न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

On: July 27, 2026 9:56 AM

जळगाव : अँड. अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात जळगाव जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध कायदेशीर विषयांवर तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.

निकम कुटुंबाला वकिली क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. बॅरिस्टर निकम यांनी वकिली व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत वकिली क्षेत्रातील तिसरी पिढी असलेले अॅडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम हे सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत.

दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकांना मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रासाला सामोरे जावे लागते. ही अडचण दूर करण्याच्या हेतूने न्याय विश्वास फाउंडेशनने अनुभवी वकिलांच्या सहभागातून हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले.

शिबिरामध्ये जमिनीचे वाद, ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया, सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक तसेच महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांसह विविध विषयांवर नागरिकांना मोफत सल्ला देण्यात आला. तसेच गरजू नागरिकांना मोफत सरकारी कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

सुरुवातीला अॅडव्होकेट अनिकेत निकम यानी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजना मागची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, न्याय विश्वास फाऊंडेशन स्थापनेमागील प्रेरणा ही लोकांच्या मनात न्यायाव्यस्थे बद्दल विश्वास आणि कायद्या बद्दलची जागृती निर्माण करण्याचा उद्देश आहे. यापुढे देखील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी आम्ही तत्पर राहू असेही ते यावेळी म्हणाले.

या शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करताना न्याय विश्वास फाउंडेशन, जळगावचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी अशा जनहिताच्या उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेबाबत जागरूक करण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, अशी भावना देखील व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment