जळगाव : पारोळा तालुक्यातील सुमठाणे शिवारात महिलेचा पोत्यात मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मयत अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या करुन मृतदेह पोत्यात भरुन तो सुमठाणे शिवरातील जंगलात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा प्रकार बक-या चारणा-या तरुणांच्या लक्षात आला.
मयत अनोळखी महिलेचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होते. मृतदेह सापडला ते ठिकाण अमळनेर आणि पारोळा पोलिस स्टेशनच्या सीमेवर असल्याने अगोदर अमळनेर पोलिसांचे पथक दाखल झाले. मात्र हे ठिकाण पारोळा पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







