जळगाव : जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोलाणी मार्केट परिसरातून जनरेटर व्हॅन चोरी करणा-या दोघांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. अटकेतील चोरट्यांकडून चोरी केलेल्या पाच दुचाकी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे जनरेटरसह व्हॅन आणि पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. मंगेश सुनिल मिस्तरी आणि यश अनिल सोनार (दोघे रा. शिरसोली) अशी चोरट्यांची नावे आहेत.
चोरी केलेली जनरेटर व्हॅन चोरट्यांनी जामनेर, बोदवड, मलकापूर मार्गे पळवून नेली होती. वाटेत वडनेर भोलजी या गावानजीक या वाहनाचा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहन वाटेतच सोडून दोघांनी पलायन केले होते. एका ढाब्यावरुन दोघांना पोलिस पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबुल केला. याशिवाय जळगाव शहरातील रामानंद नगर, जिल्हापेठ आणी एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतून पाच मोटार सायकली चोरी केल्याची देखील त्यांनी कबुली दिली. चोरीची वाहने त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आली आहेत.
पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोहेकॉ सतिश पाटील, पोहेकॉ नंदलाल पाटील,पोहेकॉ योगेश पाटील, पोहेकॉ विरेंद्र शिंदे, पोना भगवान पाटील, पोकॉ अमोल ठाकुर, पोकॉ. पांचाळ, पोकॉ प्रणय पवार, पोकॉ भगवान मोरे तसेच नेत्रम येथील कर्मचारी पोकॉ पंकज खडसे, पोकॉ मुबारक देशमुख यांच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.







