फैजपूरला मध्यरात्री पकडला कंटेनर – आढळली 34 मृत जनावरे

On: May 27, 2021 7:02 PM

जळगाव : मध्यरात्री फैजपूर पोलिसांनी पकडलेल्या कंटेनरमधे मोठ्या प्रमाणात आढळलेले पशुधन मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की फैजपुर खिरोदा दरम्यान एक कंटेनर जात असून त्यात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात पशुधन असल्याची गोपनीय माहिती फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना मध्यरात्री मिळाली. त्या माहितीच्या आधारे फैजपूर पोलिसांच्या पथकाने फैजपूर ते खिरोदा दरम्यान सापळा रचला. दरम्यान उत्तर प्रदेश पासिंगचा एक कंटेनर अडवला असता त्यात 32 बैल आणी 2 गायी असे एकुण 34 गुरे आढळून आली. त्यातील बहुतेक गुरे मरण पावली असल्याचा अंदाज येत होता. रात्र बरीच झाली असल्यामुळे ते कंटेनर गुरांसह जळगाव – कुसुंबा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले.

पशुधन येणार असल्याचे समजल्याने गोशाळेचे कामकाज पाहणारे वाल्मिक पवार यांनी आपल्या सहका-यांना रात्रीच कामावर हजर राहण्यास बजावले. रात्रीचे दोन – अडीच वाजले असतांना आलेल्या कंटेनर मधून गुरे काढण्यापुर्वीच परिसरात उग्र दर्प येण्यास सुरुवात झाली. कंटेनर उघडून पाहिले असता त्यातील 32 बैल आणि 2 गायी अशी एकुण 34 गुरे मरण पावली होती. रात्र बरीच झाली असल्यामुळे या गुरांना उतरवण्याचे काम सकाळपर्यंत स्थगित करण्यात आले. सकाळी गोशाळेचे सर्व कर्मचारी पुन्हा कामाला लागले. त्यांनी सर्व मृतावस्थेतील गुरांचा दफनविधी केला.

आज फैजपुर पोलिस स्टेशनला दुपारपर्यंत याप्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते. याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला पोलिस नाईक उमेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक मुन्नेखान प्यारेलाल (इस्लामनगर ओरीया उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गु.र.न.66/21 नुसार रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. 34 गुरे आणि कंटेनर असा एकुण 16 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची नोंद घेण्यात आली. स.पो.नि. प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment