पिंपरी चिंचवड : चोरीच्या उद्देशाने घरात गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी बांधून बेदम मारहाण केली होती. या घटनेत चोराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड भागात घडली.पिंपरी चिंचवडच्या भोसरी गावठाण परिसरात ही घटना घडली.
भोसरीतील एका सोसायटीत हा तरुण चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. सोसायटी मधील एका घरात हा चोर घुसला त्यावेळी काही नागरिकांच्य लक्षात ही बाब आली. त्यांनी या तरुणाला पकडले. चोर व नागरिक यांच्यातील वाद वाढत गेला. जमलेल्या लोकांनी त्याला बांधून मारहाण सुरु केली. त्यात तो जबर जखमी झाला.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत त्या जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. तरुणाचा नेमका मृत्यू मारहाणीमुळे झाला की अन्य कारणामुळे याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे करत आहे.






