नाशिक : परिचीत तरुणीला वाढदिवसानिमीत्त आयोजीत पार्टीला बोलावून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केल्याप्रकरणी शहरातील चौघा जणांविरुद्ध सिन्नर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भाऊसाहेब ताडगे, सागर भाटजिरे, दीपक (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच एक जण (सर्व रा. सिन्नर) अशा चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी नांदूरशिंगोटे येथील रहिवासी आहे. तिची संशयितांसोबत पुर्वीपासून मैत्री होती. संशयित भाऊसाहेब ताडगे याचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी 21 जुलै रोजी दुपारी अडीच वाजता पिडीत तरुणीला फोन करुन नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटाजवळ एका हॉटेलात बोलावण्यात आले. तिथे भाऊसाहेबसोबत असणाऱ्या सागर भाटजिरे, दीपक (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच इतर दोघा तिघांनी तिला एका खोलीत बोलावले. तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर तिचा हात पकडून बळजबरी करत विनयभंग करण्यात आला.
पिडीतेने विरोध केल्याने तिला एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून शिवीगाळ तसेच मारहाण करण्यात आली. सिन्नरच्या आडव्या फाट्यावरील एका हॉटेलसमोर तिला सोडून देण्यात आले. त्यानंतर पीडितेने तिच्या एका मित्राला मदतीसाठी बोलावले. त्याला देखील संशयितांनी मारहाण केली. याप्रकरणी संशयितांविरोधात सिन्नर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या निर्देशाखाली मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गणेश परदेशी, विनोद टिळे करत आहेत.







