घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्या लगत असलेल्या वडगांव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात अल्पवयीन मुलीवर प्रेमाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. संशयित आरोपी विजय रामदास आत्राम (वय २२, रा. येळाबारा) असे आरोपीचे नांव असून त्याच्यावर वडगाव जंगल पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही बाराव्या वर्गात शिकत असून, ती आपल्या कुटुंबियांसोबत राहते. दोन वर्षांपूर्वी तिची संशयित आरोपी विजय आत्राम याच्याशी ओळख झाली होती. काही महिन्यांतच त्याने ‘प्रेम करतो’ असे सांगत तिला भावनिक जाळ्यात अडकवले. ‘तू मोठी झाल्यावर तुझ्या सोबत मी लग्न करीन’ अशा प्रकारच्या आश्वासन पिडीतेला दिले होते. आरोपीने पिडीतेवर वारंवार दबाव टाकला होता.
एके दिवशी नदीकाठी बोलावून त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर घरी कोणी नसतांना तसेच एकांतस्थळी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिच्यावर अत्याचार केला. अखेर पीडितेने वडगांव जंगल पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदविला, मागील वर्षभरात आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचे पिडीतेने पोलीस जबाबात म्हटले आहे. तसेच फेब्रुवारी २०२५ मध्ये पिडीतेला मासिक पाळी आल्यानंतर ती बंद झाली. पिडीतेची प्रकृतीत बिघाड जाणवू लागल्यानंतर तिने सदर प्रकरण आईला सांगितले. त्यानंतर तिला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारानंतर पिडीता गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. वडगांव जंगल पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास दांडे हे पुढील तपास करीत आहे.







