वाकोद, दि. १८ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या जन्मगावी वाकोद येथील जैन फार्ममध्ये १८ सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिनानिमित्त छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बांबू पूजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला त्याच प्रमाणे बांबूच्या औषधी व पर्यावरणीय महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.
श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी १९८९ मध्ये वाकोद जैन फार्म येथे १० बाय १० अंतरावर मानवेल या वाणाचे बांबू प्रायोगिक तत्त्वावर लावले होते.
बांबू वनस्पती बद्दल त्यांच्या मनात आस्था होती. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी बांबूचे महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केलेले आहे. “बांबू मला दृढनिश्चयाचं प्रतीक वाटतो. परिस्थिती कितीही कठीण असो, स्वाभिमानाने उभे राहण्याची प्रेरणा बांबूपासून मिळते” असे विचार त्यांनी मांडलेले आहेत.
वाकोद येथे २४ तासात ९ ते १२ इंच बांबूची वाढ झाल्याची नोंद घेतली आहे. बांबू ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती असून २४ तासांत तब्बल ४७.६ इंच वाढीचा वेग नोंदवला गेला आहे. तसेच, हेक्टरी दरवर्षी सुमारे १७ टन कार्बन शोषून घेण्याची क्षमता बांबूत आहे. बांबूच्या पानांचा रस घेतल्याने उंची वाढते, तर आंबेहळद, वेखंड व बांबूचा कोंब यांच्या उपचाराने ब्रेन ट्युमरच्या गाठी कमी होतात. बांबूच्या कोंबांचे लोणचे तसेच त्याची भाजी देखील आहारात उपयोगी ठरते. बांबूचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व असते असे वाकोद फार्मचे वरिष्ठ व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत यांनी उपस्थितांना सांगितले.
आयोजित कार्यक्रमात गणपत शेळके व सौ. करुणाबाई शेळके, तसेच विनोद सिंह राजपूत यांच्या हस्ते बांबू पूजन करण्यात आले. यावेळी संदीप बावस्कर, संतोष वानखेडे, विजय सपकाळे, चेतन धामोडे, सीमा जाधव, लताबाई जवखेडे, मीराबाई कुरंगे, रेणुकाबाई पाटील, रेखाबाई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमातून जैन इरिगेशनने पर्यावरणीय व औषधी महत्त्वाची जाणीव करून देत समाजात हरित संस्कृतीचा प्रसार करण्याचा संदेश दिला. कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होय.






