जळगाव : चोपडा या तालुक्याच्या सिमेवरील उमर्टी या गावालगत असलेल्या मध्य प्रदेशच्या पारउमर्टी या गावी गावठी कट्ट्यांची निर्मिती व विक्री होत असते. या गावी असलेले शिकलकर समाजाचे लोक हे काम करतात. या गैरकृत्यास आळा घालण्यासाठी गेल्या एक महीन्यापासुन उमर्टी व सत्रासेन परिसरात दिवसरात्र नाकाबंदी लावण्यात आली आहे.
या नाकाबंदीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या नजरेस भरधाव वेगाने जात असलेल्या मोटार सायकलवरील दोघांवर पडली. या मोटार सायकलस्वारास बॅरिकेट्स लावून अडवले असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या कब्जातून चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले.
मंथन मोहन गायकवाड (मांजरी बु. जि. पुणे) आणि स्वप्निल विभीषण कोकाटे (रुई जि. धाराशिव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. अटकेतील दोघांकडील गावठी कट्टे व जिवंत काडतुसे ताब्यात घेण्यासाठी त्यांचे काही साथीदार धुळे येथे त्यांची वाट बघत असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली. मात्र तपासाअंती दोघांचे साथीदार धुळे येथे पथकाच्या हाती लागले नाही. अटकेतील मंथन याच्याविरुद्ध अग्निशस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पो.नि. अनिल भवारी यांच्या पथकातील श्रेणी फौजदार बापु साळुंके, पोकाँ रावसाहेब एकनाथ पाटील, पोकाँ घनश्याम हिम्मत पाटील, पोकाँ चेतन महाजन, पोकाँ विशाल पाटील आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.







