्या मित्राने त्याला मोटारसायकलवर मध्यभागी बसवले. मात्र रविंद्रने आपला जिव सोडला होता. त्याचा श्वासोश्वास थांबलेला होता. त्याला केवळ मारहाण करणे एवढाच रमेशचा उद्देश होता. मात्र रविंद्रला बेतापेक्षा जास्त मार बसल्यामुळे त्याने या जगाचा सरत्या वर्षातच निरोप घेतला होता. आता याच्या मृतदेहाचे करायचे काय असा विचार त्यांना पडला. त्यामुळे सरकारी दवाखान्यात नेण्यापुर्वी रस्त्यातच मृत्युमुखी पडलेल्या रविंद्रला बेवारस सोडून त्यांनी पलायन केले.

दरम्यान गॅरेजवर कामाचा खोळंबा झालेला होता. आलेले ग्राहक रविंद्रची वाट बघत होते. शिकावू कारागीर वैभव शेळके याच्याकडून ग्राहकाच्या मोटारसायकलची चेन उघडत नव्हती. त्यामुळे तो देखील रविंद्रची गॅरेजवर येण्याची वाट बघत होता. त्यावेळी त्याला समजले की गॅरेजमालक रविंद्र महाले हा सरकारी दवाखान्याच्या रस्त्यावर मयत अवस्थेत पडलेला आहे. त्याचा अपघात झाला असल्याची वार्ता सर्वत्र पसरली होती. प्रत्यक्षात त्याचा मारहाणीत मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती पहुर पोलिस स्टेशनला समजताच पो.नि. राहुल खताळ व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक किरण बर्गे, अमोल देवढे, हे.कॉ. भरत लिंगायत, पोलिस नाईक विनय सानप व चंद्रकांत ब्राम्हणे अशांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली होती. तो मोटार सायकल मॅकेनिक व गॅरेजमालक रविंद्र महाले असल्याचे लोकांनी ओळखले होते. त्याच्या मृतदेहाची पाहणी केली असता त्याच्या पार्श्वभागावर जोरदार प्रभावशाली फटके बसल्याचे दिसून येत होते. त्याच्या पायावर देखील मारहाण झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे हा अपघात नसून मारहाणीत झालेला मृत्यू असल्याचे दिसून येत होते. या गंभीर घटनेची माहिती मिळताच उप विभागीय पोलिस अधिकारी इश्वर कातकाडे यांनी देखील घटनास्थळी भेट देत सर्वतोपरी पाहणी केली. उप विभागीय पोलिस अधिकारी इश्वर कातकाडे यांनी स्वत: या गुन्ह्याच्या तपासकामी लक्ष घातले. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद सीआरपीसी 174 नुसार 57/20 या क्रमांकाने घेण्यात आली. मयत रविंद्र महाले याचा मृतदेह पहुर ग्रामिण रुग्णालयात व तेथून जळगाव सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी नेण्यात आला. रविंद्र महाले याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले होते.

या प्रकरणी तपासकामी गावातील एका झेरॉक्स दुकानावर बसवण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमधे दुपारी बारा वाजेपासूनचे चित्रीकरण तपासण्यात आले. या फुटेजमधे बुलेटवर मयत रविंद्र यास बुलेटधारक रमेश (काल्पनिक नाव) व त्याचा भाचा असे दोघे जण घेवून जात असल्याचे दिसून आले. ज्या वेळेचे हे चित्रीकरण होते तेव्हापासून रविंद्रचा मोबाईल देखील लागत नव्हता. घटना उघडकीस आल्यापासून बुलेटधारक व त्याचा भाचा गावातून बेपत्ता होते. त्यामुळे मयत रविंद्रचा भाऊ अशोक महाले याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहुर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 350/20 भा.द.वि. 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

अशा प्रकारे सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिस यंत्रणेस आरोपींच्या नावाचा शोध लागला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर तपासात क्रमाक्रमाने इतर सर्व आरोपींची नावे व त्यांनी गुन्ह्यात कसा सहभाग घेतला याचा घटनाक्रम समोर आला. त्या सर्वांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मोटार सायकल मॅकेनिक रविंद्र महाले याचे बुलेट धारकाच्या पत्नीसोबत प्रेम संबंध होते. त्यामुळे त्याला इतरांच्या मदतीने त्याने मारहाण केली. प्रत्यक्षात त्याला केवळ मारहाण करुन सोडून देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र बेदम मारहाणीत रविंद्रचा मृत्यू झाला. अटकेतील पाच पैकी एक अल्पवयीन विधीसंघर्षित आरोपी आहे. त्याची न्यायालयाच्या आदेशाने बालनिरिक्षणगृहात रवानगी करण्यात आली. इतर चारही जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर जळगाव सब जेलमधे रवानगी करण्यात आली आहे.

या गुन्ह्यचा पुढील तपास पाचोरा उप विभागाचे उप विभागीय पोलिस अधिकारी इश्वर कातकाडे करत आहेत. त्यांना पहुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक राहुल खताळ व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक किरण बर्गे, पोलिस उप निरिक्षक अमोल देवढे, पो.हे.कॉ. भरत लिंगायत, पोलिस नाईक विनय सानप , पोलिस नाईक चंद्रकांत ब्राम्हणे व पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर बाविस्कर सहकार्य करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here