राहुरी : आपल्या आईचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या रागातून मुलाने त्याच्या आईच्या प्रियकराचा गळा आवळून खून केला. ही घटना तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे शनिवारच्या रात्री घडली. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करत अंत्यविधीची तयारी सुरु करण्यात आली. मात्र शवविच्छेदन अहवालातून खरा प्रकार उघड झाल्यामुळे राहुरी पोलिस स्टेशनला खुनाच्या गुन्ह्याची फिर्याद दाखल करण्यात आली. चांगदेव शंकर टिळेकर असे मयताचे नाव आहे.

संशयीत आरोपी ऋषिकेश सतीश टिळेकर (कोल्हार खुर्द) याच्या आईचे मयत चांगदेव टिळेकर यांच्या सोबत अनैतिक संबंध असल्याचे म्हटले जात होते. ऋषिकेश यास ते संबंध खटकत होते. 24 जुलैच्या रात्री आठच्या दरम्यान ऋषिकेश याने चांगदेवची गळा दाबून हत्या केली. या घटनेनंतर त्याने नातेवाईकांना फोन करून चांगदेव यास हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला असल्याचे कथन केले.
ऋषिकेश अंत्यविधीसाठी करत असलेली घाई बघून मयत चांगदेवची मुलगी रुपाली बनकर यांना संशय आल्याने त्यांनी चांगदेवचे शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. लोणी येथील रुग्णालयातून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर चांगदेवचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे उघड झाले. या प्रकरणी रुपाली बनकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुरी पोलिस स्टेशनला ऋषिकेशच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.








