फेसबुकवरील महिलांना ब्लॅकमेल करणारा गजाआड

On: July 8, 2020 7:13 PM

बारामती : फेसबुकचे बनावट खाते उघडून महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे, त्यांचे फोटो अश्लिल स्वरुपात तयार करणे व त्या आधारे त्यांना धमकावणा-या तरुणास बारामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात भा.द.वि. 353(सी), आयटी अॅक्ट 67, 67 ए नुसार गुन्हा दाखल आहे. संदीप सुखदेव हजारे (29) आंबवडे, ता. खटाव, जि. सातारा असे आरोपीचे नाव आहे.

बारामती पोलिसांनी त्याला दहिवडी येथून अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबुल केला आहे. आरोपी संदीप हजारे हा गणेश खरात या बनावट नावाने फेसबुक खाते चालवत होता. याच खात्यावरून तो शेकडो महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असे.

महिलांनी फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर महिलांच्या प्रोफाईल फोटोत तो छेडछाड करत असे. ते फोटो अश्लिल केल्यानंतर संबंधित महिलांना चॅट करून बोलण्यास भाग पाडत असे. बारामती तालुका पोलिस स्टेशनला पिडीत महिलेने तक्रार दिली होती. पो.नि.अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता.

गुन्हे शोध पथकाने तांत्रिक मदतीने संदीप सुखदेव हजारे यास दहिवडी येथून अटक केली. त्याच्याविरुद्ध पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशन, अहमदनगर जिल्हयातील घारगाव पोलिस स्टेशन, कराड पोलिस स्टेशन, संगमनेर पोलिस स्टेशन, रत्नागिरी पोलिस स्टेशन आदी ठिकाणी विविध गुन्हे दाखल आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment