देवीच्या मुर्तीवरुन भलताच चिघळला वाद ——– कु-हाडीच्या घावात राणा झाला कायमचा बाद  

On: September 14, 2025 9:58 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेवरील मुक्ताईनगर तालुक्यात लालगोटा हे आदिवासी गाव वसले आहे. फसवणूकीच्या माध्यमातून लुटमारीच्या घटना या गावात घडत असतात. या गावाला गुन्हेगारीचा इतिहास असल्याचे म्हणावे लागेल. दुप्पट सोन्याचे आमिष दाखवून लुट करणे, नागमणी मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुट करणे असे विविध प्रकार या गावात घडत असतात. लाठ्या – काठ्या आणि प्राणघातक शस्त्रांचा वापर या भागातील आदिवासी बांधवांसाठी सामान्य बाब म्हटली जाते. आदिवासी समाजबांधवांचे लालगोटा हे गाव मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत येते. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे संख्याबळ आणि या तालुक्यातील गावे व लोकसंख्या यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात व्यस्त आहे. त्यामुळे मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे विभाजन होण्याची गरज असल्याचे बोलले जाते. लालगोटा हे गाव नावाप्रमाणेच पोलिस दप्तरी लाल रिमार्क मधे असल्याचे देखील म्हटले जाते. दुप्पट सोन्याचे आमिष आणि कमी किमतीत नागमणी देण्याचे आमिष दाखवून बोलावलेल्या समुहाची लुट करण्याचे प्रकार लालगोटा या गावी कित्येकदा घडले आहेत. लुट झाल्यानंतर देखील आपले काम चुकीचे असल्याच्या जाणीवेतून कित्येक लोक पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास धजावत नाही ही वस्तुस्थिती आहे. 

मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचा कारभार हाती घेतल्यानंतर पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांनी लालगोटा या गावाचा गुन्हेगारी इतिहास तपासला. या तपासणीत काही गोष्टी त्यांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरल्या. गुन्हेगारीच्या बाबतीत संवेदनशील असणा-या लालगोटा या गावात फसणारे आणि लुटले जाणारे लोक कोणत्या मार्गाने येतात आणि परत जातात याची पाहणी आणि निरीक्षण त्यांनी केले. त्या पाहणी आणि निरीक्षणाच्या आधारे त्यांच्या असे लक्षात आले की लुबाडले जाणारे लोक हे बुलढाणा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरील मलकापूर, जळगाव जामोद आणि डोलारखेडा येथून ऑटो रिक्षा अथवा इतर वाहनाने येतात. त्यामुळे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांनी सर्वप्रथम जळगाव जामोद, डोलारखेडा आणि जळगाव जामोद या गावाच्या सिमेवर नाकाबंदी तुकडी तैनात करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अमलात देखील आणला. या तिन वाटेने येणा-या लोकांची विचारपुस करुन ते नागमणी अथवा दुप्पट सोन्याच्या आमिषाने लालगोटा या गावी जात असतील तर त्यांचे समुपदेशन करुन त्यांना माघारी पाठवावे असे निर्देश त्यांनी या नाकाबंदी तुकडीतील कर्मचा-यांना दिले. याशिवाय लालगोटा या गावी दुप्पट सोन्याचे आमिष अथवा नागमणी विकला जात नाही असा प्रचार आणि प्रसार देखील केला. त्यात पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ आणि त्यांच्या सहका-यांना मोठे यश आले आणि लालगोटा गावात होणारी फसवणूक आणी लुट थांबली आहे. मात्र गुन्हेगारीचा आलेख कमी झालेल्या लालगोटा या गावात मंदीरातील मुर्तीसह भावकीच्या वादातून एका आदिवासी बांधवाची कु-हाड, लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यांनी हल्ला करुन हत्या झाली. या हत्येच्या घटनेचा सविस्तर वृतांत पुढीलप्रमाणे.

लालगोटा या गावात राणा मनमौजदार पवार आणि मिनाक्षी राणा पवार हे पती – पत्नी रहात होते. राणा पवार यांची दोन मुले अनुक्रमे राजकुवर आणि धनकुमार तसेच या दोघा मुलांचे आजोबा मनमौजदार आकाई पवार असे सर्वजण एकत्र कुटूंबात रहात होते. माळा विकणे हा या परिवाराचा मुख्य व्यवसाय आहे. याच गावात मनमौजदार पवार यांचे चुलत भाऊ ठगडी कोनानी हे त्यांच्या परिवारासह राहतात. मनमौजदार पवार आणि ठगडी कोनानी या दोघा चुलत भावांनी सुमारे बारा वर्षापुर्वी  लालगोटा या गावी त्यांच्या आदिवासी समाजाच्या जोगडी माता देवीचे मंदीर बांधण्याचे ठरवले होते. या दोघा भावांनी मिळून मंदीराचे बांधकाम तर शक्तीकपूर सिगरेटबाबू पवार या समाजबांधवाने मंदीराचा गाभारा तयार केला. मनमौजदार पवार यांचा मुलगा राणा पवार याने मंदीरात देवीची मुर्ती आणली. अशा प्रकारे बारा वर्षापुर्वी लालगोटा या गावी आदिवासी समाजाच्या जोगडी माता देवीच्या मंदीराची निर्मीती झाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्यावेळी आदिवासी समाज बांधवाचे निधन होते त्यावेळी दशक्रिया विधीसाठी या देवीच्या मुर्तीची गरज भासते.

मंदीर तयार झाल्यानंतर काही काळ लोटला. दिवसामागून दिवस निघून गेले. मंदीरातील देवीची मुर्ती आमच्या घरी राहील असा पवित्रा समाजातील ठगडी कोनानी याने घेतला. तर देवीची मुर्ती मंदीरातच राहील असा आग्रह मनमौजदार पवार आणि त्यांचा मुलगा राणा पवार या परिवाराने धरला. अशा प्रकारे देवीची मुर्ती कुणाकडे राहणार यावरुन राणा आणि कोनानी या दोन परिवारात संघर्ष सुरु झाला.

पाच वर्षापुवी कोनानी परिवाराने मंदीरातील देवीच्या सर्व मुर्त्या उचलून थेट त्यांच्या घरी नेल्या आणि त्यांचे शुद्धीकरण केले. तेव्हापासून मंदीरातील देवीच्या मुर्त्या कोनानी परिवाराच्या ताब्यात होत्या. त्या मुर्त्या आपल्याला परत मिळाव्या यासाठी राणा पवार आणि त्यांचा परिवार हा कोनानी परिवारासोबत वाद घालत होता. मंदीरात प्राण प्रतिष्ठा झालेल्या मुर्त्यांची घरात नव्याने प्राणप्रतिष्ठा झाल्याचा राग राणा पवार यास होता. आपल्या मुर्त्या आपल्याला परत मिळाव्या म्हणून राणा पवार यांचा मुलगा धनकुमार व त्याची काकु चोनीबाई सर्जु पवार असे ठगडी कोनानी पवार यांच्या घरी गेले. बराच वेळ वाद झाल्यानंतर ठगडी कोनानी पवार याने घरातील देवीच्या मुर्त्या धनकुमार पवार आणि त्याची काकु चोनीबाई पवार यांच्या ताब्यात दिल्या.

आशिष अडसुळ पोलिस निरीक्षक

पाच वर्षाच्या कालावधीनंतर ताब्यात मिळालेल्या मुर्त्यांची 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी राणा पवार यांनी महाराजांच्या हस्ते मंदीरात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी राणा पवार, त्यांची पत्नी मिनाक्षी, दोन्ही मुले धनकुमार आणि राजकुवर असे सर्वजण हजर होते. पुजाविधी आटोपल्यानंतर राणा पवार आणि त्याच्या परिवारातील सर्वजण सर्जु मनमौजदार पवार यांच्या घरी जेवण करण्यासाठी गेले. जेवण झाल्यानंतर सर्वजण घराबाहेर बसले असतांना त्याठिकाणी शक्तीकपूर सिगरेटबाबु पवार व शिवकपूर शक्तीकपुर पवार असे दोघे जण आले.

आमच्या मुर्त्या आम्हाला परत द्या असे म्हणत दोघे जण वाद घालू लागले. शब्दामागे शब्द वाढत असतांनाच त्याठिकाणी गुरुदिप जिलीशबाबु पवार, राजेंद्रबाबु उर्फ पांडु सिगरेटबाबु पवार, क्रिश राजेंद्रबाबु पवार, दिपक जिलीसबाबु पवार, जिलीसबाबु कोनानी पवार, लताबाई शक्तीकपूर पवार, अनुलेखा दिपक पवार व त्यांच्यासोबत इतर असे सर्वजण धावून आले. गुरुदिपच्या हातात कु-हाड, क्रिशच्या हातात लाठी, दिपकच्या हातात रॉड, राजेंद्रबाबुच्या हातात लोखंडी आसारी व इतरांकडे  लाठ्या काठ्या अशी प्राणघातक हत्यारे होती. दोन गटातील वाद शिगेला पोहोचला असतांनाच गुरुदिप याने राणा पवार याच्या डोक्यात पाठीमागून कु-हाडीने हल्ला केला. अचानक झालेल्या कु-हाडीच्या हल्ल्यात राणा पवार खाली कोसळला. त्याचवेळी लाठी घेऊन क्रिश, रॉड घेऊन दिपक, आसारी घेऊन राजेंद्रबाबु असे तिघे राणाच्या दिशेने सरसावले. राणा पवार याच्यावर होणारा हल्ला रोखण्यासाठी त्याची पत्नी मिनाक्षी व धनकुमार व राजकुवर ही दोन्ही मुले, सर्जेश पवार सर्जु पवार, चोनीबाई, रईसा सर्जेश पवार अशी मंडळी पुढे आली. 

मात्र राणाच्या बचावासाठी पुढे आलेल्या सर्वांना क्रिश, दिपक, राजेंद्रबाबु, लताबाई, अनुलेखा, शक्तीकपुर व शिवकुमार आदींनी लोखंडी रॉड, आसारी, लाठ्या काठ्यांसह लाथाबुक्कांनी मारहाण केली. या मारहाणीत जखमी राणा पवार याची पत्नी मिनाक्षी पवार देखील जखमी झाली. तिच्या कपाळावर जखम आणि छातीसह गुडघ्यावर मुकामार लागला. काही वेळाने सर्व हल्लेखोर शिवीगाळ करत घटनास्थळावरुन पळून गेले.

या जबर मारहाणीत जखमी आणि बेशुद्ध पडलेल्या राणा पवार यास तातडीने मोटार सायकलने कु-हा येथील वैद्यकीय उपचार केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र उपस्थित डॉक्टरांनी त्यांची स्थिती बघता त्यांना तात्काळ मुक्ताईनगरला सरकारी दवाखान्यात नेण्यास सांगितले. त्यामुळे राणा पवार यास तात्काळ रुग्णवाहिकेतून मुक्ताईनगरला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र राणा पवार याची प्राणज्योत मालवली होती. वैद्यकीय अधिका-यांनी राणा मनमौजदार पवार यास मयत घोषित केले.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ व त्यांच्या सहका-यांनी तातडीने दवाखान्यासह घटनास्थळाकडे पथक रवाना केले. जखमी मिनाक्षी राणा पवार हिस मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल करण्यात आले. दवाखान्यातच 18 ऑगस्ट 2025 रोजी तिचा जवाब घेण्यात आला. मिनाक्षी राणा पवार हिच्या जवाबानुसार मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुरुदिप जिलीशबाबु पवार, राजेंद्र बाबु सिगरेटबाबु पवार, क्रिश राजेंद्रबाबु पवार, दिपक जिलीशबाबु पवार, जिलीसबाबु कोनानी पवार, शक्तीकपुर सिगरेटबाबु पवार, शिवकपुर शक्तीकपुर पवार, लताबाई शक्तीकपुर पवार, अनुलेखा दिपक पवार व इतरांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.नं. 262/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 189 (2), 191 (2), 191 (3), 190, 118 (1), 115 (2), 352 अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला.

गुरुदिप जिलीशबाबू पवार, राजेंद्रबाबु उर्फ पांडू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार या तिघा संशयीतांना 18 ऑगस्ट च्या सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास अटक करण्यात पोलिस पथकाला यश आले. त्यानंतर लताबाई शक्तीकपुर पवार व अनुलेखा दिपक पवार या दोघांना देखील काही वेळानंतर अटक करण्यात आली. जिलीसबाबू उर्फ जिलीपबाबू कोनानी पवार या वयोवृद्ध संशयीत आरोपीस 1 सप्टेबर रोजी अटक करण्यात आली. अटकेतील सर्व संशयीत आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दिपक जिलीशबाबु पवार, शक्तीकपूर सिगरेटबाबू पवार, शिवकपूर शक्तीकपूर पवार. दिनेश जिलिशबाबू पवार व इतर दोन ते तिन संशयीत आरोपी कथा लेखन सुरु असतांना फरार होते. पोलिस पथक त्यांच्या मागावर होते. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्यांना त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, पोलिस उप निरीक्षक नयन पाटील, हे.कॉ. अशोक जाधव, पोलिस नाईक प्रदीप इंगळे, पोलिस कॉन्स्टेबल चेतन महाजन व सागर सावे आदींचे सहकार्य लाभत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment