अत्याचारानंतर भावी पत्नीची गळा चिरून हत्या!

On: February 20, 2023 8:27 AM

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील वरुड येथील उपवर मुलाने त्याच्या भावी पत्नीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जालना जिल्ह्यातील बेलोरा येथे 18 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव (17) असे मयत तरुणीचे नाव आहे. सुशील सुभाष पवार (रा. वरुड, ता. मेहकर) याच्याविरुद्ध अत्याचार, खूनासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशिल पवार हा अद्याप फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.

बेलोरा गावातील दीप्ती ऊर्फ सपना संदीप जाधव या सतरा वर्षाच्या मुलीचा मेहकर तालुक्यातील वरूड (जि.बुलढाणा) येथील सुशील पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. 17 मार्च 2023 रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू-वराकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता खरेदीसाठी गेली होती. हीच संधी साधून सुशील पवार याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने भावी नवरी दीप्ती घरी एकटीच होती. संधी साधत सुशिल याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने तिचा गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला. या प्रकरणी मयत मुलीचे वडील संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून संशयित सुशील पवार याच्याविरुद्ध सेवली पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. लग्न ठरविताना दीप्तीच्या वडिलांकडून संशयीत आरोपीचे वडील सुभाष पवार, भाऊ अमोल पवार यांनी रोख दीड लाख रुपये आणि वरासाठी 25 हजारांची सोन्याची अंगठी घेतल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणी वडील आणि भाऊ या दोघांविरुद्ध लग्नासाठी पैसे घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आणखी हुंडा प्रतिबंधक कायद्याचे कलम वाढण्याची शक्यता आहे. स.पो.नि. नित्यानंद उबाळे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment