ज्याने दाखवली उद्योगाची वाट, त्यालाच दाखवली मृत्यूची वाट – पोलिसांनी पिंजला तपासाचा घाट, मिळाली अखेर यशाची लाट

जळगाव : चांगो रामदास झोपे हे एक धनसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून वरणगाव परिसरात प्रसिद्ध होते. भारत सरकार सरंक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्ट्रीत त्यांनी सेवा बजावली होती. कामगार युनीयनचे पदाधिकारी असलेले चांगो झोपे अकरा वर्षापुर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतर चांगो झोपे यांनी पुर्णवेळ शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवसायात स्वत:ला झोकून दिले होते. ते रहात असलेल्या वरणगाव येथील जागेला त्यांनी झोपेवाडा असे नाव दिले होते. सत्तरीच्या घरातील चांगो झोपे यांच्या अंगावरील सोन्याचे मुल्य जवळपास दिड लाख रुपयांच्या घरात रहात होते. एकंदरीत त्यांचे ऐश्वर्य आणि धनसंपदा वरणगाव परिसरात जगजाहीर होती. त्यांचा चिरंजीव राकेश जळगाव पोलिस दलात आणि सुनबाई ऑर्डनन्स फॅक्ट्रीत केंद्र सरकारच्या सेवेत आहे. चांगो झोपे यांची पेन्शन व शेतीसह प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय, मुलासह सुनेचा दुहेरी पगार अशा चौपदरी मार्गाने लक्ष्मीचा ओघ झोपे परिवारात सुरु होता. एकंदरीत झोपे परिवाराचे सर्व काही व्यवस्थित सुरु होते. चांगो झोपे यांनी वरणगाव परिसरात सर्वांसोबत सलोख्याचे संबंध निर्माण केले होते.

mayat chango zope

चांगो झोपे रहात असलेल्या घराजवळ खिडकी मोहल्ला भागात शेख समीर शेख कादीर आणि शेख जावेद शेख खलील हे दोघे तरुण रहात होते. समीर हा बांधकाम ठेकेदार तर जावेद हा मजुर होता. समीर आणि जावेद हे दोघे जवळचे नातेवाईक देखील होते. ठेकेदार समीर हा राकेश झोपे याचा बालपणापासूनचा मित्र होता. त्यामुळे दोघे एकमेकांना चांगल्या प्रकारे परिचित होते. त्या माध्यमातून समीरचे झोपे परिवाराकडे नेहमी येणे जाणे होते. हळूहळू समीरने राकेशचे सेवानिवृत्त वडील चांगो झोपे यांचा विश्वास संपादन केला होता.

चांगो झोपे यांचा वरणगाव परिसरात दांडगा जनसंपर्क होता. त्यांच्या ओळखीने समीर शेख यास बांधकामाचे कंत्राट मिळत होते. चांगो झोपे यांच्या माध्यमातून मिळणा-या बांधकाम कंत्राटामुळे समीर व जावेद या दोघांची अर्थव्यवस्था ब-यापैकी चालत होती. लवकरच समीर शेख हा चांगो झोपे व राकेश झोपे या पिता पुत्रांचा एक विश्वासू सहकारी झाला. कित्येक वेळा समीरच्या विश्वासावर चांगो झोपे अथवा त्यांचा मुलगा राकेश घर सोडून जात होते.

जानेवारी महिन्यात सुट्यांचा अंदाज घेत राकेशने पत्नीसोबत गोवा येथे फिरायला जाण्याचा बेत आखला. गोव्याच्या समुद्र किनारी पती पत्नीला मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटता यावा म्हणून राकेशने दोघा मुलांना त्यांच्या मामाकडे पाठवून दिले. प्रवासाचे नियोजन करत 23 जानेवारी रोजी राकेश त्याच्या पत्नीसह गोव्याच्या दिशेने रवाना झाला. मुलगा व सुन गोव्याला तर नात, नातू मामाच्या गावी गेल्यामुळे चांगो झोपे घरी एकटेच होते.  

दरम्यान चांगो झोपे यांच्या एका परिचिताचे वरणगाव येथे बांधकाम सुरु होते. त्या बांधकामाचे कंत्राट चांगो झोपे यांच्या माध्यमातून समीर यास मिळाले होते. त्या बांधकामासाठी लागणारे साहित्य आणण्याकामी जवळपास 65 हजार रुपयांची रोकड चांगो झोपे यांच्याकडे जमा असल्याचे म्हटले जाते. झोपे यांच्याकडे सुमारे 65 हजार रुपये असल्याचे समीर यास समजले होते.  

राकेश सपत्नीक गोव्याला गेल्यामुळे घरात त्याचे वडील एकटेच रहात होते. काही दिवसांनी घरातील 65 हजार रुपयांची रोकड त्यांना आढळली नाही. ती रक्कम कुठे गेली असा प्रश्न त्यांना पडला. घरातील 65 हजार रुपये कुठे गेले असा थेट प्रश्न त्यांनी समीर शेख यास केला. त्यावर आपल्याला काही माहिती नाही असे म्हणत समीरने हात वर केले. आपण ते पैसे घेतले नाही, आपल्याला काही माहिती नाही असे समीर म्हणत असला तरी चांगो झोपे यांना त्याच्या बोलण्यावर आता विश्वास बसत नव्हता. झोपे यांच्या संशयाची सुई समीरच्या दिशेने जात होती.

बराच वेळ या विषयावर खल केल्यानंतर त्यांनी समीर यास म्हटले की माझा मुलगा राकेश आल्यावर या विषयाचा सोक्षमोक्षच लावतो. राकेश आल्यावर मी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून बघतो आणी मगच खरा प्रकार काय आहे ते समोर आणतो. गोव्याहून घरी आल्यानंतर राकेशने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास व त्यात आपला सहभाग उघड झाल्यास आपले पितळ उघडे पडेल अशी भिती समीर यास सतावू लागली. चोराच्या मनात चांदणे या म्हणीप्रमाणे समीरचे मन त्याला खावू लागले.

आठ दिवसांची सुटी काढून राकेश सपत्नीक गोवा येथे गेला होता. दरम्यानच्या कालावधीत चांगो झोपे यांच्याकडून समीरकडे त्या 65 हजाराचा तगादा सुरुच होता. मला उद्याच्या उद्या पैसे हवेत असा तगादाच चांगो झोपे यांनी समीरकडे लावला होता. त्या तगाद्याला समीर वैतागला आणी बेजार झाला होता. राकेश गोव्याहून परतण्यापुर्वी त्याचे वडील चांगो झोपे यांचा जावेदच्या मदतीने कायमचा काटा काढण्याचे समीरने मनाशी  ठरवले.

29 जानेवारी रोजी राकेश व त्याची पत्नी गोव्याहून परतीच्या प्रवासाला निघाले. त्याच दिवशी समीर व जावेद यांनी चांगो झोपे यांना या जगातून हद्दपार करण्याचे नियोजन केले होते. समीर व जावेद यांनी चांगो झोपे यांना रावेर तालुक्यातील पाल येथे जातांना लागणा-या घाटात दगडाने ठेचून फेकून देण्याचे नियोजन केले. सावदा  येथे कपाशीच्या व्यापा-याकडून आपल्याला मोठी रक्कम मिळणार असल्याचे समीरने झोपे यांना सांगितले. त्यासाठी आपल्याला सावदा व पुढे पाल येथे जावे लागणार असल्याचे झोपे यांना सांगण्यात आले. आपल्याला आपली रक्कम मिळणार असल्याचे समजून झोपे यांनी समीर सोबत सावदा येथे जाण्याची तयारी दर्शवली.

या नियोजनाचा भाग म्हणून समीरने जावेदला मोटार सायकल घेवून झोपे यांच्या घरी पाठवले. जावेद त्यांना मोटारसायकलने घेवून येण्यापुर्वी समीर वरणगाव येथील गुरांच्या बाजाराजवळ कार घेवून हजर होता. जावेदने झोपे यांना मोटार सायकलने वरणगाव येथील गुरांच्या बाजाराजवळ आणले. समीरने त्यांना कारमधे बसण्यास सांगीतले. त्यांच्यासोबत जावेद देखील कारमधे बसला. तिघे जण मुक्ताईनगरमार्गे सावदा येथे जाण्यास रवाना झाले. वाटेत दिपनगर जवळ झोपे यांना राकेश व त्याच्या पत्नीचा फोन आला. आम्ही वरणगाव येथे काही तासात येत आहोत. तुम्ही घरीच रहा असे दोघांनी त्यांना म्हटले. मी आता दिपनगरला असल्याचे झोपे यांनी मुलगा राकेश व त्याच्या पत्नीला सांगीतले. आज राकेश परत येत असल्याचे झोपे यांच्या मोबाईलवरील संभाषणातून समीर व जावेद यांच्या लक्षात आले होते. तो परत येण्यापुर्वीच समीर व जावेद यांना चांगो झोपे यांची हत्या करायची होती. झोपे यांना ठार करण्यासाठी दोघांनी अगोदरच एक वजनदार दगड गाडीत आणून ठेवला होता.

समीर व जावेद या दोघांनी मिळून चांगो झोपे यांना दुपारपर्यंत बोलण्यात मग्न ठेवून मस्कावद विवरा, उटखेडा, कुसुंबा, लाल माती व पाल तसेच मध्य प्रदेशातील ब्रिस्टोन या गावापर्यंत फिरवले. या सर्व प्रकारात दुपारचे तिन वाजुन गेले. समीर व जावेद यांनी यापुर्वी सावदा येथील एका खासगी शाळेचे व एका सभागृहाचे बांधकाम केले होते. त्यामुळे दोघांना या परिसराची चांगल्या प्रकारे माहिती होती.

अखेर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बोर घाटातील एका निर्जनस्थळी व्ही पॉईंटजवळ चांगो झोपे यांच्या डोक्यात जवळपास तिन ते चार किलो वजनाचा दगड घालून त्यांचा चेहरा छिन्नविच्छीन्न करण्यात आला. कारमधेच दोघांनी मिळून झोपे यांची हत्या केली. आपल्याला व्यापा-याकडून पैसे मिळणार असल्याचे खोटे सांगून त्यांना फसवून आणले गेले होते. त्यांची अशा रितीने हत्या करण्यात आली. मुलाचा बालपणीचा मित्र असलेल्या समीरनेच झोपे यांची हत्या केली होती. ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच आपली हत्या करेल असा विचार देखील चांगो झोपे यांच्या मनात आला नसेल.

या हत्येनंतर त्यांच्या बोटातील सोन्याच्या तिन अंगठ्या, चांदीची एक अंगठी, गळ्यातील सोन्याचे लॉकेट, मुखात बसवलेले दोन सोन्याचे दात देखील दोघांनी काढून घेतले. हा सर्व ऐवज लाखो रुपयांच्या घरातील होता. त्यांचा मोबाईल फेकून देण्यात आला. एवढे सर्व झाल्यानंतर समीर व जावेद यांनी चांगो झोपे यांचा मृतदेह खोल दरीत फेकून देत तेथून पलायन करत वरणगाव गाठले. सर्व्हिस सेंटरवर जावून त्यांनी गाडीची वाशींग करत सर्व रक्ताचे डाग धुवून टाकले.

दरम्यान दुपारीच चांगो झोपे यांचा मुलगा राकेश आपल्या पत्नीसह घरी पोहोचला. त्यावेळी त्यांना घराला कुलुप आढळून आले. घराला कुलुप असल्यामुळे त्यांनी वारंवार वडीलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे राकेशने त्याच्या ताब्यातील दुस-या चावीने घर उघडले. मात्र आपले वडील कुठे गेले? कुठे असतील? त्यांचा फोन का लागत नाही? या प्रश्नांनी तो व त्याची पत्नी हैरान झाले. दुपारीच त्यांच्यासोबत राकेश व त्याच्या पत्नीचे फोनवर अखेरचे बोलणे झाले होते.

29 जानेवारी रोजी संपुर्ण दिवस व रात्रभर तपास करुन देखील वडील चांगो झोपे यांचा तपास लागला नाही. अखेर राकेशने वरणगाव पोलिस स्टेशन गाठले. स.पो.नि. संदिपकुमार बोरसे यांची भेट घेत त्यांना हकीकत कथन केली. या प्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला 8/21 या क्रमांकाने मिसींग दाखल करण्यात आली. मिसींग दाखल झाल्यानंतर वरणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक संदिपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु करण्यात आला.

स्वत: राकेश याने देखील आपल्या नातेवाईक व मित्रांसह वडील चांगो झोपे यांचा चांगदेव, मुक्ताबाई, हतनुर, टहाकळी, वढवे, काहुरखेडा, मुक्ताईनगर, शिरवेल, ब्रिस्टन, कुंभारखेडा, लालमाती, मध्यप्रदेश आदी भागात तपास केला. मात्र कुठेही तपास लागत नव्हता वा त्यांचा मोबाईलवर संपर्क देखील होत नव्हता. अखेर सोशल मिडीयाच्या माध्यमातून बेपत्ता चांगो झोपे यांची माहिती प्रसारीत करण्यात आली. बेपत्ता झोपे यांची माहिती देणा-यास 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले.

बेपत्ता चांगो झोपे यांना शोधण्याकामी राकेशचा बालपणीचा मित्र मात्र प्रत्यक्षात खरा गुन्हेगार समीर शेख हा मदत करण्याचा बनाव करत होता. तो वारंवार समीर यास धीर देण्याचे नाटक करत होता. चाचा जल्दही दो चार दिनमे वापस आ जायेंगे असे बोलून तो त्याची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. हा सर्व प्रकार पोलिस आणि इतर नातेवाईक बघत होते. पोलिसांच्या पारखी नजरेने समीर शेख याच्यातील खरा गुन्हेगार काही प्रमाणात ओळखला  होता. मात्र तपास लागेपर्यंत त्यांनी आपले पत्ते उघड केले नाही.

1 फेब्रुवारीचा तिसरा दिवस उजाडला. राकेश व त्याच्या पत्नीला अन्नपाणी गोड लागत नव्हते. आपले वडील कुठे असतील? काय करत असतील? कसे असतील? हा एकच प्रश्न राकेश यास सतावत होता. याच दिवशी राकेश यास पाल येथील त्याचे परिचीत असलेले मिलींद भंगाळे यांनी फोनद्वारे एक महत्वाची माहिती दिली. बेपत्ता चांगो झोपे यांच्या वयाशी मिळत्याजुळत्या वयाच्या एका जणाचा मृतदेह खिरोदा ते पाल या मार्गावरील चिंचाटी शिवारातील घाटाच्या दरीत मिळून आल्याचा तो निरोप होता. 

माहिती मिळताच राकेशने तातडीने विनाविलंब सावदा पोलिस स्टेशनला माहिती देत खात्री करण्यासह सहकार्य करण्याची विनंती केली. या घटनेची माहिती समजताच सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक देवीदास इंगोले यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत खात्री केली. घटनास्थळावरील मृतदेहाचा फोटो व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून राकेश यास पाठवण्यात आला.

फोटो बघताच राकेशने तो मृतदेह आपल्या वडीलांचा असल्याचे ओळखले. राकेशने तात्काळ खिरोदा ते पाल दरम्यान निर्जन स्थळी असलेले घटनास्थळ गाठले. दरम्यान सावदा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. आपल्या वडीलांचा मृतदेह बघून पोलिस कर्मचारी राकेशच्या अश्रूंचा बांध फुटला. आपल्याच सहकारी बांधवाचे दुख: बघून त्याला सावदा पोलिसांच्या पथकाने धीर दिला.

मयत चांगो झोपे यांच्या डोक्यावर जखम झालेली होती. त्यांच्या नाका तोंडातून रक्त बाहेर आलेले होते. चेहरा रक्ताने माखलेला होता. राकेशने वडीलांचा मृतदेह निरखून पाहिला असता त्यांच्या हाताच्या बोटातील तिन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची अंगठी, गळ्यातील सोन्याचे लॉकेट व मुखातील दोन सोन्याचे दात गायब असल्याचे आढळून आले.  घटनास्थळावर त्यांचे घड्याळ, पेन, स्वेटर, चप्प्ल, तुटलेला चष्मा अशा वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. कुणीतरी त्यांच्या डोक्यात टणक वस्तूने मारहाण करुन त्यांचा खून केल्यानंतर दरीत फेकून दिल्याचे स्पष्ट दिसत होते.  त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 400 रुपयांचे दागीने चोरुन नेण्यात आले होते. याप्रकरणी राकेश झोपे याने दिलेल्या फिर्यादीनुसार सावदा पोलिस स्टेशनला खूनासह लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा सावदा पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 11/21 भा.द.वि. 302, 392, 201,34 नुसार दाखल करण्यात आला.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले व त्यांच्या सहका-यांनी सुरु केला होता. मृतदेहाची ओळख पटली असली तरी खरा गुन्हेगार कोण व त्याने हा खून का केला हा महत्वाचा तपास बाकी होता. स्थानीक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी वरणगाव पोलिसांसह आपल्या सहका-यांच्या मदतीने वरणगाव येथील मुख्य मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली. मयत चांगो झोपे हे बेपत्ता झाल्याच्या तारखेपासून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यात एका खासगी क्लास व पेट्रोल पंपाच्या सिसीटीव्हीचा आधार घेण्यात आला. त्या तपासणीत एका चारचाकी वाहनात (एमएच 12 केए 3181) चांगो झोपे व त्यांच्यासोबत दोघे जण दिसून आले. त्यातील एक जण चांगो झोपे यांना गुरांच्या बाजारानजीक दुचाकीने घेवून येतांना आढळून आला.

तपासकामी हाच धागा पकडून पुढील तपासाला चालना देण्यात आली. पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक लावंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक डी.डी. इंगोले व वरणगाव पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संदीपकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे समीर शेख  व त्याचा साथीदार जावेद शेख या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान दोघांनी पो.नि.किरणकुमार बकाले यांना कथन केले की आम्ही चांगो झोपे यांना पाल या गावाजवळ सोडले होते. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की मला पाल येथे चार दिवस लागतील. त्यामुळे आम्ही त्यांना तेथेच सोडून परत निघून आलो.

दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्यांनी दोघांना पोलीसी खाक्या दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी आपला गुन्हा कबुल करण्यास सुरुवात केली. त्यांनी खरा प्रकार कथन करत खूनाचा गुन्हा कबुल केला. दोघांना रावेर न्यायालयात हजर करण्यात आले. रावेर न्यायालयाने त्यांना सुरुवातीला तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

65 हजार रुपयांचा तगादा चांगो झोपे यांनी समीर शेख याच्याकडे लावला होता. त्या तगाद्याला वैतागून समीरने जावेदच्या मदतीने दगडाने ठेचून चांगो झोपे यांचा खून केल्याचे कबुल केले. गुन्ह्यात वापरलेली कार समीरने त्याच्या मित्राकडून आणली होती. घटनेच्या दिवशी 29 जानेवारी रोजी दोघांनी झोपे यांना सावदा येथील व्यापा-याकडून पैसे मिळणार असल्याचे खोटे सांगून कारमधे बसवून पाल या गावाकडील निर्जन स्थळी आणले होते. त्यांना मस्कावद, विवरा, उटखेडा, कुसुंबा, लाल माती व पाल तसेच मध्य प्रदेशातील ब्रिस्टोनपर्यंत फिरवून आणल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास बोर घाटातील निर्जनस्थळी व्ही पॉईंट जवळ डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह घाटात फेकून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याच रात्री दोघे जण वरणगाव येथे परत आले. आल्यानंतर त्यांनी सर्व्हिस स्टेशनवर जावून गाडी धुवून घेतली.

पोलिस कोठडी दरम्यान 3 फेब्रुवारी रोजी भुसावळच्या शिवाजी नगर भागातील शेख समीर शेख कादीर याच्या चुलत बहिणीच्या ताब्यातून सोन्याच्या 5 ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट हस्तगत करण्यात आले. पोलिस तपासात एकुण 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा चोरी झालेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना घटनास्थळी नेत झोपे यांच्या मोबाईलचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही. गुन्ह्यात वापरलेला सुमारे तिन किलो वजनाचा दगड देखील हस्तगत करण्यात आला. गुन्ह्यातील कार आरोपींनी धुवून काढली असली तरी स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात संबंधीत पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत. पहिल्या दिवसापासून पोलिसांची दिशाभुल करणा-या समीर व जावेद यांनी अखेर आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पो.हे.कॉ. अनिल इंगळे, रमेश चौधरी, संतोष मायकल, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, विनोद पाटील, नितीन पाटील, शरीफ काझी, रणजीत जाधव, चालक रमेश जाधव, राजेंद्र पवार, इद्रीस पठाण, अविनाश देवरे तसेच सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक देवीदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक आर.डी. पवार, हे.कॉ. पांडुरंग सपकाळे, सहायक फौजदार कोमलसिंग पाटील, हे.कॉ. संजीव चौधरी, हे.कॉ. उमेश पाटील, हे.कॉ. मेहमुद शहा, हे.कॉ. युसुफ तडवी, पोलिस नाईक रिझवान पिंजारी, पो.कॉ. विशाल खैरनार, पोलिस नाईक मेहेरबान तडवी, पो.कॉ. सुनिल कुरकुरे, तुषार मोरे, मोहसीन पठाण, विनोद पाटील यांनी तपासकामी परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक देवीदास इंगोले करत आहेत. आरोपी समीर व जावेद सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here