सुन म्हणजे जणू धनाची घागर, समजत होते लोभी सासर! विहीरीच्या पाण्यातच थबकला तिघांचा जिवनरुपी सागर !!

जळगाव : शेतकरी कुटूंबात जन्माला आलेल्या गायत्रीचे लग्न कधी होईल याची विवंचना तिचे वडील दिलीप पुंडलीक पाटील यांना नेहमी सतावत असे. धुळे जिल्ह्याच्या शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी बुद्रुक येथील रहिवासी असलेल्या दिलीप पुंडलीक पाटील यांची घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांना चार मुली व एक मुलगा अशी पाच अपत्ये होती. त्यापैकी गायत्री ही त्यांची तिसरी मुलगी होती. मुलगा दुर्गेश हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला असल्यामुळे तो तेथेच रहात होता. चारही मुलींची लग्ने पार पडल्यामुळे भुमीपुत्र दिलीप पाटील हे जवळपास जिवनातील अनेक जबाबदारीतून मुक्त झाले होते.

गायत्री ही आईवडीलांना जिव लावणारी मुलगी होती. ती विवाहयोग्य झाल्यामुळे तिचे वडील दिलीप पाटील नेहमी तिच्या लग्नाच्या चिंतेत रहात होते. मात्र वेळेवर तिच्या लग्नाचा योग जुळून आला व तिचे लग्न देखील वेळेवर झाले. जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील कनाशी येथील सासर तिला मिळाले. कनाशी येथील निंबा पाटील यांचा मुलगा दिनेश याचे स्थळ त्यांना योग्य वाटले होते. लग्नाची बोलणी यशस्वी झाल्यानंतर दिनेश व गायत्री यांचा विवाह योग्य रितीने पार पडले. ऐपत नसतांना देखील दिलीप पाटील यांनी मुलगी गायत्रीच्या लग्नात सात तोळे सोने हुंड्याच्या रुपात देऊन तिचे लग्न योग्य रितीने मानपान देत पार पाडले.

लग्नानंतर गायत्री कनाशी येथे पती दिनेश समवेत राहू लागली. तिच्या संसाराची गाडी पुढे पुढे सरकत होती अर्थात दिवसामागून दिवस जात होते. तिच्या संसार वेलीवर एक मुलगा व एक मुलगी अशा दोन अपत्यांचे आगमन झाले. मुलाचे नाव खुशवंत आणि मुलीचे नाव भैरवी असे ठेवण्यात आले. बघता बघता खुशवंत दहा वर्षाचा तर भैरवी आठ वर्षाची झाली.संसार म्हटला म्हणजे पती पत्नीत वाद हा ठरलेला असतो. या जगात असा एकही संसार नाही की ज्या संसारात पती पत्नीचा कधी वाद झाला नसेल. त्याला गायत्री व दिनेशचा देखील अपवाद नव्हता. गायत्री व दिनेश यांच्यात अधूनमधून वाद होत होते व नंतर मिटून देखील जात होते. मात्र कालांतराने गायत्रीचा पती दिनेश यास शेती घेण्याचा विचार मनात आला. लग्नात मिळालेले सात तोळे सोने विकून त्या रकमेत शेती घेण्याचे दिनेश याने ठरवले. सोने विकण्याची वेळ आल्यावर भारतीय विवाहीत स्त्री त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विवाहीता नकार देत असते. सोने हे तिच्यासाठी धन असते. गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र विकतांना तिच्या मनाला अतिशय वेदना होत असतात. तीचे मन सोने विक्रीला पटकन धजावत नाही. तशीच गत गायत्रीची झाली होती. ज्यावेळी सोने विकून शेती घेण्याचा विचार तिने पतीकडून ऐकला त्यावेळी तिने त्याला नकार दिला. यामुळे पती पत्नीत वाद होण्यास सुरुवात झाली. मात्र तिच्या पतीने तिचे काहीही ऐकून घेतले नाही. तिचे दागीने विकून पती दिनेशने शेती विकत घेतली. अंगावरील लग्नातील दागिने हातातून गेल्यामुळे तिचे मन व्यथीत झाले होते. याच कारणातून दोघा पती पत्नीत नेहमीच वाद होऊ लागले. या वादातून तिचा पती दिनेश तिला मारहाण देखील करु लागला. तिने हा प्रकार तिचे वडील दिलीप पाटील यांच्या कानावर घातला.

गायत्रीची मुले – खुशवंत आणि भैरवी

दागिने विकून शेती तर घेतली गेली होती. त्यामुळे दिलीप पाटील यांनी लेक गायत्रीची समजूत घातली. जावयाने सोने विकून शेती घेतली तरी आज ना उद्या ती शेती तुझीच होणार आहे. त्यामुळे मनाला लावून घेऊ नको. सुखाने रहा आणि सुखाने संसार कर असे सांगून तिची वडीलांनी समजूत घातली होती. त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले. मात्र गायत्रीच्या नशीबी पतीकडून होणारा छळ काही केल्या थांबत नव्हता.

शेती घेतल्यानंतर आता कनाशी येथे प्लॉट घेण्यासाठी दिड लाख रुपये व थ्रेशर मशीन विकत घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी दिनेश पाटील याने पत्नी गायत्रीच्या माध्यमातून तिच्या माहेरी करु लागला. गायत्रीने आपल्या माहेरुन प्लॉट आणि थ्रेशर मशीन खरेदी करण्यासाठी एकुण दोन लाख रुपये आणावे यासाठी तो तिला त्रास देऊ लागला. वेळप्रसंगी तो पत्नी गायत्रीला मारहाण देखील करु लागला. पतीच्या अशा छळाला आता गायत्री वैतागली होती. तिने हा प्रकार माहेरी वडीलांच्या कानावर घालण्यास सुरुवात केली. पुन्हा तिच्या वडीलांनी तिची व जावई दिनेश  पाटील या दोघांची समजूत घालण्यास सुरुवात केली. आधीच गरीबीचा संसार कसाबसा ओढत असतांना आता एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? असा यक्षप्रश्न गायत्रीच्या वडीलांना पडला. जावई दिनेश पाटील याच्यापाठोपाठ गायत्रीचे सासरे निंबा पाटील, सासु पमा पाटील, जेठ बबन पाटील व जेठाणी सोनी पाटील असे सर्व जण गायत्रीला प्लॉट आणि थ्रेशर मशीन विकत घेण्यासाठी माहेरुन पैसे घेऊन येण्यासाठी त्रास देऊ  लागले. या सर्वांच्या त्रासामुळे गायत्रीचे जगणे मुश्किल झाले होते. हा सर्व प्रकार ती माहेरी वडीलांना सांगत होती. मात्र तिचे वडील दिलीप पाटील हतबल होते. पैसे कुठून आणायचे आणि जावयासह सासरच्या मंडळींची समजूत कशी आणि किती प्रमाणात काढायची या एकाच प्रश्नाने त्यांची झोप उडाली होती.

सणावारानिमीत्त गायत्रीला सासरची मंडळी पाठवत नव्हते. पाठवले तरी तिचा पती दिनेश तिच्यासोबत येत असे व लागलीच दुस-या दिवशी सोबतच परत घेऊन येत असे. त्यावेळी दिलीप पाटील हे जावई दिनेश पाटील यास हात जोडून विनवणी करत असत की मुलगी गायत्रीला कृपा करुन त्रास देऊ नका.या रोजच्या कटकटीला वैतागून गायत्रीच्या मनात आत्महत्येचे विचार थैमान घालू लागले. आपण आत्महत्या केली तर आपल्या पश्चात आपल्या दोन्ही मुलांचे कसे होणार असा देखील विचार तिच्या मनाला स्वस्थ बसू देत नव्हता. आपण आपली जिवनयात्रा संपवली तर आपल्या दोघा गोंडस मुलांचे कसे होणार? ते कुणाला आई म्हणून हाक मारणार? त्यांना वेळच्या वेळी जेवायला कोण देणार? त्यांना शाळेत जातांना जेवणाच डबा आणी दप्तर कोण तयार करुन देणार अशा एक ना अनेक प्रश्नांची भली मोठी जंत्री गायत्रीच्या मनात चमकून जात होती. आत्महत्या करण्याचे विचार तिला स्वस्थ बसू देत नव्हते. आपल्यामुळे आपल्या वडीलांच्या जिवाला देखील त्रास आहे असा विचार ती करत होती. आपणच या जिवनातून बाद झालो तर आपल्या पित्याच्या जिवाला त्रास होणार नाही असा टोकाचा विचार ती करत होती. आपल्या सोबत आपण आपल्या निष्पाप मुलांना देखील घेवून या जगाचा निरोप घ्यायचा एवढा टोकाचा विचार आणि निर्यण गायत्रीने घेतला होता. मात्र आपल्या निष्पाप चिमुकल्या मुलांनी काय गुन्हा केला आहे याचा विचार ती करतच नव्हती. त्यांना कशासाठी आपल्यासोबत घेऊन जिवन संपवायचे असा सकारात्मक विचार ती करतच नव्हती. रिकामे मन सैतानाचे घर असते असे म्हटले जाते. अगदी तसाच प्रकार गायत्रीच्या बाबतीत सुरु होता. तिच्या मनात कायम आत्महत्येचे विचार थैमान घालत होते.

या विहीरीत गायत्रीने आपल्या दोघा मुलांना सोबत घेत उडी घेतली होती.

24 फेब्रुवारी रोजी शेतात भुईमुग निंदणीकामी ती मुलांना सोबत घेऊन शेतात गेली. तिने सोबत मुलांचा जेवणाचा डबा देखील घेतला होता. मात्र गायत्रीच्या मनात वेगळ्याच विचारांचे द्वंद सुरु होते. तिने दोन्ही निष्पाप मुलांना सोबत घेत जवळच असलेल्या विहीरीत उडी मारली. तिच्यासोबत तिचा मुलगा व मुलगी असे दोन्ही निष्पाप जिव देखील पाण्यात बुडाले. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. तिच्यासोबत दोन निष्पाप जिव देखील या जगातून नाहीसे झाले.या दुर्दैवी घटनेची माहिती सायंकाळी उघड झाली. माहिती मिळताच भडगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. अशोक उतेकर व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक आनंद मधुकर पटारे, पोलिस नाईक ज्ञानेश्वर महाजन, स्वप्नील चव्हाण आदींनी घटनास्थळी धाव घेतली.  80 फुट खोल असलेल्या विहीरीला भरपूर पाणी असल्यामुळे तिघांचे मृतदेह बाहेर काढणे कठीण काम होते. त्यामुळे पट्टीच्या पोहणा-यांना बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने खोल विहीरीत तिघांचे मृतदेह शोधण्यात आले. रात्रीचा अंधार वाढत असल्यामुळे ग्रामस्थांनी योग्यरितीने प्रकाश योजना केल्यामुळे शोधकार्यात मोठी मदत झाली.

घटनास्थळासह मृतदेहांचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर तिघे मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल भडगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे डॉ. पंकज जाधव यांनी दिला. दरम्यान या घटनेची माहीती मिळताच मयत गायत्रीचे आईवडील निवडक नातेवाईकांसमवेत कनाशी येथे दाखल झाले. न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी भडगाव पोलिस स्टेशनला सकाळी पहाटेपासून ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यात महिलावर्गाची संख्या मोठ्या प्रमाणात होती. दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन पो.नि. अशोक उतेकर यांनी उपस्थीत शोकमग्न नातेवाईकांना दिले. गायत्रीचे वडील दिलीप पुंडलीक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मयत गायत्रीचा पती दिनेश निंबा पाटील, सासू पमा निंबा पाटील, सासरे निंबा रामदास पाटील, जेठ बबन निंबा पाटील, जेठाणी सोनी बबन पाटील या पाचही जणांविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भडगाव पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 49/21 भा.द.वि. 306, 498(अ), 323, 504,34 नुसार दाखल करण्यात आला.  मयत गायत्रीचा पती दिनेश पाटील, सासरा निंबा रामदास पाटील व जेठ बबन निंबा पाटील या तिघांना तात्काळ अटक करण्यात आली.

आत्महत्या करणा-या गायत्रीने आपल्या निष्पाप दोघा मुलांना घेऊन आत्महत्या केली होती. या दोघा निष्पाप मुलांचा काहीही दोष नसतांना त्यांचा जिव गेला होता. त्यामुळे मयत गायत्री विरुद्ध दोघांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो.नि. अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. आनंद पटारे व ज्ञानेश्वर महाजन करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here