खुनाचे गुन्ह्यातील फरार आरोपीस एलसीबीने केली अटक

On: December 22, 2022 12:27 PM

जळगाव : जळगाव शहरातील जुने बस स्थानकाच्या मागील भागात झालेल्या खूनातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज मध्यरात्री व भल्या पहाटेच्या दरम्यान शिताफीने अटक केली आहे. नरेंद्र उर्फ भुऱ्या उर्फ भद्रा पंडीत सोनवणे असे  अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव  आहे. आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे याचा 20 डिसेंबरच्या सायंकाळी खून झाला होता. गुन्हा घडल्यापासून नरेंद्र उर्फ भु-या  सोनवणे हा फरार होता.

फरार नरेंद्र उर्फ भु-या हा पोलिसांच्या कारवाईच्या भितीने मोबाईल वापरत नव्हता. आपले लोकेशन कुणाला समजू नये  यासाठी तो प्रयत्नशिल होता. तरी देखील आपले कौशल्य अर्थात कसब वापरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात यश  मिळवले आहे. त्याला त्याच्या मुळ गावी आसोदा येथून अटक  करण्यात आली आहे.

जुन्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेत गोपाल उर्फ अण्णा कैलास सैंदाणे  याला यापुर्वीच अटक  करण्यात आली आहे. अटकेतील आरोपींची संख्या आता दोन झाली आहे. मोबाईल वापरत नसल्यामुळे पोलिस पथकाने त्याचा बुरहानपुर, भुसावळ आदी गावांना जावून शोध  घेतला. मात्र तो  मिळून येत  नव्हता.

भु-या हा आसोदा येथे आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अक्रम शेख,  विजय पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, सचिन महाजन आदींना रवाना केले. या पथकाने भु-या  यास  अटक केली. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला जळगाव शहर  पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment