आधी केले अपहरण, नंतर दिले यातना मरण ! लुटीच्या खेळात जिवानिशी गेले गौतम हिरण !!

अहमदनगर : गौतम झुंबरलाल हिरण हे अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक होते. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे ते आपल्या परिवारासह रहात होते. हिंदुस्थान युनीलिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांची पाच तालुक्यांसाठी त्यांच्याकडे एजन्सी होती. बेलापूर येथे त्यांचे दुकान होते. दिवसरात्र व्यवसायात वाहून घेणारे ते एक कुशल व्यावसायिक होते. बेलापुर गावातच श्रीरामपूर – राहुरी रस्त्यावर माल ठेवण्यासाठी त्यांचे गोडाऊन आहे. एकंदरीत त्यांचा व्यावसायीक पसारा मोठा होता.

श्रीरामपूर येथून बेलापूरला दुकानावर येण्यासाठी ते दुचाकीचा वापर करत होते. 1 मार्च रोजी नेहमीप्रमाणे उद्योजक गौतम हिरण यांनी सायंकाळी सातच्या सुमारास आपले दुकान बंद केले. त्यानंतर ते श्रीरामपुर येथे आपल्या घरी मोटरसायकलने जाण्यास निघाले. आज त्यांच्या जिवनाचा अखेरचा दिवस असल्याचे केवळ नियतीला माहिती होते. त्यांच्याकडे पुर्वी कामाला असलेल्या नोकराचा मुलगा काळाच्या रुपात त्यांची वाट अडवण्यासाठी उभा होता. त्यांच्याकडे प्रकाश खाडे हा कामगार पुर्वी कामाला होता. त्यांचा मुलगा आकाश खाडे हा त्यांना रस्त्यात भेटला.

दररोज घरी जातांना व्यावसायीक गौतम हिरण यांच्याकडे लाखो रुपयांची रोकड असते हे आकाश खाडे याला चांगल्या प्रकारे माहिती होते. आज त्यांच्याकडे असलेली रोकड लुटण्याचा प्लॅन आकाश व त्याच्या सहका-यांनी केला होता. त्या कटाचाच भाग म्हणून आकाश खाडे रस्त्यात त्यांची वाट बघत उभा होता. रस्त्यात तलाठी कार्यालयाजवळ आकाश खाडे त्यांना भेटला. आपल्या जुन्या कामगाराचा मुलगा भेटल्यामुळे त्यांनी त्याची व त्याच्या वडीलांची आस्थेवाईकपणे विचारपुस केली. गौतम हिरण यांच्या मनात चांगला हेतू होता. मात्र आकाश खाडे याच्या मनात हिरण यांच्या लुटीचा डाव सुरु होता. याकामी त्याचे साथीदार काही अंतरावर दबा धरुन बसले होते. काही वेळाने आकाश खाडे याने हिरण यांना म्हटले की माझी गाडी खराब झाली असून मला तुमची मदत हवी आहे. आकाशची गाडी दुरुस्त करण्याकामी गौतम हिरण यांनी जवळच्या एका इलेक्ट्रीकच्या दुकानदाराला विनंती करत काही वेळासाठी पकड मागून घेतली.

पकड देतो मात्र काम झाल्यावर लगेच परत आणून द्या असे दुकानदाराने त्यांना बजावले. त्यावर हिरण यांनी दुकानदाराला म्हटले की या माझ्या परिचीताची गाडी रस्त्यात खराब झाली आहे. ती दुरुस्त करुन तुम्हाला तुमची पकड लागलीच आणून देतो. पकड ताब्यात घेत आकाशला मोटारसायकलवर डबलसीट घेवून त्याच्या मोटारसायकलजवळ जाण्यास निघाले. मात्र प्रत्यक्षात आकाशची मोटारसायकल खराब झालेलीच नव्हती. हा त्याचा लुटीचा डाव होता. वाटेत पांढ-या रंगाच्या व्हॅनजवळ आकाशचे इतर साथीदार दबा धरुन बसले होते. त्या साथीदारांनी मिळून हिरन यांना बळजबरी व्हॅनमधे बसवले आणी त्यांचे अपहरण केले. मोटारीतच या लुटारुंनी त्यांच्याजवळ असलेले 1 लाख 65 हजार रुपये बळजबरी काढून घेतले. पैसे बळजबरी काढून घेतल्यानंतर लुटारुंचे काम फत्ते झाले होते. मात्र हिरण यांच्याजवळ बसलेला आकाश खाडे हा त्यांचा परिचीत होता. तो त्यांच्याकडे पुर्वी कामाला असलेल्या प्रकाश खाडे या कामगाराचा मुलगा होता. वाटेत गौतम हिरण यांना सोडून दिले तर ते पोलिस स्टेशनला जाऊन सर्व घटनाक्रम सांगतील व सोबत असलेल्या आकाश खाडे याच्यामुळे आपण पकडले जाऊ अशी भिती लुटारुंना सतावू लागली.

त्यामुळे जुनेद शेख याने गौतम हिरण यांचा मोटारीतच गळा दाबून त्यांची हत्या केली. या झटापटीत हिरण यांच्या डोक्याला देखील मार लागला. जुनेद शेख याने जोरात गळा दाबून ठेवल्यामुळे हिरण यांनी आपला जिव सोडला होता. त्यानंतर गौतम हिरण यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आकाश खाडे, जुनैद शेख, संदीप हांडे, नवनाथ निकम, अजय चव्हाण यांनी मिळून तयारी सुरु केली. सुरुवातीला गौतम हिरण यांचा मृतदेह औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका बंद अवस्थेतील गोदामात नेला. काही वेळाने अंधार पडल्यानंतर त्यांनी हिरण यांचा मृतदेह यशवंतबाबा चौकीनजीक आणून टाकला व सिन्नरच्या दिशेने पसार झाले. रात्री दहा वाजेपर्यंत प्रत्येकजण आपापल्या घरी पोहोचला.

दरम्यान रात्र झाली तरी गौतम हिरण घरी आले नाही म्हणून त्यांच्या परिवारातील सदस्य हवालदिल झाले. हिरण घरी का आले नाही म्हणून सर्वांनाच काळजी लागली. गौतम हिरण कुठे गेले असतील? काय करत असतील? त्यांचे कुणी अपहरण तर केले नसेल अशा शंका प्रत्येकाच्या मनात येऊ लागल्या. त्यांचा मोबाईल फोन देखील लागत नसल्यामुळे विविध प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जात होत्या. गौतम हिरण यांचे अपहरण झाले असून पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या निर्णयाप्रत सर्वजण आले.

गौतम हिरण यांचा भाऊ पंकज हिरण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेलापूर पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गौतम हिरण यांचे अपहरण झाल्याचे समजताच शहर व परिसरातील व्यावसायीकांनी एकच गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी तपास सुरु केला.   पोलिस पथकाने शहरातील विविध दुकाने, बाजारपेठ आदी भागातील सीसीटीव्ही फुटेज संकलीत करत तपासाला गती दिली. उद्योजक गौतम हिरण दुकानातून निघाल्यापासून त्यांचे अपहरण झाल्यापर्यंतचे फुटेज हस्तगत करण्यत आले. ज्या ओमनी व्हॅन मधून गौतम हिरण यांचे अपहरण झाले ते छायाचित्र मिळवण्यात आले. त्या ओमनी व्हॅनचा क्रमांक मात्र मिळू शकला नाही. ती व्हॅन सुभेदार वस्तीत गेली होती. दरम्यान 7 मार्च रोजी गौतम हिरण यांचा मृतदेह एमआयडीसी परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. अगोदर अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता थेट मृतदेह आढळून आल्यामुळे याप्रकरणी भा.द.वि. 302 व 201 ही कलमे वाढवण्यात आली.

दरम्यान आकाश खाडे व त्याचे साथीदार जणूकाही निर्धास्त झाले होते. हिरण प्रकरणाचा तपास कसा सुरु आहे याचा कानोसा घेण्यासाठी आकाश खाडे व त्याचे साथीदार श्रीरामपूर येथे आले. दरम्यान हिरण यांच्यासमवेत ज्या तरुणांना शेवटच्या क्षणी परिसरातील लोकांनी पाहिले होते त्यांनी त्यांचे वर्णन पोलिसांना कथन केले होते. त्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयीतांचे रेखाचित्र तयार केले होते. आता आपले काहीच होणार नाही अशा अविर्भावात आकाश खाडे व त्याचे साथीदार श्रीरामपूर येथे तपासाचा कानोसा घेण्यासाठी आले होते. पोलिस तपासात रेखाचित्रातील वर्णन आणि आकाशची शरीरयष्टी पोलिसांच्या पारखी नजरेने हेरली होती. संशयाच्या बळावर पोलिसांनी आकाशला चौकशीकामी ताब्यात घेतले आणी तपासाला गती आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल करण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या ताब्यातील आकाश खाडे याने आपल्या साथीदारांची नावे पुढे आणली. त्यात क्रमाक्रमाने मुख्य सूत्रधार आकाश प्रकाश खाडे याच्यासह संदीप मुरलीधर हांडे (26), रा. माळेगाव ता. सिन्नर, जि. नाशिक, जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (25), रा. सप्तशृंगीनगर, सिन्नर, जि. नाशिक, अजय राजू चव्हाण (26), रा. पास्तेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, नवनाथ भोंडू. निकम (29), रा. उकडगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यांना 13 मार्च रोजी ताब्यात घेत अटक करण्यात आली.

मुख्य सुत्रधार आकाश खाडे हा पांढ-या रंगाच्या ओमनी व्हॅनने (एमएच 15 जीएल 4387) त्याच्या तीन साथीदारांसह घटनास्थळी आला होता. नियोजीत कटानुसार त्याचे दोघे साथीदार दुचाकीने लुट करण्यासाठी येणार होते. मात्र त्यांचे टायमींग चुकले. दुचाकीवरील दोघे साथीदार येण्यास उशीर झाला. गौतम हिरण यांना आकाश खाडे चलाखीने घेऊन आला होता. मात्र लुट करण्यासाठी दोघे मोटारसायकलस्वार आले नव्हते. आता काय करावे हे टोळीतील सदस्यांना समजले नाही. त्यांनी घाईगडबडीत जवळ असलेल्या ओमनी व्हॅनने हिरण यांचे अपहरण केले. अपहरणादरम्यान गाडीतच त्यांची लुट देखील केली. केवळ लुट करणे एवढा एकच उद्देश टोळीचा होता. लुटीचा उद्देश सफल झाला होता. मात्र अपहरणाच्या वेळी हिरण यांच्यासमवेत आकाश खाडे होता. गौतम हिरण यांना तसेच सोडून दिले तर ते पोलिसात तक्रार करतील व ते आकाशला ओळखत होते. आकाशच्या माध्यमातून आपण पकडले जाऊ अशी भिती लुटारुंना सतावत होती. त्यामुळे गौतम हिरण यांची हत्या करण्यात आली.

या अपहरण वृत्तामुळे राज्यात खळबळ माजली. हा प्रश्न विधानसभेत गाजवण्यात आला. त्यामुळे पोलिस अधिका-यांवर मोठ्या प्रमाणात दडपण आणले गेले. आकाश प्रकाश खाडे याच्यासह संदीप मुरलीधर हांडे (26), रा. माळेगाव ता. सिन्नर, जि. नाशिक, जुनेद उर्फ जावेद बाबू शेख (25), रा. सप्तशृंगीनगर, सिन्नर, जि. नाशिक, अजय राजू चव्हाण (26), रा. पास्तेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, नवनाथ भोंडू. निकम (29), रा. उकडगाव, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर यांना 13 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली ओमनी व्हॅन, गौतम हिरण यांचा मोबाईल फोन, काही कागदपत्रे व धनादेश हस्तगत करण्यात आली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलिस उप निरीक्षक गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्या बापू नानेकर, पो.हे.कॉ. मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, विश्वास बेरड, पोलिस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, रवी सोनटक्के, विजय ठोंबरे, सचिन आडवल, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, दिपक शिंदे, विशाल गवांदे, पो.कॉ. योगेश सातपुते, संदीप दरंदले, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, मयुर गायकवाड, मेघराज कोल्हे, राहुल सोळुंके, रोहीत येमुल, आकाश काळे, चालक हे.कॉ. उमाकांत गावडे, पो.ना. भरत बुधवंत, अर्जुन बडे, चालक पो.हे.कॉ. बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील सायबर सेलमधील पो.ना. फुरकान शेख व पो.कॉ. प्रमोद जाधव यांनी तपासकामी सहभाग घेतला.    

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here