तिघा मद्यपींना खटकले, संदीपला त्यांनी हटकले! संतापात दगडाने ठेचले आणि यमसदनी पाठवले!!

जळगाव : भुसावळ शहरातील समता नगर ध्यान केंद्राजवळ संदीप गायकवाड हा तरुण आपल्या परिवारासह रहात होता. पत्नी व दोन्ही मुले नातेवाईकांकडे मुक्कामी गेल्यामुळे संदीप गायकवाड घरी एकटाच होता. काही दिवसात लॉकडाऊन लागण्याची शक्यता गृहीत धरुन बाहेर पडण्यावर मर्यादा येणार असा विचार करत थोडे फिरुन येण्यासाठी संदीप एकटाच घराबाहेर पडला. 12 एप्रिलची ती रात्र होती. त्या रात्री साधारण अकरा वाजता संदीप पायी पायी चालत भुसावळच्या लिंपस क्लब नजीक रिक्षा स्टॉपजवळ आला. जवळच असलेल्या हनुमान मंदीराजवळून तो पायी पायी पुढे गेला. त्याठिकाणी अजय अशोक पाठक, पंकज संजय तायडे व आशिष श्रीराम जाधव हे तिघे मित्र मद्यप्राशन करत बसले होते. मद्याच्या नशेत तिघा मित्रांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. मद्याच्या नशेत तिघे मित्र जणूकाही जगाचे बादशहा झाले होते. आपण म्हणजे कोण? असा प्रश्न जणू काही तिघा मित्रांना पडला होता. मद्याचा अंमल त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात झालेला होता. त्यांची देहबोली आणि नजर ते मद्याच्या नशेत डुंबले असल्याचे सांगून जात होती.

या तिघा मित्रांच्या जवळून संदीप एकनाथ गायकवाड जात होता. रस्त्याने जात असतांना सहज त्याचे लक्ष तिघा मित्रांकडे गेले. रस्त्याने जात असतांना आपल्याकडे रोखून का पाहिले? असा सुर अजय पाठक याने संदीप गायकवाड यास बघून आवळला. त्याच्या पाठोपाठ मद्याच्या नशेतील पंकज तायडे व आशिष जाधव या दोघांनी देखील अजय पाठक याच्या सुरात सुर मिसळत संदीप गायकवाड यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिघे मद्यपी आपल्याला शिवीगाळ करत असल्याचे बघून संदीपने सुरुवातीला त्यांना समजावण्याचा सुर घेतला. मात्र आमच्याकडे का पाहिले. तुला तुझे काम करता येत नाही का? असा सुर तिघा मित्रांनी आवळला. अतिशय क्षुल्लक कारणावरुन तिघा मद्यपींनी संदीप यास खालच्या दर्जाची शिवीगाळ सुरु केल्यामुळे संदीप चिडला. त्यानेदेखील तिघांना शाब्दीक मार देण्यास सुरुवात केली. शब्दामागे शब्द वाढत होता. एका बाजुने तिघे मद्यपी व दुस-या बाजुला संदीप गायकवाड हा एकटा होता. तिघा मद्यपींना समजावण्याची ती वेळ नव्हती. ते समजुन घेण्याच्या अवस्थेत देखील नव्हते. तरी देखील संदीपने आपली शक्ती पणाला लावून त्यांना शब्दांचा मार देण्यास सुरुवात केली. मात्र तिघांसमोर एकटा संदीप कमी पडला. तिघा मित्रांच्या मनावर मद्याची झिंग मोठ्या प्रमाणात चढली होती. तिघे जण मद्याच्या आहारी गेले होते. त्यातच त्यांच्या अंगी बळ देखील आले होते.

आमच्याकडे रोखून का पाहिले एवढे क्षुल्लक कारण पुढे करत तिघे जण एकट्या संदीपवर तुटून पडले. जवळच पडलेल्या दगडाने त्यांनी एकट्या संदीपला मोठ्या प्रमाणात ठेचून काढले. संदीपच्या डोक्यावर, तोंडावर, मानेवर आणि नाकावर दगडाचा मोठ्या प्रमाणात मार पडल्यामुळे संदीप जणूकाही धारातिर्थी पडला.  संदीप जमीनीवर कोसळल्यानंतर त्याची हालचाल काही वेळातच बंद झाली. संदीपने या जगाचा निरोप घेतल्याचे समजताच तिघांची हवा गुल झाली. तिघांच्या मनासह शरीरावरील मद्याचा अंमल मोठ्या प्रमाणात उतरला. तिघांनी तेथून पळ काढला. दुस-या दिवसापर्यंत संदीपचा मृतदेह तेथेच पडून राहिला.

13 एप्रिल हा मराठी नववर्षाचा गुढी पाडव्याचा दिवस उजाडला. या दिवशी सकाळीच रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानास संदीपचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचला गेल्यामुळे मरण पावलेला संदीप गायकवाड हा रेल्वे सुरक्षा बलाच्या त्या जवानाच्या दृष्टीने अनोळखी होता. त्या जवानाने तातडीने भुसावळ शहर पोलिस स्टेशन गाठले. ड्युटीवरील ठाणे अंमलदारास त्या जवानाने तरुणाच्या खूनाची व मृतदेहाची माहिती प्रत्यक्ष हजर राहूनदिली. ठाणे अंमलदाराने लागलीच ती माहिती पो.नि.बाबासाहेब ठोंबे यांना कळवली. पो.नि.बाबासाहेब ठोंबे यांनी आपले वरिष्ठ असलेले डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे तसेच सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांना कळवली. तरुणाचा खून झाल्याची माहिती समजताच क्षणाचाही विलंब न लावता सर्व अधिकारी आपल्या सहकारी कर्मचारी वर्गासह घटनास्थळी दाखल झाले.

रात्रभर संदीप गायकवड याचा मृतदेह घटनास्थळावर पडून होता. मराठी नववर्षाच्या पहाटे सुर्याची किरणे त्याच्या मृतदेहावर पडली होती. त्याला बघण्यासाठी आजुबाजूच्या परिसरातील लोकांची गर्दी जमली होती. पोलिस अधिकारी वर्गाचा ताफा घटनास्थळी दाखल होताच बघ्यांची गर्दी तातडीने बाजुला झाली. मयत हा पोलिसांसह सर्वांच्या दृष्टीने अनोळखी होता. मयताच्या डोक्यावर, तोंडावर, नाकावर व मानेवर जबर दुखापत झाली होती. त्याला दगडाने जबर मारहाण झाल्याचे स्पष्ट दिसत होते. वरिष्ठ अधिका-यांनी पो.नि. बाबासाहेब ठोंबे व त्यांचे सहकारी स.पो.नि. संदीप दुनगहू यांना तपासकामी महत्वाच्या सुचना दिल्या. घटनास्थळी ठसे तज्ञांसह श्वान पथकाची मदत घेण्यात आली. मयतावर हल्ला करणारे एकापेक्षा अधिक तरुण असल्याचे व त्यांनी कोणत्यातरी वादातून हा हल्ला केल्याचे प्रथमदर्शनी कयास लावण्यात आला. घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान जमलेल्या लोकांकडे पोलिस पथकाची चौकशी सुरु असतांना मयत हा प्रमोद गायकवाड या तरुणाचा भाऊ असल्याचे चर्चेतून उघड झाले. या माहितीच्या आधारे प्रमोद गायकवाड या तरुणाला घटनास्थळावर बोलावण्यात आले. त्याने मृतदेह बघताच ओळखला. तो मृतदेह त्याचा भाऊ संदीप गायकवाड याचा होता. आपल्या भावाचा मृतदेह बघून त्याने ओक्साबोक्सी रडण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती मिळताच काही वेळाने मयत संदीपच्या पत्नीसह त्याचा मुलगा व मुलगी असे तिघे जण हजर झाले. संदीपचा मृतदेह बघून त्याच्या पत्नीने व मुलांनी धाय मोकलून रडण्यास सुरुवात केली. या प्रकरणी मयत संदीप गायकवाड याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ शहर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.55/21 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.

एकंदरीत मयताची ओळख पटली होती. मात्र त्याचा खून कुणी व कशासाठी केला याचे उत्तर तपासात शोधून काढण्याचे कसब पोलिसांना लावायचे  होते. त्या दृष्टीने तिन पथके नियुक्त करुन ती तपासकामी रवाना देखील झाली होती. शव विच्छेदनकामी मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार अजय अशोक पाठक या तरुणाचे नाव पुढे आले. घटनेच्या वेळी अजय पाठक हा त्याच्या साथीदारांसह मद्यप्राशन करत असल्याचे चौकशीत व खब-याने दिलेल्या माहितीत समोर आले. माहिती मिळताच पो.नि. बाबासाहेब ठोंबे यांनी अजय पाठक रहात असलेल्या आयुध निर्माणी वसाहतीत जाण्याचे ठरवले. त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी साध्या वेशात सरकारी वाहनाऐवजी खासगी चारचाकी वाहनाने जाण्याचे ठरवले. पो.नि.बाबासाहेब ठोंबे यांनी आपले सहकारी स.पो.नि. संदीप दुनगहू, हवालदार राजेश बोदडे, सोपान पाटील, जुबेर शेख यांच्यासह खासगी वाहनाने साध्या वेशात अजय पाठक रहात असलेले त्याचे निवासस्थान गाठले. त्यावेळी अजय पाठक सहज त्यांच्या हाती लागला. चौकशी करत त्याला वाहनात बसवण्यात आले. त्याला पोलिस स्टेशनला आणल्यानंतर पो.नि. बाबासाहेब ठोंबे व स.पो.नि.संदीप दुनगहू यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याला पोलिसी खाक्या दाखवला. काही वेळातच तो पटापट बोलू लागला. त्याने चौकशीत आपल्या दोघा साथीदार मित्रांची नावे कबुल केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार क्रमाक्रमाने आशीष श्रीराम जाधव (द्वारका नगर आंबेडकर शाळेच्या मागे भुसावळ) व पंकज संजय तायडे (रा. रामनगर सब स्टेशनच्या मागे भुसावळ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला तिघांची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. तिघांनी आपला गुन्हा कबुल केला.

वैद्यकीय चाचणीनंतर तिघांना अटक करण्यात आली. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सुरुवातीला तिघांना पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडीदरम्यान तिघांनी आपला गुन्हा कबुल करत हकीकत कथन केली. मद्यप्राशन करत असतांना तिघांनी रस्त्याने जाणा-या संदीप गायकवाड याच्यासोबत आमच्याकडे का पाहिले या किरकोळ कारणावरुन वाद घातला होता. शब्दामागे शब्द वाढत गेल्यानंतर रागाच्या भरात व मद्याच्या नशेत तिघांनी मिळून संदीपला दगडाने ठेचून मारले. या मारहाणीत संदीपचा मृत्यू झाला. त्यानंतर तिघे मित्र तेथून पळून गेले. या घटनेतील तिघे मित्र मयतास ओळखत नव्हते तसेच त्यांच्यात कोणताही जुना वाद नव्हता. अटकेतील तिघा तरुणांवर यापुर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. केवळ किरकोळ कारणातून मद्याच्या नशेत त्यांच्याकडून हे कृत्य झाले.

पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.बाबासाहेब ठोंबे, स.पो.नि.संदीप दुनगहू, पो.हे.कॉ. राजेश बोदडे, अनिल  चौधरी, मोहम्मद वली सैय्यद, संजय सोनवणे, विकास बाविस्कर, सोपान पाटील, जुबेर शेख, विशाल साळुंखे, जाकीर मंसुरी, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी गुन्हा उघडकीस आणला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here