सुटाबुटातील बाळ बोठे करत होता वेषांतर! फिल्मी स्टाईल छाप्यात तपासाचा मध्यांतर!!

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येला जवळपास तिन महिने उलटले. या हत्या प्रकरणातील इतर संशयीत पोलिसांच्या हाती लागले असले तरी मुख्य संशयीत सुत्रधार बाळ बोठे मात्र फरार होता. गेल्या तिन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतर देखील बाळ बोठे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो सतत गुंगारा देत पलायन करण्यात यशस्वी होत होता. अखेर अहमदनगर पोलिसांनी बाळ बोठे यास शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. याबद्दल अहमदनगर पोलिस कौतुकास पात्र ठरले आहेत.

बाळ बोठे यास पकडण्याकामी पोलिसांनी तब्बल शंभर वेळा छापे टाकले. तरीदेखील बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर 102 दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पोलिसांनी त्याला हैद्राबाद येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. नेहमी सुटाबुटात राहणारा बाळ बोठे वेशांतर करुन विविध युक्त्या करुन वावरत होता. कधी वेशांतर तर कधी रुमला बाहेरुन लॉक लावून वास्तव्य करण्याचे प्रकार बाळ बोठे कडून सुरु होते. कुणाला आपला सुगावा लागू नये म्हणून बाळ बोठे याने बी.डी. पाटील या नावाने रुम बुक केल्याचे समोर येत आहे.

सामाजिक कार्यकर्त्यां असलेल्या रेखा जरे यांच्याकडून आपली बदनामी होईल या भीतीपोटी बाळ बोठे याने त्यांचा खून केल्याचे तपासात समोर येत आहे. भल्या पहाटे करण्यात आलेल्या कारवाईच्या वेळी बाळ बोठे हा रुममधे एकटाच बसलेला होता. त्याला मदत करणारे साथीदार चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (25)गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश, शेख इस्माईल शेख अली (30) बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (52) चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश यांना देखील अटक करण्यात आली आहे. मात्र पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (हैद्राबाद) ही महिला फरार होण्यात यशस्वी झाली आहे. नगर जिल्ह्यातून फरार होण्यात मदत करणारा त्याचा साथीदार महेश वसंतराव तनपुरे (40) कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, अहमदनगर यास आज सकाळी अटक करण्यात आली आहे. यापुर्वीच्या तपासकामात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली होती.

बाळ बोठे याने सुपारी देऊन रेखा जरे यांची हत्या केल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याच्या शोधकामी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. राज्यात विविध शंभर ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. मात्र बाळ बोठे हाती लागत नव्हता. अखेर विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाळ बोठे हा हैद्राबाद येथील एका हॉटेलमधे लपून बसला असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली. बाळ बोठे यास पकडण्याकामी शेवटच्या पाच तासात एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे घटनाक्रम घडला. शेवटच्या काही तासात बाळ बोठे याने वेशांतर करुन रुमला बाहेरुन लॉक लावून घेतले होते. ज्या हॉटेलच्या रुम क्रमांक 109 च्या दरवाज्याचे लॉक तोडून पोलिस पथकाने आत प्रवेश करत बाळ बोठे यास शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले. या शोध कार्यात हैदराबाद, सोलापूर, मुंबई क्राईम ब्रांच, मुंबई सायबरच्या पथकाची मोलाची मदत झाली. याकामी शेवटचे सलग पाच दिवस विशेष मोहीम राबवण्यात आली होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here