पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात पन्नास हजार रुपयांची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. एसीबी पथकाने सापळा रचून जाधवर यांना त्यांच्याच कार्यालयातच अटक केली.
वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी तक्रारदार त्यांची फाइल क्लिअर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन देखील फाइल क्लिअर करण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर ते कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारांनी कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच लाच घेताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाई केली.