7 लाख 75 हजारात विवाहीतेची ऑनलाईन फसवणूक

जळगाव : बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी करत पलीकडून मोबाईलवर बोलणा-या अनोळखी इसमाकडून विवाहीतेची 7 लाख 75 हजार रुपयात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला संबंधित मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंधन बॅंकेतून बोलत असल्याचे भासवून जळगाव शहरातील एका विवाहीतेला 21 मार्च रोजी दुपारी एका अनोळखी इसमाचा कॉल आला. बॅंकेत असलेली फिक्स डिपॉजीट अपडेट करायची असल्याचे सांगून पलीकडून बोलणा-या व्यक्तीने महिलेकडून ओटीपी जाणून घेतला. तो ओटीपी समजताच पलीकडून बोलणा-या व्यक्तीने महिलेच्या खात्यातील 7 लाख 75 हजार रुपये परस्पर वर्ग करुन घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिस स्टेशनला धाव घेत संबंधीत अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील करत आहेत.  

वारंवार भिती अथवा आमिषाच्या सापळ्यात अडकणा-या लोकांमुळे लबाडांची चंगळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातून सावध राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. बॅंकेतून कधीही कुणाला ओटीपी विचारला जात नसल्याचे नेहमी सांगितले जाते. तरीदेखील भीती अथवा आमिष दाखवून भामटे विविध मार्गांनी लोकांची फसवणूक करत असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here