दोघा कुख्यात गुन्हेगारांकडून देशी कट्टे हस्तगत

On: May 11, 2025 1:48 PM

यवतमाळ (घाटंजी) (अयनुद्दीन सोलंकी) : लोहारा येथील दोघा सराईत तडीपार गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून दोन देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे. दीपक ऊर्फ भैया राममनोहर यादव (रा. देवीनगर लोहारा) व प्रफुल्ल ऊर्फ पप्या नंदू रावेकर (रा. इंदिरानगर यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा गुन्हेगारांची नावे आहेत. अटकेतील दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांना तडीपार करण्यात आले होते.

तडीपार काळात देखील दोघे लोहारा परिसरातच फिरत होते. दोघे गुन्हेगार लोहारा परिसरात खुलेआम वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला समजली होती. त्या माहितीच्या आधारे दोघांवर लक्ष ठेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जातून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.

अटकेतील दोघा गुन्हेगारांविरुद्ध कलम ३/२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५, १४२ महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर करत आहेत. पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप, पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संतोष मनवर, सहायक फौजदार योगेश गटलेवार, जमादार अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment