सुरेल स्वरांच्या बरसातीत रंगली रौप्यमहोत्सवी पाडवा पहाट

On: November 11, 2026 10:34 AM

जळगाव : दीपावलीच्या मंगलमय पहाटे शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, अभंग आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने महात्मा गांधी उद्यानातील वातावरण भक्तिमय आणि संगीतमय झाले. आकाशवाणी जळगाव, स्व. वसंतराव चांदोरकर समिती प्रतिष्ठान आणि कै. नथ्यूशेठ चांदसरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनच्या सौजन्याने आयोजित रौप्यमहोत्सवी ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

कार्यक्रमाचे उद्घाटन खा. स्मिता वाघ, ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री खासदार ॲड. उज्ज्वल निकम, महापौर दीपमाला काळे, आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम प्रमुख ज्ञानेश्वर बोबडे, दीपक चांदोरकर, पं. सुभाष दसककर आणि मेजर नाना वाणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी आ. सुरेश भोळे, रमेशदादा जैन, कॅप्टन मोहन कुलकर्णी, व्ही. एम. भट, पीयूष रावळ, स्वानंद झारे यांच्यासह शहरातील संगीतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात आशिष रानडे यांनी रामकली रागातील बंदिश आणि ‘दीपावली सूरके संग…’ या सादरीकरणाने केली. त्यानंतर आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांनी ‘राधाधर मधुमिलिंद जय जय…’ ही रचना सादर केली. रानडे यांनी ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील ‘तेजो निधी लोहगोल’ हे नाट्यगीत प्रभावीपणे सादर करून रसिकांची दाद मिळवली. अहिर भैरव रागातील, श्रीनिवास खळे यांचे संगीत लाभलेले आणि पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांच्या स्वरांनी अजरामर झालेले ‘राम का गुणगान…’ हे गीत रानडे आणि ईश्वरी यांनी सादर केले.

प्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांच्या गायकीतून लोकप्रिय झालेली ‘हे शामसुंदर…’ ही रचना ईश्वरी दसककर-कदडी यांनी सुरेल सादर केली. पूजा दसककर यांनी ‘ये जवळी घे, जवळी घे सखया भगवंता…’ या गीतातून भक्तिभाव जागवला. यमन रागावर आधारित ‘मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश’ हे लोकप्रिय गीत ईश्वरी आणि पूजा यांनी सादर केले. उपस्थितांमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम असल्याने त्यांना समर्पित ‘शूरा मी वंदिले…’ या गीताने विशेष रंगत आणली. आशिष रानडे यांनी ‘देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल… तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल…’ या रचनेतून विठ्ठलभक्तीचा स्वर आळवला.

‘आज अयोध्या सजली’, ‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ आणि ‘राम राम भजो राम…’ या रचनांचा सुरेख मेळ साधणारे मेडले ईश्वरी आणि पूजा यांनी सादर केले. ब्रह्मानंद स्वामी लिखित ‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी’ हे पद आशिष रानडे यांनी सादर केले. यासोबतच ‘माझे माहेर पंढरी’, ‘भाग्यदा लक्ष्मी’ आणि कन्नड भजन अशा विविध रचनांनी मैफलीत भक्तिसंगीताचे रंग भरले. अखेरीस ‘धन्यभाग सेवा का अवसर पाया…’ या भैरवीने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली.

या संगीत मैफलीत गायक आशिष रानडे, ईश्वरी दसककर-कदडी आणि पूजा दसककर यांना पं. सुभाष दसककर (संवादिनी), सुजित काळे (तबला), विजय नेवे (सिंथेसायझर) आणि नितेश पाटील (ॲक्टोपॅड) यांनी समर्थ साथसंगत केली. कार्यक्रमात सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपिका घैसास यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment