जळगाव – स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या तरुणास अटक करत कारवाई केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यावल पोलीस स्टेशनला दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना संशयित आरोपीच्या चौकशीत त्याने जळगाव येथील अक्षय अजय जयस्वाल (वय २४, रा. शिवाजी नगर, जळगाव) याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल विकले असल्याची माहिती दिली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पो.उ.नि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून पुढील कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस पथकाने शहरात शोध घेत असताना आंबेडकर मार्केट परिसरात मोटारसायकल (MH 19 BK 8893) वर संशयास्पद स्थितीत बसलेला अक्षय जयस्वाल दिसून आला. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याने पिस्टल मोटारसायकलच्या सीटखाली लपवून ठेवल्याचे कबूल केले. झडती दरम्यान त्याच्या कब्जातून देशी बनावटीचे पिस्टल व ५ जिवंत काडतुसे (किंमत अंदाजे ₹४०,०००/-) जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोउपनि. शरद बागल, पोहेकॉ. अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, नितीन बाविस्कर, पोना. किशोर सोनवणे, पोकॉ. सिध्देश्वर डापकर, रविंद्र कापडणे आणि गोपाल पाटील यांनी सहभाग घेतला.







