जळगाव : जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० जुलै २०२५ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. १० जुलै २०२५ रोजी रात्री १ वाजताच्या सुमारास डोणगाव शिवारातील रायबा हॉटेलसमोर प्रमोद श्रीराम बाविस्कर (रा. पुनगाव, ता. चोपडा) यांच्यावर एका अज्ञात इसमाने गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आरोपी मोटरसायकलवरून फरार झाले होते. याप्रकरणी ११ जुलै रोजी यावल पोलीस स्टेशनला गु.र.नं. २९७/२०२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. सोपान गोरे व शरद बागल यांनी दोन विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास व घटनास्थळाच्या बारकाईने केलेल्या पाहणीनंतर आरोपींचा ठावठिकाणा शोधण्यात आला. दर्शन रविंद्र देशमुख (वय २५, रा. अडावद), गोपाल संतोष चव्हाण (वय २५, रा. अडावद), किशोर मुरलीधर बाविस्कर (वय ४०, रा. वाघनगर, जळगाव), विनोद वसंतराव पावरा (वय २२, रा. चोपडा), सुनिल सुभाष पावरा (वय २२, रा. चोपडा) अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. या सर्वांना नाशिक, अडावद, अमलवाडी व उमर्टी येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले बंदूक व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे करत आहेत. अतिशय किचकट गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे जिल्ह्यात खळबळजनक गुन्ह्याचा तपास लागल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.







