सरपंच जयमाला वाडगुरे अपात्र – यवतमाळ अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांचे आदेश 

On: August 9, 2025 4:00 PM

यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील आमडी येथील सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांना यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ मधील तरतुदी नुसार अनर्ह प्राप्त केल्याने सरपंच जयमाला वाडगुरे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. तर आमडीचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी तथा सचिव व्ही. बी. राठोड यांचे विरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांचे कडे प्रस्ताव पाठविण्यात यावे, असे आदेश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले आहे. याचिकाकर्ता पंकज अनंतराव ठाकरे (रा. जुनोनी) यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी मांडले. तर गैरअर्जदार आमडीच्या सरपंच सौ. जयमाला वाडगुरे यांची बाजू ॲड. अजय डाखोरे यांनी मांडली. 

घाटंजी तालुक्यातील आमडी येथील सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे ह्या सन २०२१ साली सरपंच पदावर विराजमान झाल्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार आर्थिक वर्षात ४ ग्रामसभा घेणे बंधनकारक असतांना दोनच ग्रामसभा घेण्यात आले, अशी लेखी तक्रार ग्रामसभा सदस्य पंकज अनंतराव ठाकरे (रा. जुनोनी ता. घाटंजी) यांनी सबंधित विभागाकडे केली. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी घाटंजी आदीं कडे लेखी तक्रारी करुन सुद्धा कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर जुनोनी येथील पंकज अनंतराव ठाकरे यांनी यवतमाळच्या अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे, सचिव ग्रामपंचायत आमडी व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी यांचे विरोधात ग्रामपंचायत विवाद मामला क्रमांक २९/७/२०२४ दाखल केला. सदर प्रकरणात दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकुन ॲड. परमेश्वर अडकीने यांचा युक्तीवाद ग्राहय धरून अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी आमडी ता. घाटंजी येथील सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांना दि. १३ मार्च २०२५ रोजी अपात्र घोषित केले. 

आमडीच्या सरपंच सौ. जयमाला वाडगुरे यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला व्यथीत होऊन ॲड. मुग्धा चांदूरकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट याचिका क्रंमाक १६६५/२०२५ दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष झाली. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी १३ मार्च २०२५ चा आदेश रद्द करुन सदर प्रकरणात फेर चौकशी करुन नव्याने आदेश पारीत करण्याचे निर्देश दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, अर्जदार पंकज अनंतराव ठाकरे व गैरअर्जदार सरपंच सौ. जयमाला वाडगुरे, ग्रामपंचायत सचिव आशिष कोलते व गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी हे उच्च न्यायालयात हजर झाले. या वेळी आमडी ग्रामपंचायत चे सचिव आशिष कोलते यांनी २२ जुलै २०२५ रोजी आमडी ग्रामपंचायत ग्रामसभा बाबत दस्तऐवज (कागदपत्रे) दाखल केले. 

गैरअर्जदार सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांनी आपल्या लेखी युक्तिवादात आमडी जुनोनी या गट ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक वर्षात ४ ग्रामसभा घेतल्या असुन सुद्धा गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी गजानन पिल्लेवाड व आमडी ग्रामपंचायत सचिव आशिष कोलते यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला अहवाल चुकीचा आहे, असा आरोप केला आहे. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ नुसार प्रत्येक आर्थिक वर्षात ४ ग्रामसभा घेणे आवश्यक आहे. या मध्ये कसुर केल्यास तो सरपंच म्हणून चालु राहण्यास अनर्ह (अपात्र) ठरेल. असे सदर अधिनियमात नमुद केले आहे. त्यामुळे अर्जदार ग्रामसभा सदस्य पंकज अनंतराव ठाकरे यांचा विवाद अर्ज मंजूर होण्यास पात्र आहे. त्यामुळे मी अपर जिल्हाधिकारी यवतमाळ मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे. 

आमडी – जुनोनी गट ग्रामपंचायत आमडी ता. घाटंजी येथील अर्जदार पंकज अनंतराव ठाकरे यांनी दाखल केलेला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ नुसार दाखल केलेला विवाद अर्ज मंजूर करण्यात येत आहे. तसेच गैरअर्जदार सरपंच सौ. जयमाला विठ्ठलराव वाडगुरे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ तरतुदीनुसार अनर्हता प्राप्त होत असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ७ मधील तरतुदीनुसार पुढील कालावधीकरिता सरपंच पदावरुन अपात्र घोषित करण्यात येत आहे. याचिकाकर्ता पंकज ठाकरे यांची बाजू ॲड. परमेश्वर अडकीने यांनी मांडली. तर गैरअर्जदार सरपंच सौ. जयमाला वाडगुरे यांची बाजू ॲड. अजय डाखोरे यांनी मांडली. एकंदरीत आमडी – जुनोनी गट ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. जयमाला वाडगुरे अपात्र झाल्याने घाटंजी तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment