फुटपाथवरील नशेखोर मुले करतात चोरी — एकाने कापली दुस-याच्या जीवनाची दोरी

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क): “रहने को घर नही, सोने को बिस्तर नही” हे संजय दत्त अभिनीत “सडक” या चित्रपटातील गाणे आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रहायला घर नाही, निजायला बिछाना नाही अशी अवस्था कित्येक बेघर लोकांची असते. आकाशाला चादर आणि जमीनीला बिछाना समजून, चार ठिकाणी भिक्षा मागून बेघर आपला उदरनिर्वाह करतात. अन्न, वस्त्र आणि निवारा या जिवनावश्यक मुलभुत घटकांची बेघर परिवाराकडे कमतरता असते. बेघर असले तरी देखील प्रत्येक बेघर आपापल्या परीने जसे जमेल तसे कोणत्याही मार्गाने अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी पर्याय शोधूनच घेतो.

निसर्गाने मानवाला जशी पोटाची भुक दिली आहे तशीच पोटाखालची भुक देखील दिली आहे. पोटाची भुक बालपणापासूनच पुर्ण करायची असते. पोटाखालची भुक विशिष्ट वयानंतर पुर्ण करायची असते. बेघर स्त्री – पुरुष असले तरी त्यांना देखील पोटाची आणि पोटाखालची भुक असते. गरज ही शोधाची जननी असते. त्यामुळे ती भुक पुर्ण करण्यासाठी प्रत्येक जण काहीना काही पर्याय शोधूनच घेत असतो. शरीराची भुक भागवण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जावू शकतो.

भुसावळ शहरातील एका फुटपाथवर एक बेघर महिला रहात होती. या महिलेला देखील निसर्गाने भुक दिली होती. कचरा आणि भंगार साहित्य जमा करुन, त्याची विक्री करुन ती आपला चरितार्थ चालवत होती. आपल्या दोन्ही प्रकारच्या भुक पुर्ण करण्यासाठी तिने मार्ग शोधले होते. तिला साधारण बारा वर्षाचा सोनू (नाव बदललेले) नावाचा एक मुलगा होता. हा मुलगा तिला नेमका कुणापासून झाला हा एक वेगळा विषय आहे. बारा वर्षाच्या सोनूची आई कचरा वेचून आपला उदरनिर्वाह करत होती. परिस्थितीने फाटलेला संसार सोनूची आई कचरा व भंगार वेचून शिवण्याचा प्रयत्न करत होती.

बारा वर्षाच्या सोनूची ओळख अनेक बेघर मुला मुलींसोबत झाली होती. या सर्व बेघर मुलांना सोल्युशनची नशा  करण्याची सवय जडली होती. सोल्युशनची नशा केल्यामुळे लवकर भुक लागत नाही अथवा लागतच नाही हे या बेघर मुलांचे संशोधन आहे. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात चो-या करुन हाती आलेल्या पैशातून ही मुले सोल्युशनची नशा करत होते. सोल्युशनची नशा केली म्हणजे त्यांच्या पोटाच्या भुकेचा विषय मार्गी लागत असे. 

बेघर मुलांचे बालपण एकप्रकारे वाळवंटासमान रुक्ष झालेले असते. बेघर आणि निवाराहीन मुलांचे बालपण नियतीने जणूकाही हिसकावून घेतलेले असते. अशा अल्पवयीन मुलांना बालपणाचे आणि तरुणपणाचे सुख मिळत नाही. त्यातून त्यांच्या अंगी परिस्थितीनुरुप गुन्हेगारी जन्माला येते.

बारा वर्षाच्या सोनूची ओळख गोटू (नाव बदललेले) नावाच्या एका अल्पवयीन मुलासोबत झाली. गोटू जवळपास साडे सतरा वर्षाचा होता. गोटू हा सोनूपेक्षा वयाने मोठा होता. त्यामुळे साहजीकच गुन्हेगारी वृत्ती असलेल्या गोटूची सोनूवर दादागिरी चालत होती. गोटू हा वयाने आणि अंगाने सोनूपेक्षा मोठा होता. सोनू लहान असला तरी देखील त्याचे तोंड मात्र फटकळ होते. सोनू आणि गोटू या दोघांना चो-या करण्याचा नाद जडला होता. लहान मुलांच्या सायकली चोरुन त्या विकण्याची दोघांना सवय जडली होती. चोरी केलेली सायकल विकून आलेल्या पैशातून गोटू हा सोनूला केवळ शंभर रुपये देत असे. स्वस्तात सायकल मिळत असल्यामुळे घेणारा देखील त्या सायकलीच्या मागे दडलेली चोरीची पार्श्वभुमी न बघता स्वस्तात सायकल घेत असे. ही सामाजीक मनोवृत्ती घातक म्हटली पाहिजे. सायकल विकून आलेले सर्व पैसे गोटू स्वत:कडे ठेवून सोनूला अवघे शंभर रुपये देत असे. त्यामुळे सोनू त्याला अतिशय घाणेरड्या शब्दात संवेदनशील घटक असलेल्या आई वरुन घृणास्पद शिव्या देत असे. त्याचा गोटूला राग येत असे. दोघे अल्पवयीन होते आणी या बाल वयातच दोघांना चोरी करण्याची सवय जडली. शिक्षण आणि संस्कृतीचा अभाव असलेल्या दोघांना तसे बघता कुणाचा धाक नव्हता. त्यामुळे दोघे चोरी करण्याच्या बाबतीत समविचारी झाले होते. बारा वर्षाचा सोनू हा वयाने आणि अंगकाठीने गोटूपेक्षा जवळपास पाच वर्षाने लहान असला तरी तो फाटक्या तोंडाचा होता. तो गोटूला अतिशय घाणेरड्या शिव्या देत असे.

दि. 16 जुलै 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सोनू आणि गोटू असे दोघेजण भुसावळ शहरात एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी सोनू गोटूला म्हणाला की मला मोहरमची मिरवणूक बघायची आहे. आपण दोघे मोहरमची मिरवणूक बघायला जावू.  मोहरमची मिरवणूक बघण्यासाठी दोघे भुसावळ शहरात फिरु लागले. मात्र एका ठिकाणी त्यांना जोरजोरात भांडण सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे दोघे जण परत आले.

संजय सपकाळे हेड कॉन्स्टेबल

या वेळी सोनूने एका लहान मुलाची सायकल चोरली. यावेळी सायकल चोरी करण्यास गोटूने नकार दिला. सायकल चोरी करण्यास आणि तिचा सांभाळ करण्यास गोटूचा नकार ऐकून सोनूने त्याला त्याच्या आईवरुन अतिशय घाणेरडी शिवी दिली. ती शिवी गोटूच्या जिव्हारी लागली. त्यामुळे गोटूने त्याला रागाच्या भरात एक जोरदार चापट मारली. त्यानंतर काहीवेळाने दोघे सामान्य स्थितीत पुर्वपदावर आले असले तरी गोटूच्या मनात सोनूबद्दल राग धुमसत होता.

राग विसरल्यासारखे भासवत गोटू त्याच्यासोबत चालू लागला. दोघे जण चालत चालत रेल्वे पुलाकडे आले. त्याठिकाणी दोघांनी सोल्युशनची नशा केली. नशा केल्यानंतर सोनूला पाण्याची तहान लागली. पाण्याच्या शोधात दोघेजण रेल्वे ट्रॅकने चालू लागले. कुणी धावत्या रेल्वेतून पाण्याने अर्धवट भरलेली वापरुन फेकलेली पाण्याची बाटली रेल्वे लाईनवर मिळते का याचा ते शोध घेऊ लागले. चालत असतांना गोटूने त्याला एका शेतात नेले. त्याठिकाणी सोनूला एक पाईपलाईन दिसली. स्वत:ला पाणी पिण्यासाठी त्याने थेट पाईपलाईन फोडण्यास सुरुवात केली. त्याच्या या कृत्याला गोटूने विरोध केला. त्याचा विरोध बघून सोनूने त्याला पुन्हा त्याच्या आईवरुन शिवीगाळ सुरु केली. आपल्या आईवरुन सोनू आपल्याला नेहमीच घाणेरडी शिवीगाळ करत असल्यामुळे गोटू मनातून त्याच्यावर पुन्हा चिडला.

त्यामुळे गोटूच्या मनातील सोनूबद्दलचा राग पुन्हा उफाळून आला. आज रात्रीच सोनूला कायमचे संपवायचे असा गोटूने मनाशी ठाम निश्चय केला. साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालय परिसरातील ते निर्जन ठिकाण होते. रात्रीच्या अंधारात चालत असतांना मनातून चिडलेल्या गोटूने सोनूच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रुमालाने त्याला गळफास देण्यास सुरुवात केली. गोटूच्या प्रबळ शक्तीपुढे सोनूचा निभाव लागला नाही.

सोनूला गळफास बसल्याने काही वेळातच त्याचा अंत झाला. सुमारे साडेसतरा वर्षाच्या गोटूने बारा वर्षाच्या सोनूला जीवानिशी ठार केले. मरण पावलेल्या सोनूची ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरील सर्व कपडे काढून ते फेकून देण्याचे काम गोटूने केले. त्यानंतर रस्त्याने पायी पायी चालत गोटू भुसावळ शहरातील सरकारी दवाखान्याकडे आला. त्यानंतर त्याने एका वाहनाला हात देऊन ते वाहन थांबवले. त्या वाहनात बसून गोटू जळगावला पळून आला आणि पुन्हा भुसावळला एक महिना आलाच नाही.

त्यानंतर 18 जुलै 2024 रोजी सोनूच्या मृतदेहाची खबर भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला समजली. माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नवोदय विद्यालयाच्या मागे यज्ञेश मोहन नेमाडे यांच्या शेतातील ते घटनास्थळ होते. या घटनेतील मयत पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता. त्याचे वय अंदाजे विस ते बाविस वर्ष असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनास्थळावरील मयत बालक हा निर्वस्त्र होता. त्याच्या अंगावरील कपडे काढून बाजूला फेकून देण्यात आले होते. पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी असलेल्या मयताचा रुमालाने गळा दाबून त्याला जीवे ठार केल्याप्रकरणी सुरुवातीला भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.  25/24  या क्रमांकाने या घटनेची नोंद घेण्यात आली. या अकस्मात मृत्यूच्या चौकशी व तपासाअंती अनोळखी मारेक-याविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.  सरकारतर्फे हे.कॉ. संजय काशिनाथ भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.र. नं 153/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1) प्रमाणे 20 जुलै रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

या घटनेतील मयताची ओळख पटवणे अतिशय गरजेचे होते. मयताची ओळख पटल्याशिवाय पुढील तपासाला गती मिळणार नव्हती. मयताचे घटनास्थळावरील कपड्यांच्या मदतीने आपण हा तपास पुढे नेऊ शकतो असा विश्वास पो.नि. महेश गायकवाड यांना होता. मयताचे कपडेच आपल्याला गुन्हेगारापर्यंत माग दाखवतील या विश्वासाच्या बळावर पो.नि. महेश गायकवाड यांनी आपल्या तपास पथकातील सहका-यांना सुचना दिल्या. उप विभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या अधिपत्याखाली चार पथके तपासकामी तयार करण्यात आली. त्यात त्यांच्या पथकासह बाजारपेठ पोलिस स्टेशन, तालुका पोलिस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा समावेश करण्यात आला.

रेल्वे स्टेशन, बस स्थानकासह भुसावळ शहर  आणि परिसरातील गर्दीच्या ठिकाणी मयताचे कपडे आणि मृतदेहाच्या फोटोंचे पोस्टर प्रसिद्ध करुन अनोळखी मयताची ओळख पटवण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. या माध्यमातून मयताच्या वारसांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृतीचा लवकरच उपयोग झाला. पोलिसांच्या दृष्टीने मयत सोनूच्या आईच्या हे फोटो बघण्यात आले. तिने फोटोतील ते कपडे बघून हा आपला मुलगा असल्याचे ओळखले. तिला लिहीता वाचता येत नसले तरी फोटोच्या माध्यमातून हा काहीतरी अघटीत प्रकार असल्याचे तिच्या लक्षात आले. ती फुटपाथवर राहणारी बेघर असली तरी धाडस करत तिने पोलिसांची भेट घेत या फोटोतील कपडे आणि दिसणारा मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे तिने कथन केले. त्यामुळे तिला प्रत्यक्ष कपडे दाखवले असता ते कपडे आपल्याच मुलाचे असल्याची तिची खात्री झाली. अशा प्रकारे चौकशी आणि तपासाअंती मयताची ओळख पटली आणि वारसाचा शोध लागला. आता मारेक-याचा शोध लावण्याचे कसब राहिले होते.

मयत सोनूसोबत नेहमी गोटू (काल्पनिक नाव) नावाचा मुलगा रहात होता आणि तो घटना घडल्यापासून ते उघडकीस आल्यापर्यंत फरार असल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. सोनूच्या आईने दिलेल्या माहितीने पोलिसांना संशयीत मारेक-याचा सुगावा लागला. त्यामाहितीच्या आधारे घटना घडल्यापासून परिसरातील सिसीटीव्ही फुटेज अक्षरश: डोळ्यात तेल घालून तपासण्यात आले. मात्र त्यात गोटू कुठेही आढळून आला नाही. बघता बघता जवळपास एक महिन्यांचा कालावधी उलटला.

18 ऑगस्ट 2024 रोजी अचानक फरार झालेला गोटू मयत सोनूच्या आईच्या नजरेस पडला. तो दिसताच सोनूच्या आईने मोठमोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. तिने एवढ्या मोठ्याने आरडाओरड केली की हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठ पोलिसांचे पथक तिच्याजवळ माहिती जाणून घेण्यासाठी धावून आले. बाजारपेठ पोलिसांचे पथक तिच्याजवळ येताच ओरडून धाप लागलेल्या सोनूच्या आईने त्यांना सर्व घटनाक्रम कथन केला. सर्व प्रकार लक्षात येताच बाजारपेठ पोलिसांनी गोटूला पकडून ताब्यात घेतले. त्यांनी भुसावळ तालुका पोलिसांना या बाबत माहिती देत बोलावून घेतले आणि गोटूला त्यांच्या ताब्यात दिले. अशा प्रकारे बाजारपेठ पोलिसांचे याकामी मोलाचे सहकार्य लाभले.

ताब्यात घेतलेल्या गोटूची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. मयत सोनू नेहमी आपल्या आईबद्दल अपशब्द बोलत होता व त्यामुळेच आपण त्याचा रुमालाने गळा आवळून खून केल्याचे गोटूने कबुल केले. हत्येनंतर त्याची ओळख पटू नये म्हणून आपण  त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकल्याचे देखील त्याने कबुल केले. मात्र याच कपड्यांमुले पोलिसांना त्याचा शोध घेता आला. तुझ्या आईबद्दल जे अपशब्द सोनू तुला बोलत होता तेच अपशब्द तुझा बाप देखील तुझ्यासोबत बोलतो मग तु बापाला का बोलत नाही अशी भावनिक विचारणा पोलिसांनी ताब्यातील गोटूला विचारले. त्यावर तो माझा जन्मदाता बाप आहे, त्याने बोललेले सर्व क्षम्य आहे असे गोटूने पोलिसांना बोलतांना सांगितले. अधिक तपासाअंती गोटूचे वय तपासले असता तो साडेसतरा वर्षाचा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.

गोटूबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अल्पवयीन गोटू हा यावल तालुक्यातील रहिवासी आहे. त्याचे आधारकार्ड तो बाल सुधारगृहात असतांना तयार करण्यात आले होते. इयत्ता चौथी पर्यंत शिकलेला गोटू बाल गुन्हेगार असून दहा ते  बारा वेळा तो बाल सुधारगृहात जावून आला आहे. त्याला आणि मयत सोनूला लहान मुलांच्या सायकली चोरी करण्याची सवय  जडली होती. दोघांना सोल्युशनची नशा करण्याची आरोग्याला घातक असलेली सवय जडली होती. या सवयीमुळे नैसर्गिक भुक मारली जात असल्याचे सांगितले जाते. सायकल चोरी केल्यानंतर सोनूने गोटूला त्याच्या आईवरुन अतिशय अश्लिल शिवीगाळ केली होती. त्यामुळे ही खूनाची घटना घडली.

गोटूचे आई, वडील, भाऊ व दोन बहिणी यावल तालुक्यात राहतात. गोटूच्या आईला त्याचे वडील घृणास्पद शिवीगाळ करत असल्यामुळे तो नेहमी घर सोडून पळून जात असे. दहा वर्षाचा असतांनाच त्याला घरातून पळून जाण्याची व गुन्हेगारीची सवय जडली. घर सोडून जाणारा गोटू जळगाव, भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात भटकत असे. लहानपणापासूनच त्याला सोल्युशनची नशा करण्याची सवय जडली. मिळेल ते काम करायचे नाहीतर चोरी करुन पोट भरण्याचा त्याचा उद्योग होता. त्याचा मोठा भाऊ देखील घर सोडून कर्नाटक राज्यात पळून गेला आहे. तो कधी तरी  घरी  येतो.

लहान असतांना गुन्हेगारी वृत्तीच्या गोटूला चाईल्ड लाईनच्या पथकाने पकडून रिमांड होममधे दाखल केले होते. रिमांड होममधेच त्याचे चौथीपर्यंत शिक्षण पुर्ण झाले. त्यामुळे त्याला सही देखील करता येते. रिमांड होममधेच त्याचे आधार कार्ड देखील तयार झाले. त्यामुळेच तो अल्पवयीन असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.

सुमारे दहा ते बारा वेळा रिमांड होममधे दाखल झालेल्या गोटूला त्याच्या वडीलांनी अनेकदा सोडवले. रिमांड होममधून सुटून आल्यानंतर तो पुन्हा पळून जाण्यासह चोरीचे उद्योग करत  होता. काही दिवस तो जळगाव तालुक्यातील  आव्हाणे या गावी मुक्कामी होता. या मुक्कामात तेथील एका बाबाने त्याचे नामकरण केले होते. त्या बाबाकडे काही वर्ष राहिल्यानंतर तो जळगाव – भुसावळला राहण्यास आला. मात्र जळगांव येथे सोल्युशन मिळत नसल्याने तो भुसावळला राहण्यास आला. या कालावधीत त्याची अनेक बाल गुन्हेगारांसोबत मैत्री झाली.   

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे सहकारी हे.कॉ. संजय तायडे, हे.कॉ. संजय भोई, हे.कॉ. वाल्मिक सोनवणे, पो.कॉ. जगदीश भोई, रशीद तडवी, वाहन चालक सहायक फौजदार रियाज काझी, सादिक शेख तसेच पोहेकॉ. उमाकांत पाटील, पोहेकॉ रमण सुरळकर, पोकॉ. संकेत झांबरे, पो.कॉ.  प्रशांत परदेशी, योगेश माळी आदी  पुर्ण करत  आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here