जळगाव : यावल तालुक्यातील चिंचोली नजीक आडगाव फाट्यावर गुरुवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास झालेल्या हॉटेल मालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी यावल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर हॉटेल मालक घरी जाण्याच्या बेतात असतांना आलेल्या दोघांनी त्यांना दारुची मागणी केली होती. यावेळी हॉटेल मालकाकडून दारु देण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
त्यात हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. चंदू अण्णा नगर, जळगाव) जखमी झाले. या घटने नंतर दोघे हल्लेखोर पसार झाले आहेत. जखमी प्रमोद बावीस्कर यांना जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.







