अल्पवयीन रुग्ण मुलीवर डॉक्टरने केला अत्याचार

On: August 6, 2020 8:56 PM

भिवंडी : कोरोना विषाणूची महामारी सुरु असतांना डॉक्टरांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले जात आहे. असे असले तरी वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी एक दुर्दैवी घटना भिवंडीत घडली. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे. पीडित मुलीच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन नराधम डॉक्टरविरुद्ध विविध कलमान्वये अत्याचाराचा गुन्हा नोंद करण्यात आला.

तब्बेत बरी नसल्यामुळे दोघी मायलेकी गुलजार नगर स्थित डॉ. बदरुजमा खान याच्याकडे वैद्यकीय उपचारासाठी गेल्या होत्या. यावेळी डॉक्टरने तपासणी केल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी बोलावले होते.

दुस-या दिवशी तिच्या आईने पिडीत मुलीसोबत तिच्या भावाला पाठवले होते. यावेळी डॉक्टरने पिडीत मुलीला मुद्दाम सर्वात शेवटी तपासणीसाठी बोलावले. दवाखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यावेळी मुद्दाम बाहेर पाठवून देण्यात आले. मुलीच्या लहान भावाला सुटे पैसे आणण्याच्या बहाण्याने घरी पाठवून दिले. अशा प्रकारे संधीचा गैरफायदा घेत डॉक्टरने पिडीतेवर अत्याचार केला.

घरी आल्यावर पिडीत अल्पवयीन मुलीने हा प्रकार आईला कथन केला. त्यानुसार तिच्या आईने शांतीनगर पोलिस स्टेशनला डॉक्टर विरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला.  शांतीनगर पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध भा.द.वि. कलम 354 ( ए ) , 376 (2)( इ) , 376 (सी) ( डी) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अशा कलमांतर्गत गुन्हा नोंद केला. मात्र, डॉक्टरला अद्याप अटक झालेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment