दीपक गुप्ता यांच्या प्रयत्नाने कोविड रुग्णालयात लॅंडलाईन सेवेस सुरुवात

जळगाव : जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या प्रयत्नाने मोहाडी रस्त्यालगत शंभर बेडच्या कोविड रुग्णालयाची सुरुवात झाली आहे. या रुग्णालयात सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी दोन दिवसांपुर्वी पाहणी केली. या पाहणी दरम्यान गुप्ता यांच्या लक्षात आले की येथील कित्येक बेड रिकामे असून शहरातील अनेक रुग्णालयात मात्र बेडची कमतरता आहे. रुग्ण व त्यांचे नातेवाईक बेडअभावी वणवण भटकंती करत आहेत. दीपककुमार गुप्ता यांनी यामागील सत्यता जाणून घेतली असता या रुग्णालयाचा कुठेही संपर्क क्रमांक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. संपर्क क्रमांक नसल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवईकांना या रुग्णालयातील रिकाम्या बेडची माहिती समजत नव्हती. रुग्णालय प्रशासनाने लॅंडलाईन फोनसाठी अर्ज केला असला तरी याठिकाणी बीएसएनएलच्या कनेक्शनसाठी लागणारे साधे पोल देखील हजर नसल्याचे गुप्ता यांच्या लक्षात आले.

या सर्व उणीव लक्षात घेता सामाजीक कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता सक्रीय झाले. संचारबंदीसह कडक निर्बंधामुळे बाजारपेठ बंद असून लॅंडलाईन व मोबाईल फोन आणणार कुठून हा मुळ प्रश्न होता. सदर अडचण लक्षात घेता दीपककुमार गुप्ता यांनी 16 एप्रिल रोजी मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या परवानगीने गोलाणी मार्केटमधील एक मोबाईल दुकान काही वेळासाठी उघडण्यासाठी परवानगी मान्य करुन घेतली. या दुकानातून एक जीएसएम लॅंडलाईन फोन व मोबाईल फोन खरेदी करण्यात आला. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद आणि सिव्हील सर्जन नागोजी चव्हाण यांच्या तोंडी अनुमतीने सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाने दोन सिमकार्ड विकत घेण्यात आले. याकामी बीएसएनएल कर्मचारी वर्गाचा सकारत्मक प्रतिसाद लाभला. त्यामुळे नागरिकांच्या लक्षात राहील असा सोपा मोबाईल क्रमांक 9403366005 मिळवण्यात आला.

त्यानंतर गुप्ता यांनी व्हाटस अ‍ॅप क्रमांकासाठी एअरटेल कंपनीचे अधिकारी राकेश राठौर यांचे सहकार्य घेतले. राकेश राठौर व दीपककुमार गुप्ता यांच्या सहकार्याने 9028487878 हा क्रमांक व्हाटस अ‍ॅपसाठी विनामुल्य मिळाला. हा क्रमांक जळगाव शहरात अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी वितरक रितेश महाजन यांचे सहकार्य मिळाले.
आज 17 एप्रिल रोजी बीटेल कंपनीचा जीएसएम लॅंडलाईन फोन व सॅंमसंग कंपनीचा मोबाईल हॅंडसेट मोहाडी रस्त्यावरील शासकीय रुग्णालय अधिका-यांच्या सुपुर्द करण्यात आला. या मोबाईल व लॅंडलाईन हॅंडसेटसाठी लागणारा खर्च एका दात्याने उचलला आहे. 9403366005 आणि 9028487878 या क्रमांकावर आता नागरिकांना संपर्क साधता येणार असून बेड पोझीशनची माहिती घेता येईल. या सेवेची दीपककुमार गुप्ता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. दीपककुमार गुप्ता यांनी या क्रमांकावरुन पहिला फोन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना लावून या सेवेला सुरुवात करत लोकार्पन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here