जळगाव : गांजा या अंमली पदार्थाचा साठा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत बाळगणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने 3 ऑगस्टच्या रात्री अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बल्लु ऊर्फ टारझन अरुण दहेकर (32) रा. जाखनी नगर,कंजरवाडा, जळगाव असे अटक करण्यात आलेल्या गांजा विक्रेत्याचे नाव आहे. जळगाव – औरंगाबाद मार्गावरील आरएल चौफुलीनजीक सापळा रचून ताब्यात घेत टारझन यास अटक करण्यात आली.
13 हजार 455 रुपये किमतीचा 485 ग्रॅम वजनाचा गांजा असलेले पोते टारझनकडून पोलिस पथकाने ताब्यात घेत रितसर कायदेशीर कारवाई केली आहे. अटकेतील बल्लू उर्फ टारझन याच्याविरुद्ध सहायक फौजदार अतुल वंजारी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8,20,22 नुसार करण्यात आली आहे.
पो.नि. शिकारे यांच्या निर्देशाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, स.फौ. अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.ना. इमरान सैयद, पोना हेमंत कळसकर, पोना सुधीर साळवे, पोकॉ गोविंदा पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, पोकॉ. सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.