अमरावतीचे खिसेकापू जळगाव पोलिसांच्या ताब्यात

On: June 26, 2025 6:13 PM

जळगाव : आपले सामान आपल्या नजरेसमोर ठेवा, खिसेकापूंपासून सावध रहा असे आवाहन ध्वनीक्षेपकाद्वारे बस स्थानकावर नेहमी केले जाते. मात्र प्रवाशांची बसमध्ये चढण्याची घाई आणि गर्दीचा गैरफायदा घेत खिसेकापू प्रवाशांच्या खिशातील पैसे शिताफीने गायब करण्यात पारंगत झालेले असतात. अशा पारंगत आंतर जिल्हा खिसेकापू चोरट्यांना जळगाव बस स्थानकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

अमरावती येथील काही सराईत खिसेकापू चोरटे जळगाव बस स्थानकात आले असल्याची गोपनीय माहिती हवालदार प्रवीण भालेराव आणि अक्रम शेख यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद बागल, पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकॉ नितीन प्रकाश बाविस्कर, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, पोकॉ रविंद्र कापडणे आदींचे पथक पुढील कारवाईकामी रवाना झाले.

जळगाव बस स्थानक परिसरात गस्ती दरम्यान तिघे संशयित पोलिस पथकाच्या नजरेच्या टप्प्यात आले. तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. 24 जून रोजी दुपारच्या वेळी बस मधे चढत असलेल्या प्रवाशाच्या खिशांतील शंभर रुपयांचे दोन बंडल चोरी केल्याचे त्यांनी कबुल केले. अहमद बेग कादर बेग, हफिज शाह हबीब शाह आणि अजहर हुसैन जफर हुसेन या अमरावती येथील तिघांसह त्यांच्या वाहनाच्या झडतीत 33 हजार 830 रुपये रोख रक्कम, 17 हजार 500 रुपये किमतीचे पाच मोबाइल, एक रेक्झीन बॅग, पाच लाख रुपये किमतीची कार असा एकुण 5 लाख 51 हजार 530 रुपये किमतीचा मुद्देमाल त्यांच्या कब्जातून हस्तगत करण्यात आला. तिघा चोरट्यांविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमद बेग कादर बेग याच्याविरुध्द अमरावती शहरात विविध पोलीस स्टेशनला चार गुन्हे दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकॉ नितीन बाविस्कर, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, पोकॉ रविंद्र कापडणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment