चारित्र्याच्या संशयरुपी भुताने घातले भलते थैमान – प्रियंकावर चाकूचे घाव घालत खुशाल झाला हैवान

On: July 20, 2025 6:44 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): प्रियंका बारा वर्षाची असतांना पितृप्रेमाला पारखी झाली होती. सन 2011 मधे तीच्या वडिलांचे निधन झाले होते. तिची आई सुनंदा बाविस्कर हिने दोन्ही मुली आणी एक मुलगा अशा तिघांचे पालनपोषण केले. मोठी मुलगी प्रियंका सहा वर्षांनी  लग्नायोग्य झाली. तिची आई सुनंदा बाविस्कर हिने तिचे लग्न करण्याचे निश्चित केले. प्रियंकासाठी योग्य स्थळ शोधण्यासाठी तिची आई सुनंदा बाविस्कर कामाला लागली होती. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील निंभोरा येथील खुशाल दगा भदाणे या बांधकामावर मिस्तरी काम करणा-या तरुणाचे स्थळ तिला योग्य वाटले. निवडक नातेवाईकांच्या मदतीने आणि साक्षीने प्रियंकाचा विवाह सन 2016 मधे उरकण्यात आला. लग्नानंतर प्रियंका सासरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील निंभोरा येथे एकत्र परिवारात राहण्यास आली.

लग्नानंतर प्रियंकाच्या नवलाईचे नऊ दिवस भरकन निघून गेले. संसार म्हटला म्हणजे पती पत्नीत कमी अधिक प्रमाणात वाद होतच असतात. त्यालाच संसार म्हणतात. स्वयंपाकातील मिठाप्रमाणे संसारात वादाचे प्रमाण असावे असे म्हणतात.   लहान सहान वादामुळे पती पत्नीच्या प्रेमाला रंगत येते आणी त्यात वाढ होते असे म्हणतात. मात्र ते वाद जेव्हा एखाद्या विषयावरुन विकोपाला जातात तेव्हा मात्र त्यांच्या प्रेमात घट होण्यास सुरुवात होते.

प्रियंकाचा पती खुशाल हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. बांधकामावरुन घरी परत आला म्हणजे तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत वाद घालत होता. आपल्याला पतीपासून त्रास असल्याचे ती माहेरी तिच्या आईजवळ कथन करत होती. मात्र मुलबाळ झाले म्हणजे सर्वकाही ठिक होईल असे तिला तिची आई सांगत होती आणी तिची समजूत देखील घालत होती.

दरम्यानच्या कालावधीत प्रियंका आणि खुशाल यांच्या संसार वेलीवर दोन पुत्ररुपी फुलांचे आगमन झाले. वेदांत आणि यश अशी त्या मुलांची नावे ठेवण्यात आली. बघत बघता वेदांत सात आणि यश चार वर्षांचा झाला. दोन सोन्यासारखी मुले झाल्यानंतर देखील अधुन मधून खुशालचे प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत वाद घालण्याचे प्रकार सुरुच होते. त्यामुळे ती वैतागली होती.

दोघांच्या संसाराला चार वर्षांचा कालावधी लोटला. नेहमीच्या वादामुळे दोघांनी संभाजीनगर जिल्हा सोडून दुस-या जिल्ह्यात राहण्याचे ठरवले. दोघे पती पत्नी जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्याच्या ठिकाणी गुरुदत्त नगर येथे मुलांसह राहण्यास आले. याठिकाणी दोघांनी आपल्या संसाराची नव्याने सुरुवात केली. खुशाल कामावर जावू लागला. मात्र काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार सुरु झाला. पाचोरा येथे देखील खुशाल हा पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासोबत वाद घालू लागला. तिने हा प्रकार तिच्या आईजवळ कथन केला.

मुलीच्या समाधानासाठी आणि जावयाच्या विचारात काहीतरी बदल व्हावा या हेतूने प्रियंकाला तिच्या आईने तिच्याजवळ चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे आणले. आता प्रियंका तिच्या आईजवळ चाळीसगाव तालुक्यतील टाकळी येथे राहण्यास आली. दरम्यान सहा महिन्यापुर्वी प्रियंकाने पती खुशाल याची जळगाव येथे महिला दक्षता समितीकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुशंगाने खुशाल हा एकवेळा महिल दक्षता समितीसमक्ष हजेरी लावण्यास आला.

एवढे झाले तरी देखील प्रियंकाने आपल्या पतीकडे जावून संसार करावा आणि दोघांनी सुखाने नांदावे अशी भुमिका तिच्या आईने घेतली. आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा एवढीच माफक अपेक्षा तिची आई सुनंदा बाविस्कर मनाशी बाळगून होती. त्यासाठी तिने जावई खुशाल यास चार समजुतदार नातेवाईकांसमक्ष बोलावून घेतले. जावई खुशालची समजूत घालून प्रियंकाला त्रास द्यायचा नाही या अटीवर त्याच्यासोबत पाठवण्यात आले.

Ranjit Patil ASI

या घडामोडीनंतर खुशाल आणि प्रियंका या दोघांनी पुन्हा घर बदलले. पाचोरा सोडून दोघे तालुक्यातील जारगाव येथे श्रीकृष्ण नगर भागात दोघा मुलांसह राहण्यास आले. याठिकाणी पुन्हा दोघांनी नव्याने संसार सुरु केला. दोनवेळा घर बदलून देखील खुशालच्या मनात पत्नी प्रियंकाच्या चारित्र्याचा संशय काही केल्या जात नव्हता.जारगाव येथे राहण्यास आल्यानंतर देखील पुन्हा तोच प्रकार खुशालने सुरु केला. 19 जुलैच्या सकाळी तिने तिची आई आणि मामा या दोघांना फोन करुन आपली तब्येत बरी नसल्याचे सांगितले. तसेच पती खुशाल पासून आपल्याला त्रास असल्याचे देखील तिने आवर्जून  कथन केले. मात्र 20 जुलैच्या सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास प्रियंकाची आई सुनंदा बाविस्कर हिस प्रियंका मयत झाल्याचा निरोप समजला.

निरोप मिळताच प्रियंकाची आई लागलीच चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथून पाचोरा येथे सरकारी दवाखान्यात दाखल झाली. प्रियंकाच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात जखमा तिला दिसून आल्या. त्या जखमांमधून रक्त निघत असल्याचे देखील दिसत होते. जावई खुशालने सकाळी पाच वाजता प्रियंकावर चाकू हल्ला केल्याचे प्रियंकाच्या आईला तिच्या बहिणीकडून समजले. या चाकू हल्ल्यात ती ठार झाली होती.

या घटने प्रकरणी प्रियंकाची आई सुनंदा बाविस्कर हिच्या फिर्यादीनुसार पाचोरा पोलिस स्टेशनला भारतीय न्याय संहीता 2023 कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेनंतर खुशालने स्वत:ला गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिस हजर झाल्याने त्याला त्याच्या विचारापासून आणी कृत्यापासून परावृत्त करत ताब्यात घेण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ यांच्यासह फौजदार कैलास ठाकुर, कृष्णा घायाळ, सहायक फौजदार रणजीत पाटील, हे.कॉ. राहुल शिंपी, पो.कॉ. योगेश पाटील आदी करत आहेत. या घटनेत दोन निष्पाप चिमुकली मुले मातृप्रेमाला कायमची पारखी झाली आहेत. दोघा मुलांची आई देवाघरी तर बाप गजाआड झाला आहे. आपल्या कृत्याची शिक्षा आपल्या निष्पाप मुलांना मिळणार नाही एवढी माफक विचारशक्ती प्रत्येकाला असावी एवढेच या घटनेच्या निमीत्ताने सांगावेसे वाटते. रागाच्या भरात टोकाचे पाऊल उचलायचे नसते. अशा प्रसंगी सारासार विचारशक्ती शाबूत ठेवण्याची सक्षमता आणि सजगता प्रत्येकाचा अंगी असायला हवी. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment