जळगाव : विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, राष्ट्रीय चारित्र्य आणि संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘गांधीतीर्थ जिल्हास्तरीय देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धा–२०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दि. २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगाव येथे होणार आहे.
आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असून त्याच्या मनात देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार रुजणे आवश्यक आहे. याच विचारातून गांधी रिसर्च फाउंडेशन विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत शहरी व ग्रामीण अशा दोन विभागांमध्ये शाळांना सहभागी होता येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास ₹७,०००, द्वितीय क्रमांकास ₹५,०००, तृतीय क्रमांकास ₹३,०००, तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिके प्रत्येकी ₹१,५०० देण्यात येणार आहेत. याशिवाय शहरी व ग्रामीण विभागातील जिल्हास्तरीय प्रथम विजेत्या संघाला ₹११,००० चे विशेष पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. प्रत्येक संघात कमाल १२ विद्यार्थी असावेत. स्पर्धेसाठी मराठी किंवा हिंदी भाषेतील देशभक्तीपर गीत सादर करता येईल. चित्रपटातील गीतांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही. गीतगायनासाठी कमाल ५ मिनिटांचा कालावधी राहील. संगीत शिक्षकांनी स्पर्धेच्या वेळी विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणे आवश्यक असून, तबला, ढोलकी, ढोल, पखवाज, संबळ, ताशा, हार्मोनियम आदी पारंपरिक वाद्यांना परवानगी आहे. सादरीकरणाच्या गुणवत्तेनुसार परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शाळांनी दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक गिरीश कुलकर्णी (मो. ९८२३३ ३४०८४), सुधीर पाटील (९८२३३ ६२३३०), अशोक चौधरी (९४२२७ ७५९१८), विश्वजीत पाटील (९४०४९ ५५२२६) यांच्याशी संपर्क साधता येईल. विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीचा संस्कार रुजविणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.






