बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षांची सक्तमजुरी

On: August 2, 2026 11:05 AM

जळगाव – सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास चाळीसगाव न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला वीस वर्षाच्या सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक 12 मे 2023 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास पिडीत बालिका तिच्या मामे बहिणीसोबत असतांना नराधम आकाश याने ओळखीचा फायदा घेत ‘तुला घरी सोडून देतो’ असे सांगून तिला स्कुटीवर बसवले. त्यानंतर चाळीसगाव येथील टेनिस ग्राउंडच्या भिंतीच्या आडोशाला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. बालिका रडू लागल्याने आरोपीने तिला ती रहात असलेल्या घराजवळच सोडून पलायन केले. हा प्रकार बालिकेने घरी जावून तिच्या आईला कथन केला. या घटनेप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या  फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या खटल्यात पीडित बालिका, तिची आई, मामे बहीण, पप्पू चावला, संतोष पंजवाणी, राकेश पाटील, डॉ. दिगंबर तेंडुलकर आणि तपास अधिकारी पोलिस निरीक्षक विशाल टकले यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अनुराधा एल. वाणी यांनी कामकाज पाहिले. त्यांना केसवॉच सत्रे व पेरवी अधिकारी पोलिस कॉन्स्टेबल अमोल पाटील यांनी सहकार्य केले.

विशेष न्यायाधीश श्रीमती पी. पी. बनकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व नऊ साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरली. पोक्सो कायदा कलम 5 (एम) नुसार वीस वर्ष सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंड (दंड न भरल्यास चार महिने अतिरिक्त कारावास), भा.दं.वि. कलम 366 (अ) नुसार पाच वर्ष कारावास व दहा हजार रुपये दंड (दंड न भरल्यास दोन महिने कारावास), भा.दं. वि. कलम 506 (धमकी देणे) नुसार एक वर्ष कारावास अशा स्वरुपाची शिक्षा आरोपीस सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दंडाच्या रक्कमेतून पंचवीस हजार रुपये पीडित बालिकेला देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment