21 पैसे जादा आकारले – 40 हजाराचा दंड

नांदेड : इंजेक्शन विकतांना 21 पैशांची जास्त आकारणी केल्यामुळे न्यायालयाने नांदेड येथील श्रीराम फार्मा या औषधी दुकानदारास चाळीस हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यंत सजा सुनावली आहे. न्या. सतीष हिवाळे यांनी नांदेड येथील अ‍ॅपेक्स हॉस्पीटल शेजारी असलेल्या श्रीराम फार्मा या दुकानदारास हा दंड सुनावला आहे. चौदा वर्षांनी या शिक्षेची सुनावणी झाली आहे.

नांदेड येथील रहिवासी मुन्ना अब्बास यांनी लेखी वैद्यकीय सल्ल्यानुसार फोर्टविन इंजेक्शन श्रीराज फार्मा येथून विकत घेतले होते. या इंजेक्शनच्या मुळ किमतीपेक्षा 21 पैसे जादा आकारणी केल्यामुळे बिलाच्या पुराव्यासोबत मुन्ना अब्बास यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार तत्कालीन औषध निरिक्षक राज बजाल गोपाल यांच्याकडून तपास करण्यात आला होता. या तपासात एका इंजेक्शनमागे 21 पैसे जादा घेतल्याचे आढळून आले होते.

औषधी व सौदंर्य प्रसाधने कायदा तथा जिवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार श्रीराज फार्मा व त्यांचे भागीदार सदानंद मेडेवार, श्रीकांत पतंगे,अनुसया बाई सूर्यवंशी, प्रकाश कदम, प्रदीप अग्रवाल, राहुल मेडेवार, मोहम्मद जियाउद्दीन यांच्या विरोधात चार्जशिट दाखल करण्यात आले. या प्रकरणी सर्व दोषींनी दंडाची रक्कम चाळीस हजार रुपये तात्काळ जमा केली. 11 फेब्रुवारी रोजी चौदा वर्षांनी हा निकाल देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here