सामाजिक कार्यात दीपककुमार गुप्ता यांची भरारी– असामाजिक तत्वांना भारी पडते त्यांची एक चिंगारी!!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : दीपककुमार प्यारेलाल गुप्ता एक निष्ठावंत माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून जळगाव शहरासह जिल्हयात प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. माहिती अधिकार कायद्याची योग्य रीतीने हाताळणी करत त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा जनतेच्या मनात निर्माण केला आहे. विविध सामाजिक कामाच्या माध्यमातून जनता आणि शासन या दोन्ही घटकांना त्यांचा फायदा झाला आहे. त्यांच्या सामाजिक कामाचा व्याप आणि असामाजिक तत्वांपासून त्यांच्या जीविताचे रक्षण हे दोन्ही घटक लक्षात घेता त्यांना प्रशासनाकडून पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. विविध घटनांमधून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे उघड झाले होते. मात्र त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याच्या मागणीसाठी काही कार्यकर्ते आंदोलन करत आहेत.

जळगावच्या शिवाजीनगर भागात घरकुल योजनेअंतर्गत मिळालेल्या एका छोट्याशा वन रुम किचनमध्ये ते आपल्या कुटूंबासह राहतात. माहिती अधिकार कायदयाअंतर्गत त्यांनी मिळवलेल्या माहितीचा व ज्ञानाचा खजीना या घरकुलात दिसून येतो. माहिती अधिकाराचा सामाजीक स्तरावर त्यांनी केलेला योग्य तो वापर विविध घटनांमधून दिसून येतो. जळगाव सामान्य रुग्णालयातील बालमृत्यूप्रकरणाचा त्यांनी केलेला पाठपुरावा व या घटनेत दोषींना मिळालेली न्यायालयीन शिक्षा हे त्याचे फलीत म्हणावे लागेल. यासह शिवाजीनगर भागातील रेल्वे उड्डाण पुलाचा विषय, जळगाव शहरातील वाळू व्यवसायाशी संबंधीत जनहीत याचीका, पो.नि. अशोक सादरे आत्महत्या प्रकरण, सिव्हील हॉस्पिटल मधील विविध घोटाळे, जळगाव शहरातील 850 बेकायदा स्पीड ब्रेकर काढण्याचे प्रकरण, जळगाव महानगरपालिका क्षेत्रसभा प्रकरण, लॉकडाऊन कालावधीत गोरगरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सोयी सुविधा मिळवून देण्यासह गोरगरीब गरजूंना रेशनचे धान्य मिळवून देणे, प्रवासी पास मिळण्याकामी केलेली मदत अशी एक ना अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत.

गुप्ता यांच्या पाठपुराव्यामुळे 140 रेशन दुकानदारांवर दंडात्मक कारवाई झाली आहे. त्यामुळे या रेशन धान्य दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. दंडात्मक कारवाई झालेल्या रेशन धान्य दुकानदारांच्या संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल असून त्यांच्या नेतृत्वात गुप्ता यांचे पोलीस संरक्षण काढण्यासाठी आंदोलन सुरु आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या या आंदोलनाला वाळू माफियांचा छुपा पाठींबा व छुपी रसद मिळत असल्याचे म्हटले जात आहे. विविध गैर प्रकार समाजासमोर आणण्याचे काम गुप्ता यांनी केले आहेत. सामाजीक स्तरावर उपयोगी ठरणारे परंतू काही राजकीय पुढारी व काही सरकारी अधिका-यांना अडचणीचे ठरणारे दीपककुमार गुप्ता यांना संपवण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाल्याचे विविध घटनेतून दिसून येते. भारतीय जनता पक्षाचे मंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर 2016 रोजी नवी दिल्ली येथे आरटीआय कॉफी टेबल बुकाचे अनावरण झाले होते. त्या बुकात दीपककुमार गुप्ता यांच्या सक्सेस स्टोरीला विशेष स्थान देण्यात आले होते.

असे असले तरी प्रत्यक्ष जीवनात “सत्य परेशान है” असे म्हटले जाते ते अजिबात खोटे नाही. बडया बडया लोकांना अडचणीचे ठरणारे दीपककुमार गुप्ता यांना विविध माध्यमातून अडकवण्यासाठी पडदयामागून जणू काही एकामागून एक मालीकाच सुरु झाली होती. 22 फेब्रुवारी 2017 रोजी विलेपार्ले मुंबईच्या महिला आमदार (विधान परिषद सदस्या) विदया चव्हाण यांच्या मोबाईलवर एक अश्लील संदेश आला. निवांत क्षणी त्यांनी तो संदेश वाचला असता तो अतिशय अश्लील स्वरुपाचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी विलेपार्ले मुंबई पोलीस स्टेशनला गु.र.न. 64/17 भा.द.वि. 509 व भारतीय तंत्रज्ञान कायदा 65 नुसार गुन्हा दाखल केला.

28 फेब्रुवारी 2017 रोजी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार सौ मंदा म्हात्रे यांच्या मोबाईल क्रमांकावर अशाच स्वरुपाचा एक अश्लील संदेश आला होता. तो संदेश पाहिल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त नवी मुंबई यांच्या नावे सदर मोबाईल धारकाविरुद्ध तकार अर्ज दाखल करत कारवाईची मागणी केली. सदर गुन्हा सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनला गु.र.न. 34/17 नुसार दाखल करण्यात आला . याच दिवशी 28 फेब्रुवारी 2017 रोजी नाशिकच्या महिला आमदार दिपीका चव्हाण यांना देखील अशाच स्वरुपाचा अश्लील संदेश त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आला. याबाबत त्यांचे पती संजय चव्हाण यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनला गु.र.न. 54/17 भा. द. वि. 506 व 507 यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला.

लागलीच दुस-या दिवशी 1 मार्च 2017 रोजी पुणे येथील महिला आमदार डॉ. निलम गोहे यांच्या मोबाईल क्रमांकावर देखील अशाच स्वरुपाचा संदेश आला. या बाबत शिवाजी नगर पोलीस स्टेशन पुणे येथे आर. एन. गट यांच्या तकारीनुसार गु.र.न. 62/17 भा.द.वि. 354 (अ), 354 (ड), 506, 506 (र), 504, 507 व 509 यासह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 67 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनाक्रमादरम्यान 28 फेब्रुवारी रोजी विलेपार्ले मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील व त्यांचे एक सहकारी तपासकामी जळगाव शहर पोलीस स्टेशनला आले. त्यांनी चौकशीकामी दीपककुमार गुप्ता यांना बोलावून घेतले. आमदार विद्या चव्हाण यांना 8624027414 या मोबाईल क्रमांकावरुन अश्लील संदेश मिळाल्याची माहिती गुप्ता यांना देण्यात आली. हा मोबाईल कमांक आपल्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्याबाबत दीपककुमार गुप्ता यांना सांगण्यात आले. चौकशी दरम्यान गुप्ता यांचा मोबाईल हँडसेट ताब्यात घेण्यात आला. आपल्याकडे केवळ एअरटेल व जीओ या दोनच कंपन्यांचे सीमकार्ड असल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी त्यावेळी स्पष्ट केले. आपण कथन करत असलेला मोबाईल क्रमांक 8624027414 आपण विकत घेतलेला नाही व तो आपल्या नावावर नाही असे गुप्ता यांनी तपास अधिकारी विकास पाटील यांना पुन्हा एकवेळा स्पष्ट केले. या गुन्हयाच्या तपासकामी दीपककुमार गुप्ता यांना विलेपार्ले पोलीसांनी अटक करत मुंबई येथे नेले. ते वापरत असलेला मोबाईल हँडसेट व दोन्ही सिमकार्ड देखील तपासकामी जप्त करण्यात आले.

या गुन्हयात अटक करण्यात आलेले दीपककुमार गुप्ता यांना ऑर्थररोड जेल मुंबई येथे ठेवण्यात आले. या दरम्यान गुप्ता यांना समजले की आपल्या विरुद्ध सीबीडी बेलापुर येथील महिला आमदार मंदा म्हात्रे यांनी देखील अशाच स्वरुपाची तकार दाखल केली आहे. त्यांना देखील अशाच स्वरुपाचा संदेश त्यांच्या मोबाईलवर गेला आहे. ते सिमकार्ड आपल्या नावे असल्याचे गुप्ता यांना समजले. या गुन्हयात देखील त्यांना अटक करण्यात आली व बेलापूर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले. या गुन्हयाच्या तपासकामी अटकेतील दीपककुमार गुप्ता यांना जळगाव जिल्हयातील चोपडा येथे आणले गेले. चोपडा येथून सदर वादग्रस्त सीमकार्डची खरेदी – विक्री झाली होती.

चोपडा येथे या गुन्हयाची चौकशी झाल्यानंतर मुंबई पोलीस गुप्ता यांना घेवून पुन्हा मुंबईला गेले. पुन्हा ऑर्थररोड जेलमध्ये गुप्ता यांची रवानगी करण्यात आली . ऑर्थररोड जेलमध्ये असतांना गुप्ता यांना समजले की याच वादग्रस्त सीमकार्डच्या मदतीने शिवाजी नगर पुणे येथील महिला आमदार निलम गो-हे यांना देखील असाच अश्लील मॅसेज गेला आहे. त्यामुळे महिला आमदार निलम गो-हे यांनी देखील शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनला गु.र.न. 62/17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. ते सीमकार्ड आपल्या नावे असल्याचे तपासात समोर आले असल्याचे गुप्ता यांना सांगण्यात आले. त्यामुळे शिवाजी नगर पुणे पोलीसांनी देखील गुप्ता यांना ताब्यात घेत चौकशी केली.

या कालावधीत जेलमध्ये असतांना गुप्ता यांना पुन्हा समजले की मुंबई नाका नाशीक येथील पोलीस स्टेशनला देखील आपल्याविरोधात अजुन एक गुन्हा दाखल झालेला आहे. महिला आमदार दिपीका चव्हाण यांना अशाच स्वरुपाचा अश्लील संदेश ते वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकावर गेला होता. महिला आमदार दिपीका चव्हाण यांचे पती संजय चव्हाण यांनी तो गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मुंबई नाका पोलीसांनी देखील गुप्ता यांना चौकशीकामी ताब्यात घेवून चौकशी पूर्ण केली.

अशा प्रकारे माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्यामागे एकामागून एक अशा चार गुन्हयांची मालीका लागली होती. प्रत्येक गुन्हयात ते मुंबईच्या ऑर्थररोड कारागृहात अटकेत होते. सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयाकामी न्यायालयात तारखेला हजर असतांना आपल्या विरोधातील गुन्हयाच्या दोषारोपपत्राचा एक सेट न्यायालयाकडून गुप्ता यांना मिळाला. या दोषारोपाचे वाचन करतांना गुप्ता यांच्या असे लक्षात आले की आपल्या नावे खरेदी विकी झालेले 8624027414 या क्रमांकाचे सिमकार्ड चोपडा जि. जळगाव येथून वितरीत झाले आहे. सदर सिमकार्ड हे प्रेमचंद नावाच्या व्यक्तीने दीपककुमार गुप्ता यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड तयार करत घेतले होते. सीम विकत घेणा-या प्रेमचंद नावाच्या व्यक्तीने त्याचा आधार क्रमांक असलेल्या कार्डची झेरॉक्स प्रत 17 फेब्रुवारी 2017 रोजी सीम विक्रेता रविंद्र भरत महाले यास दिली होती. सीमकार्ड फॉर्मवर प्रेमचंद याने गुप्ता यांची बनावट सही करत ते सीम विकत घेतले होते. सीमविक्रेता रविंद्र महाले याने तो फॉर्म सीमकार्ड डिस्ट्रीब्युटर मुरलीधर गुजराथी याचेकडे जमा केल्याचे दिसून आले. या सर्व घटनाकमात आपला काहीही सहभाग नसल्याचे दीपककुमार गुप्ता यांनी पोलीसांना दिलेल्या जवाबात म्हटले. दीपककुमार गुप्ता यांचे मुळ आधारकार्ड व बनावट आधारकार्ड यांची पडताळणी केली असता 9188326xxxxx या कमांकाचे आधार कार्ड खरे असल्याचे निष्पन्न झाले. या कालावधीत साडेचार महिने ऑर्थर रोड कारागृहात राहून संघर्ष केल्यानंतर दीपककुमार गुप्ता सर्व गुन्हयातून जामीनावर बाहेर आले.

जामीनावर मुक्त झाल्यानंतर चारही गुन्हयात आपल्याला कुणीतरी कटकारस्थान रचून अडकवल्याचे दीपककुमार गुप्ता यांच्या लक्षात आले होते. आपल्या परिवाराच्या जीवीतास धोका असल्याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांचेसह विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र व जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे मेलद्धारे तकार केली. आपल्याविरोधात असलेल्या सर्व गुन्हयांची सीबीआय किंवा सीआयडी चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली. या दरम्यान 7 नोव्हेंबर 2017 रोजी दीपककुमार गुप्ता यांना एकाएकी अर्धागवायूचा झटका आला. कित्येक उपचार घेतल्यानंतरदेखील त्यांचे दोन्ही हात व पाय मोठ्या प्रमाणात निकामी झाले होते. वैदयकीय सल्ल्यानुसार त्यांना आराम करणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना आपल्या तकारींचा पाठपुरावा योग्य रीतीने करता येत नव्हता.

अज्ञात व्यक्तीने आपल्याविरोधात कटकारस्थान रचून बनावट आधारकार्ड तयार करत आपल्याला छळले असल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची मानसिकता दीपककुमार गुप्ता यांची झाली होती. सदर बनावट आधारकार्डच्या मदतीने कागदपत्रांची पुरेपुर खात्री केल्याशिवाय सीम अॅक्टीव्हेट करण्यात आले होते. दीपककुमार गुप्ता यांना शंका आहे की ते वापरत असलेला लिनिओ कंपनीच्या मोबाईलचा आयएमइआय कमांक तांत्रीक साधनांद्वारे क्लोन करुन बनावट सिमकार्डच्या मदतीने विविध महिला आमदारांना अश्लील संदेश पाठवून गुन्हयात अडकवून फसवणूक केली आहे. याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला 3 एप्रिल 2018 रोजी गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा चोपडा शहर पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 42/18 भा. द. वि. 420, 465, 468, 469, 471, 120 (ब) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 व 67 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्हयात अज्ञात प्रेमचंद नावाच्या व्यक्तीसह सीमकार्ड विकेता रविंद्र भरत महाले, सिमकार्ड डिस्ट्रीब्युटर मुरलीधर गुजराथी, टेलीनॉर कंपनीतील संबंधीत कालावधीतील सीमकार्ड व्हेरीफिकेशन विभागातील संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना संशयीत आरोपी करण्यात आले.

दीपककुमार गुप्ता यांनी त्यांचेवरील विविध आरोप खोडून काढले आहेत. सदर वादग्रस्त सिमकार्ड जे त्यांचे नावे वितरीत झाले होते ते विकत घेण्यास ते स्वतः गेले नव्हते. दीपककुमार गुप्ता यांची जन्म तारीख 19 ऑक्टोबर 19xx ही आहे. परंतू ती 7 एप्रिल 19xx दाखवण्यात आली होती. त्यांच्या ख-या सहीत व बनावट सहीत फरक आढळून आला. बनावट आधारकार्डवरील त्यांचे कपडे व असली आधारकार्डवरील कपडे यात फरक आहे. त्यांच्या मुळ पत्त्यात घरकुल असा उल्लेख असतांना बनावट पत्त्यात गुरुकुल असा उल्लेख करण्यात आला आहे. असे अनेक मुददे त्यांनी उपस्थित केले. आयएमइआय क्रमांक गुप्ता यांचा वापरला गेला असला तरी मोबाईल वापरला गेला नव्हता. चौकशीत “एसएमएस नॉट फाउंड” असे निष्पन्न झाले आहे.

खोटया केसेसमध्ये अडकवल्याबददल आपल्याला कुटूंबासह सामुहीक आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी म्हणून दीपककुमार गुप्ता यांनी 31 जुलै 2017 रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकांना मेलद्वारे मागणी केली होती. महिला आमदारांना त्यांच्या मोबाईलवर मिळालेले अश्लील एसएमएस प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सध्या जामीनावर मुक्त असलेले माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार प्यारेलाल गुप्ता अन्यायाविरुद्ध लढा देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here