घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – घाटंजी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने एक जण नदीपात्रात वाहून आल्याची तर एक जण नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. कोपरी – चिंचोली गावा नजीक असलेल्या पूलावरुन वाघाडी नदीच्या पाण्याचा प्रवाह सुरु होता. त्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गावक-यांना आढळून आला. संजय तुरक यांच्यासह गावक-यांनी तो मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने तो मृतदेह पुढे डोर्ली, शरद गावाच्या दिशेने वाहून गेला. अखेरचे वृत्त हाती आले तोपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती.
दुस-या घटनेत शिरोली येथील संभाजी भुऱ्या आत्राम या साठ वर्षांच्या मजूर वृद्धाचा पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. 5 जुलै रोजी संभाजी आत्राम पत्नीसह शेतात गेले होते. त्या रात्री संभाजी आत्राम शेतात थांबले होते. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर दुस-या दिवशी त्यांचा मृतदेहच माणिक आत्राम यांच्या शेतातील झाडाला अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी घाटंजी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून तपास सुरु आहे.







