नांदेड : ‘अखेरचा जय महाराष्ट्र, राजकारण करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही’ असे सुसाईड नोट मधे लिहून नांदेडमधील मनसेचे शहराध्यक्ष सुनिल ईरावार या तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.
सुनिल ईरावार हा मनसेचा नांदेड शहराध्यक्ष म्हणून काम बघत होता. सकाळी साडे सहाच्या सुमारास सुनिलने राहत्या घरात कपड्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. सुनिलने वयाच्या 27 व्या वर्षी आपले जीवन संपवल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनिलने आत्महत्येपूर्वी एक सुसाई़ड नोट लिहीली आहे. त्यात त्याने म्हटले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागीतली आहे.
‘अखेरचा जय महाराष्ट्र’ यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे पुढील जीवन माझ्या मर्जीप्रमाणे संपवत आहे. माझ्यामुळे कुणालाच त्रास देऊ नका. राजसाहेब, मला माफ करा. आमच्या इथं पैसे आणि जात या दोन गोष्टींवर राजकारण आहे. त्या दोन्ही गोष्टी माझ्याजवळ नाहीत. जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे अशा मजकुराचा उल्लेख त्या सुसाईड नोट मधे आहे.