रिलबाज आकाशने स्टेटस ठेवले रोख आणि ठोक — अंदाधुंद गोळीबारात तुटली त्याच्या जीवनाची नोक  

On: July 13, 2025 9:32 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सारख्या विविध सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर रील्स तयार करुन काही युवक स्वतःला व्यक्त करुन प्रसिद्धी मिळवत आहेत. त्यातून कित्येक जण उत्पन्नही मिळवतात. मात्र, या रील्समागे धावण्याच्या स्पर्धेत अनेक तरुण चुकीच्या मार्गाने जात असून प्रसंगी गुन्हेगारीकडे देखील वळत आहेत.

काही युवक फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात धोकादायक स्टंट करतांना आपल्याला दिसतात. धावत्या ट्रेनच्या फुट बोर्डवर चढून रील बनवणे, रस्त्याच्या मध्यभागी नाचणे, धबधब्याखाली उभे राहणे अशा स्वरुपाचे जीवघेणे प्रकार तरुण रिल्स बनवण्यासाठी करतात. काही तरुण तर रिल्सच्या माध्यमातून शस्त्र प्रदर्शन करतात. हे सर्व प्रकार त्यांच्यासाठी आणि समाजासाठी धोकेदायक आणि घातक ठरत आहे. अशा कृतीमुळे कायद्याचा भंग होतो, अपघात घडतात आणि काही वेळा जीवितहानीही होते.

कित्येक युवक केवळ प्रसिद्धीसाठी आणि स्वत:ला व्यक्त करण्यासाठी जीवघेणे रिल्स तयार करतात. मात्र काही तरुण खुनशी गुन्हेगारी वृत्तीतून प्रतिस्पर्धी तरुणाला प्रत्युत्तर देण्याच्या उद्देशाने रिल्स तयार करतात अथवा तशा स्वरुपाचे स्टेटस ठेवतात. प्रसिद्धीच्या झगमगाटात आणि ऐशोआरामात राहण्यासाठी काही युवक गुन्हेगारीकडे वळतात. अशा प्रकारच्या कृतींवर कायद्याची कारवाई होत असली तरी समाजावर त्याचा वाईट परिणाम होतो.

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्याच्या गावी बस स्थानक आवारात वर्दळीच्या वेळी एका तरुणावर अंदाधुंद गोळीबार करुन त्याची हत्या करण्यात आली. ज्या तरुणाची गोळीबाराच्या घटनेत हत्या झाली त्याने या घटनेच्या काही दिवसांपुर्वी समाज माध्यमांवर एक रिल प्रसारीत केला होता. “शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो, रोख आणि ठोक…. अशा वक्तव्याचा रिल त्याने प्रसारित केला होता. दोन दिवसात खूनाचा गुन्हा घडणार असल्याचे देखील त्याने या स्टेटसच्या माध्यमातून कथन केले होते. त्यानंतर काही दिवसांनी स्टेटस ठेवणा-या तरुणाचीच अंदाधुंद गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा सविस्तर वृत्तांत.

आकाश कैलास मोरे हा पाचोरा येथील शिवाजी नगर परिसरात राहणारा अवघा 26 वर्षाचा तरुण होता. निलेश अनिल सोनवणे हा त्याच्याच वयाचा तरुण पाचोरा येथील जनता वसाहतीत रहात होता. दोघे तरुण पुर्वी एकमेकांचे मित्र होते. मात्र सध्या दोघे एकमेकांचे वैरी झाले होते. जुना वाद हे दोघांच्या दुश्मनीचे कारण म्हटले जाते. वाळू व्यवसायातून दोघांमधे वाद झाल्याचे देखील म्हटले जाते. दोघे एकमेकांकडे खुनशी नजरेने बघत होते. अधूनमधून दोघांचा एकमेकांवरील राग उफाळून येत होता.

पुर्वी बांधकामावर सेंट्रींग काम करणारा आकाश मोरे कालांतराने वाळू व्यावसायीक झाला. वाळू व्यवसायातून त्याला ब-यापैकी उत्पन्न मिळत होते. अंगी तरुणपणा आणी वाळू व्यवसायातून मिळणारे ब-यापैकी उत्पन्न यांचा संगम झाल्यानंतर आकाशच्या अंगी चांगलाच जोश आणि जोम आला होता. “शेठ तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही डायरेक्ट छातीवर मारतो, रोख आणि ठोक.. अशा वक्तव्याचा रिल त्याने समाज माध्यमांवर प्रसारित केला. दोन दिवसात खूनाचा गुन्हा घडणार असे देखील त्याने आपल्या स्टेटसच्या माध्यमातून कथन केले.

मात्र त्याचा हा जोश 4 जुलै 2025 रोजी सायंकाळी कायमचा संपुष्टात आला. 4 जुलै 2025 या दिवसाची सायंकाळ आकाशच्या जीवनातील अखेरची आणि रक्तरंजीत सायंकाळ ठरली. या दिवशी सायंकाळी काही कामानिमीत्त तो त्याच्या ताब्यातील दुचाकीने एकटाच बस स्थानकावर गेला. त्यावेळी सायंकाळचे सव्वा सहा वाजले होते. पाचोरा बसस्थानक परीसरातील हॉटेल योगेश्वर कोल्ड्रींगच्या समोर दुचाकी लावून तो उभा असतांना अचानक निलेश अनिल सोनवणे आणि त्याच्यासोबत एक अल्पवयीन साथीदार असे दोघे जण त्या ठिकाणी आले. त्यातील निलेश सोनवणे याने त्याच्या हातातील गावठी पिस्टलने आकाशच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या गोळीबारीने परिसरातील रहदारी आणि बस स्थानकातील प्रवासी स्तब्ध झाले. एका पाठोपाठ पिस्टलमधून बारा राऊंड फायर झाले. यात आकाशच्या कपाळावर डोक्याजवळ एक, डोक्याच्या उजव्या बाजूला एक, उजव्या बाजूला कानाच्या वर एक, डोक्याच्या मध्यभागी दोन, डोक्याच्या मागील बाजूस दोन, पाठीवर चार, छातीच्या उजव्या बाजूला एक अशा एकुण बारा गोळ्या झाडण्यात आल्या. पिस्टलमधून सुटलेल्या एका पाठोपाठ बारा गोळ्यांमुळे आकाशच्या शरीराची जणूकाही चाळणी झाली. तो धाडकन जमीनीवर कोसळला. बस स्थानक परिसरातील प्रवासी भीतीने इकडे तिकडे धाव घेऊ लागले.

आपला हेतू साध्य झाल्याचे लक्षात आल्यानंतर निलेश सोनवणे व त्याच्या सोबतचा अल्पवयीन साथीदार अशा दोघांनी घटनास्थळावरुन पलायन केले. या घटनेची माहिती संपुर्ण पाचोरा शहरात वा-यासारखी पसरण्यास वेळ लागला नाही. आकाशवर पिस्टलमधून गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती त्याची बहिण प्रियंका हेंबाडे हिस समजली. आपल्या भावाची हत्या झाल्याचे समजताच अस्वस्थ झालेली त्याची बहिण तातडीने बस स्थानकावर धावतच आली. बस स्थानक परिसरात मयत आकाशच्या ताब्यातील दुचाकी उभी होती तर बाजूलाच रक्त आणि त्याची चप्पल पडलेली होती. आकाशला सरकारी दवाखान्यात नेले असल्याचे समजताच त्याची बहिण लागलीच दवाखान्यात गेली. त्याठिकाणी आकाशचा मृतदेह वार्डमधील बेडवर असल्याचे तिला दिसले. तीने त्याच्या मृतदेहाजवळ जाण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र तिला त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला.

या घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला समजताच पोलिस निरीक्षक अशोक पवार व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. लागलीच घटनास्थळ परिसर सिल करण्यात आला. घटनास्थळासह रुग्णालयात बंदोबस्त तैनात करण्यात आला. घटनास्थळ पंचनामा सुरु असतांनाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह खबरी आणि तांत्रीक विश्लेषणाच्या मदतीने घटनेसह मारेक-यांची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

प्रत्यक्ष साक्षीदारांकडून समजलेली माहिती आणि मयत आकाश जीवंत असतांना त्याने त्याच्या बहिणीला सांगितलेल्या माहितीच्या आधारे पाचोरा पोलिस स्टेशनला निलेश अनिल सोनवणे व त्याचा अल्पवयीन साथीदार अशा दोघा संशयीतांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.न. 308/25 आर्म अॅक्ट कलम 4, 25 नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा घडल्यानंतर संशयीत आरोपींच्या वर्णनानुसार त्यांचा शोध सुरु करण्यात आला. त्यांचा शोध सुरु असतांना निलेश सोनवणे व त्याचा अल्पवयीन साथीदार असे दोघे जण पाचोरा शहरातून पसार झाले होते.

निलेश सोनवणे व त्याचा अल्पवयीन साथीदार असे दोघे जण जळगावच्या दिशेने पळून जात होते. मात्र आपल्या मागावर काही लोक असल्याची भिती त्यांना सतावू लागली. वाटेत आपल्यावर हल्ला होऊ शकतो या भितीपोटी दोघांनी आपला पळून जाण्याचा मार्ग बदलला. दोघांनी जळगावला न जाता म्हसावद – नेरी मार्गे जामनेर गाठले. पाचोरा ऐवजी जामनेर पोलिस स्टेशनला शरण जाण्याची दोघांनी मनोमन तयारी केली. त्यांना जामनेर पोलिस स्टेशनचा रस्ता माहिती नव्हता. जामनेर पोलिस स्टेशनच्या बाहेर उभे राहून भेदरलेल्या दोघांनी जामनेर पोलिस स्टेशन कुठे आहे अशी लोकांना विचारणा सुरु केली. तुमच्या समोर असलेले हेच पोलिस स्टेशन असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तेव्हा दोघांनी जामनेर पोलिस स्टेशनला जावून ठाणे अंमलदाराला सर्व हकीकत कथन केली आणि ते हत्यारासह शरण आले.

suspected accused nilesh sonavane

दोघे संशयीत आरोपी शरण आले असल्याची माहिती जामनेर पोलिसांकडून पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आली. या माहितीच्या आधारे पाचोरा पोलिस स्टेशनचे एक पथक दोघा संशयीतांना घेण्यासाठी त्याच रात्री रवाना झाले. पाचोरा पोलिस स्टेशनला दोघांना आणल्यानंतर निलेश सोनवणे यास वैद्यकीय तपासणीअंती अटक करण्यात आली. त्याचा साथीदार अल्पवयीन असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. दोघांची वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्टल त्यांनी पाचोरा येथील शरद युवराज पाटील याच्याकडून विकत घेतल्याचे कबुल केले. या पिस्टलने आकाश मोरे याचा खेळ खलास करणार असल्याचे दोघांनी शरदला सांगितले होते. त्यामुळे ते पिस्टल विक्री करणा-या शरद युवराज पाटील याचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला देखील या गुन्ह्यात संशयीत आरोपी करण्यात आले. त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली. निलेश सोनवणे याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरात एक तलवार आणि चाकू आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा गु.र.न. 308/25 आर्म अॅक्ट कलम 4, 25 प्रमाणे दाखल करण्यात आला. दोघे संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यानंतर राहुलकुमार पवार यांनी पाचोरा पोलिस स्टेशनचा कारभार हाती घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक संजय निकम, पोलिस उप निरीक्षक कृष्णा घायाळ, योगेश गणगे, कैलास ठाकुर, सहायक फौजदार रणजीत पाटील, हे.कॉ. राहुल शिंपी, ज्ञानेश्वर महाजन, पो.कॉ. योगेश पाटील, संदीप पाटील आदी करत आहेत.

समाज माध्यमांमधे रील्स प्रसारीत करणे ही स्वत:ला व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. मात्र तिचा गैरवापर टाळला पाहिजे हे या घटनेच्या निमीत्ताने सांगावेसे वाटते. युवकांनी सामाजिक जबाबदारी समजून घेतली पाहिजे. प्रसिद्धीच्या नादात आणि खुनशी विचारातून युवकांनी आपल्या भविष्याचा नाश करु नये. सरकार, पालक, शिक्षक आणि समाजाने एकत्र येऊन या समस्येवर उपाय शोधला पाहिजे. युवकांची मानसिकता समजून घेणे ही पालकांची आणि समाजाची जबाबदारी आहे. सोशल मीडियाच्या योग्य वापराचे मार्गदर्शन करणे ही युवकांची जबाबदारी आहे. शाळा, महाविद्यालये आणि समाजसंस्था यांना देखील यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment