जळगावसह मालेगाव लुटीतील रोकड एमआयडीसी पोलिसांनी केली हस्तगत

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी भरीव कामगिरी केली असून जळगावसह मालेगाव येथील लुटीचा दुहेरी तपास लावला आहे. एका तपासात दोन तपासातील लाखो रुपयांची लुटीतील रक्कम आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे. या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गेल्या 1 मार्च रोजी जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदीराजवळ गावठी कट्ट्याचा धाक दाखवत 15 लाख रुपयांची दिवसाढवळ्या लुट झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा घडल्यानंतर आरोपींनी त्यांच्या ताब्यातील वाहन सोडून पळ काढला होता. सदर मोटारसायकल कुणाची आहे याचा शोध लागल्यामुळे तपासाला गती मिळाली होती. गुन्हा घडल्यानंतर प्राथमीक माहिती पोलिस कर्मचारी विजय पाटील यांना समजली होती. त्या अनुशंगाने लागलिलिच घटनास्थळी जाऊन तपासकामी सुरुवात करण्यात आली होती. या गुन्ह्यात खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळं (22) रा.दंडेवाले बाबा नगर मोहाडी ता.जि.धुळे व रितीक उर्फ दादु राजेंद्र राजुपत (19) पवन नगर हुडको ता.जि.धुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांकडून सुरुवातीला 15 लाख रुपयांपैकी 9 लाख 10 हजार रुपये व गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला होता.  

10 मार्च पर्यंत दोघे आरोपी पोलिस कोठडीत असतांना अधिक तपासाअंती खुशाल मनोज मोकळ याच्याकडून पारोळा चौफुली शिरपुर रोड येथुन 3 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा आरोपींची पोलिस कोठडी न्यायालयाकडून 15 मार्च पर्यंत वाढवून घेण्यात आली. या वाढीव पोलिस कोठडीच्या कालावधीत 11 मार्च रोजी रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत याच्याकडून मोराणे सुरत रोड धुळे येथुन 1 लाख 21 हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. अशा प्रकारे जळगाव येथील पंचमुखी हनुमान मंदीर परिसरातील लुटीतील 15 लाख रुपयांपैकी एकुण 13 लाख 31 हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले.

चौकशीदरम्यान आरोपींनी मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत केलेला गुन्हा देखील कबुल केला. मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत कपाशीच्या व्यापा-याची लुट करण्यात आली होती. आरोपी खुशाल मोकळ याने मालेगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या या गुन्ह्यातील 5 लाख रुपये त्याच्या पवन नगर चाळीसगाव रोड धुळे येथील घरातून काढून दिले. ते पोलिसांनी तपासकामी जप्त केले.  या गुन्ह्यातील त्याचा साथीदार अविनाश सुरेश माने याचे देखील नाव तपासात व चौकशीत पुढे आले. अविनाश सुरेश माने (19) रा.दगडी चाळ धुळे याने  मालेगांव पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील 2 लाख 30 हजार रुपये पोलिसांना काढून दिले. अशा प्रकारे मालेगाव हद्दीतील गुन्ह्यातील एकुण 7 लाख 30 हजार रुपयांची रोकड जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तपासकामी हस्तगत करण्यात यश मिळवले.

जळगावसह मालेगाव येथील गुन्हयातील आजपावेतो लुटीची एकुण रक्कम 20 लाख 61 हजार रुपये हस्तगत केल्याने एमआयडीसी पोलिसांचे पथक कौतुकास पात्र ठरले आहे. या गुन्ह्यातील अविनाश माने यस मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे. या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक विशाल सोनवणे, उप निरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक सचिन मुंडे, इमरान सैय्यद, मिलींद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर, सचिन पाटील यांनी तपासकामी झोकून दिल्याने तपासात यश आले. खुशाल मोकळ याच्याविरुद्ध गंगापुर, मुंबई नाका, अंबड, चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन धुळे, पश्चिम देवपूर पोलिस स्टेशन धुळे, धुळे शहर पोलिस स्टेशन तसेच रितीक राजेंद्र राजपूत याच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन धुळे व उपनगर नाशीक पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here