खाकीच्या बदलीसाठी खाकीने भरवला घोडेबाजार – 35 लाखाच्या सौदेबाजीत ताब्यात घेतला हवालदार

On: July 30, 2025 1:08 PM

नाशिक : मोक्याच्या जागी इंदीरानगर पोलिस स्टेशनला 35 लाख रुपयात प्रभारीपद मिळवून देण्याचे आश्वासन देत दलालाचा मध्यस्थ म्हणून काम करणा-या हवालदाराला ताब्यात घेण्यात आले आहे तर दलाल म्हणून वावरणा-या राजकीय पक्षाच्या कथित कार्यकर्त्यास अटक करण्यात आली आहे. नितीन सपकाळे असे ताब्यात घेण्यात आलेल्या मालेगाव शहर पोलिस स्टेशनला कार्यरत हवालदाराचे नाव आहे. तसेच सागर पांगरे असे अटक करण्यात आलेल्या कथित राजकीय कार्यकर्त्याचे नाव आहे. राजकीय नेत्यांसह नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांसोबत आपली जवळची ओळख असल्याचे सागर पांगरे हा भासवत होता.

याशिवाय दुस-या एका घटनेत स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देत दोन लाख रुपयांची मागणी याच संजय पांगरेने एका पोलिस कर्मचा-याला केली. या दोन लाखांपैकी एक लाख स्विकारल्याप्रकरणी सागर पांगरे याला अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे आणि मालेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी गौतम बोराळे यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.

इंदिरा नगर पोलिस स्टेशनला नियुक्ती मिळवून देण्याबाबत पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांना हवालदार नितीन सपकाळे याचा फोन आला. त्यावर पोलिस निरीक्षक कारंडे यांनी कर्मचारी प्रशांत नागरे यांच्यासह अंमलदार जनार्दन ढाकणे, समाधान चव्हाण आदींनी चांडक सर्कल येथे हवालदार नितीन सपकाळे याची भेट घेतली. सागर पांगरे याची पोलिस अधिकाऱ्यांशी ओळख आहे. 35 लाख द्या, कुठेही बदली करुन मिळेल. दुसरे पोलिस अधिकारी 35 लाख देण्यास तयार आहेत. मात्र तुम्ही ओळखीचे असल्यामुळे तुमच्यासाठी पाच लाख कमी करतो. मात्र तिस लाखापेक्षा कमी रक्कम स्विकारली जाणार नाही आणि बदलीचे काम होणार नाही असे सपकाळे याने पो.नि. मनोहर कारंडे यांच्यासह तिघांना सांगितले. याप्रकरणी पो.नि. मनोहर करांडे यांनी सोबत असलेल्या कर्मचारी प्रशांत नागरे यांना तक्रार दाखल करण्यास सांगितले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनला नितीन सपकाळे याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दुस-या घटनेत मालेगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी गौतम बोराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मालेगाव येथील दिनेश ठोके, भुषण सोळंके यांच्या मध्यस्तीने हवालदार नितीन सपकाळे सोबत ओळख झाली. हवालदार नितीन सपकाळे याने गौतम बोराळे याची सागर पांगरे याच्यासोबत ओळख करुन दिली. सागर पांगरे याने पोलिसकर्मी गौतम बोराळे याला नाशिक येथे बोलवले. स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती देण्याचे आश्वासन त्याने गौतम बोराळे याला दिले. त्या बदल्यात पांगरे याने बोराळे यास दोन लाख रुपयांची मागणी केली. त्याच्या बोलण्यात फसलेल्या बोराळे याने त्याच्या मित्राच्या बँक खात्यातून पांगरे याला एक लाख रुपये वर्ग केले. मात्र दिवसामागून दिवस उलटून गेले. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले तरी बोराळे याची बदली एलसीबीत झाली नाही. अखेर बोराळे याने पांगरे याला हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली. त्यावर पांगरे याने बोराळे याला अजून एक लाख रुपयांची मागणी केली. अजून एक लाख रुपये दिले नाही तर कुठेही बदली करुन टाकण्याची पांगरेने बोराळे याला धमकी दिली. या प्रकाराने पोलिस दलातील बदलीचा घोडेबाजार जनतेच्या समोर आला आहे. या घोडेबाजाराला काही अधिकारी टेंडर भरण्याचा प्रकार म्हणतात. कारे.. बाबा…. तु कितीचे टेंडर भरले अशी विचारणा एक अधिकारी दुस-या अधिका-याला या बदल्यांच्या मौसमात करत असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment