जळगाव : एमआयडीसी परिसरातील भोसले इंडस्ट्रीज या कंपनीतून सोया पनीर तयार करण्याची मशिनरी आणि मोटार सायकल चोरी करणा-या दोघा चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या आठ तासात जेरबंद केले आहे. प्रशांत उर्फ बाप्या पंडीतराव साबळे आणि नितीन उर्फ मित्या रोहीदास चव्हाण (दोघे रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
या चोरीच्या घटने प्रकरणी सुरेश रामचंद्र पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील पोलीस उप निरिक्षक राहुल तायडे, पोहेकॉ गिरिष पाटील, पोकॉ राहुल रगडे, पोकॉ विशाल कोळी आदींनी तांत्रीक तपासाची मदत घेत हा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिस कोठडीत असलेल्या दोघांकडून चोरीस गेलेला एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजिव मोरे, पोकॉ मंदार महाजन करत आहेत.







